scorecardresearch

Premium

कर्नाटकमधील ‘कंबाला’ खेळाची विशेषता काय? याआधी बंदी का होती? जाणून घ्या सविस्तर…

बंगळुरूत आयोजित केलेल्या कंबाला खेळ पाहण्यासाठी हजारो लोकांची उपस्थित होती.

Karnataka Kambala
कर्नाटकमधील कंबाला खेळ (फोटो सौजन्य- PTI Photo/Shailendra Bhojak)

कर्नाटकमध्ये ‘कंबाला’ हा म्हशींच्या शर्यतीचा खेळ चांगलाच प्रसिद्ध आहे. दरवर्षी या खेळाचे आयोजन केले जाते. या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या २५ आणि २६ तारखेला बंगळुरूतील सिटी प्रॅलेस मैदानावर या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळादरम्यान म्हशीच्या एकूण १६० जोड्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीप्रमाणेच कर्नाटकमधील कंबाला खेळावरही न्यायालयाने बंदी घातली होती? याच पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील कंबाला हा शर्यतीचा खेळ काय आहे? त्यावर न्यायालयाने बंदी का घातली होती? कंबाला खेळाचे किती प्रकार आहेत? हे जाणून घेऊ या….

२०१४ साली खेळावर घातली होती बंदी

बंगळुरूत आयोजित केलेल्या कंबाला खेळ पाहण्यासाठी हजारो लोकांची उपस्थित होती. हा एक पारंपरिक खेळ मानला जातो. मात्र २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने जलिकट्टू, बैलगाडा शर्यत या खेळांसह कंबाला यावरही बंदी घातली होती. मात्र राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती करून हा खेळ खेळण्यास परवानगी दिली होती.

Woman murder for four wheeler
वाशिम : हुंडा बळीतून महिलांची सुटका कधी? चारचाकी गाडीसाठी महिलेची गळा चिरून हत्या !
devendra fadnavis received sindhu art gallery in nagpur proposal for approval
“नागपुरात १४० कोटींची सिंधू आर्ट गॅलरी”  काय म्हणाले देवेंद्र फडणवीस….
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
five lakh devotees visited the Ram temple
जय श्रीराम! पहिल्या दिवशी पाच लाख भाविक प्रभू रामाच्या चरणी लीन, अयोध्येत रामभक्तांचा मेळा

कंबाला काय आहे?

कंबाला हा कर्नाटकमधील एक पारंपरिक खेळ आहे. कर्नाटकच्या सीमाभागात तुलू भाषिक प्रदेशात विशेष रुपाने हा खेळ आयोजित केला जातो. याआधी भाताची कापणी झाल्यानंतर अनेक कुटुंबांकडून या खेळाचे आयोजन केले जायचे. मात्र आता कंबाला समितीकडून नोव्हेंबरपासून ते एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत दक्षिण कर्नाटक आणि उडुपी जिल्ह्यांत हा खेळ आयोजित केला जातो. कंबाला हा खेळ अनेकांसाठी प्रतिष्ठेची बाब मानली जातो. विशेष म्हणजे किनारी प्रदेशातील बुंट समुदायासासाठी हा खेळ विशेष महत्त्वाचा आहे. या खेळात सहभाी होण्यासाठी वर्षभर म्हशींना सांभाळले जाते, म्हशींना पौष्टिक आहार दिला जातो.

कंबाला खेळाचे वेगवेगळे प्रकार

कंबाला या खेळाचे एकूण चार प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार नेगिलू (नांगर) प्रकार म्हणून ओळखला जातो. यात शर्यतीदम्यान म्हशींच्या मागे कमी जड असलेले नांगर बांधले जाते. पहिल्यांदाच शर्यतीत भाग घेणाऱ्या म्हशींचा समावेश या प्रकाराच्या शर्यतीत केला जातो. कंबालाचा दुसरा प्रकार हग्गा (दोरी) म्हणून ओळखला जातो. यात दोन्ही म्हशींना फक्त दोरींनी बांधले जाते. तसेच म्हशींनी शर्यतीत जोरात पळावे म्हणून म्हशींच्या मागे एक माणूस असतो. हा माणूस म्हशींना जोरात पळण्यासाठी उद्युक्त करत असतो. कंबाला खेळाचा तिसरा प्रकार हा अड्डा हालगे नावाने ओळखला जातो. या प्रकारच्या शर्यतीत माणूस एका आडव्या फळीवर उभा राहतो. ही फळी म्हशी जोरात ओढतात. हग्गा आणि नेगिलू या प्रकारच्या खेळात संबंधित व्यक्ती धावत्या म्हशींच्या मागे पळतो. मात्र अड्डा हालगे या प्रकारात माणूस फळीवर फक्त उभा राहतो. म्हशी या फळीला आपोआप ओढतात. चौथ्या प्रकाराला काने हालगे म्हणून ओळखले जाते. या प्रकारात म्हशींना एक लाकडी फळी बांधली जाते. म्हशींना धावण्यास उद्युक्त करणारी व्यती या फळीवर उभी राहते. या फळीला दोन छिद्र असतात. म्हशी जेव्हा पेुढे धावतात तेव्हा या छिद्रांतून पाणी बाहेर पडते. ज्या म्हशींच्या जोडीने फळीच्या छिंद्रांतून पाणी सर्वांत उंच फेकले, ती जोडी विजय ठरवली जाते.

