ज्येष्ठ नेते सिद्धरामैय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे गेले काही महिने सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेवर पडदा पडला. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा सर्वोच्च पदाचा मार्ग मोकळा झाला.

सिद्धरामय्या यांची सत्ता-चलाखी

काँग्रेस सत्तेत असलेल्या चार राज्यांपैकी आकाराने कर्नाटक राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्वाचे. तेलंगण, हिमाचल प्रदेशच्या तुलनेत येथे लोकसभेच्या अधिक जागा आहेत. तर केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार आहे. अशात काँग्रेससाठी कर्नाटकमध्ये पुन्हा २