१.५ लाख रुपयांचे बक्षीस

बंगळुरूमध्ये २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कंबाला खेळात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला. साधारण १६० म्हशींच्या जोड्या या खेळात धावल्या. या खेळात प्रथम येणाऱ्यास १.५ लाख रुपयांसह सोनंदेखील बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. या खेळात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी म्हशींना खेळाच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली.

संपूर्ण कर्नाटकमध्ये हा खेळ प्रसिद्ध आहे का?

कर्नाटकच्या किनारी प्रदेशातच हा खेळ अधिक प्रसिद्ध आहे. मात्र २०२२ साली आलेल्या कांतारा यासारख्या चित्रपटामुळे कंबाला या खेळास संपूर्ण कर्नाटकमध्ये प्रसिद्धी मिळाली आहे, असे आयोजकांना वाटते. बंगळुरू कंबाला शर्यतीचे आयोजन आमदार अशोक राय यांनी केले होते. त्यांना कांतारा या चित्रपटामुळेच लोकांमध्ये कंबाला या खेळाबाबत रुची निर्माण झाली आहे, असे वाटते.

कंबाला खेळावर बंदी का घालण्यात आली होती?

प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारतभरात अनेक संस्था कार्यरत आहेत. पेटा ही संस्थादेखील यापैकीच एक आहे. पेटासह अनेक संस्थांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. प्राण्यांना हिंसक वागणूक दिल्या जाणाऱ्या सर्वच पारंपरिक खेळांवर बंदी घालावी, अशी मागणी या संस्थांनी केली होती. कंबाला या खेळात सहभागी होणाऱ्या म्हशींच्या नाकाला छिद्रे पाडली जातात. या छिद्रांतून एक दोरी घातली जाते. कंबाला शर्यतीदरम्यान म्हशींनी जोरात पळावे यासाठी ही दोरी ओढली जाते. ही प्राण्यासोबत केला जाणारी क्रुरता आहे, असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता. या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली कंबाला, जलिकट्टू, बैलगाडा शर्यत यासारख्या पारंपरिक खेळांवर बंदी घातली होती.

न्यायालयाने घातलेली बंदी कशी उठवली गेली?

पर्यावरण मंत्रालयाने जानेवारी २०१६ मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. यामध्ये “तामिळनाडूमध्ये जलिकट्टू, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, केरळ, गुजरात या राज्यांत बैलगडा शर्यतीसाठी पारपंरिक खेळ म्हणून बैलांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. तसेच हे खेळ परंपेचा भाग म्हणून खेळले जाऊ शकतात,” असे या अधिसूचनेत सांगण्यात आले होते. ही अधिसूचना जारी करताना मात्र प्राण्यांना त्रास होऊ नये, त्यांना वेदना कमी व्हाव्यात यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या.

पाच सदस्यीय खंडपीठाने याचिका फेटाळली

याच काळात काही राज्य सरकारांनी प्राण्यासोबत केली जाणारी क्रुरता रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यात काही सुधारणा केल्या. या सुधारणांना पुढे न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र पाच सदस्यीय खंडपीठाने या याचिका फेटाळून लावत कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांनी केलेल्या दुरुस्त्या कायम ठेवल्या.

कंबाला खेळात भेदभाव?

दरम्यान, कर्नाटकातील कंबाला या खेळाला मोठी परंपरा असली तरी या खेळादरम्यान कोरगा समुदायाशी भेदभाव होतो, असा आरोप केला जातो. कोरगा समुदायाला अस्पृश्य समजले जात होते. भूतकाळात कंबाला या खेळादरम्यान कोरगा समुदायाला योग्य ती वागणूक मिळत नव्हती. आजदेखील या खेळावर वरिष्ठ जातीतील लोकांचेच वर्चस्व आहे. कनिष्ठ जातीतील लोक या खेळादरम्यान कमी दर्जाची कामे करतात, असा आरोप केला जातो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka kambala festival organised in bangalore know what is kambala and why court ban on it prd

First published on: 27-11-2023 at 18:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×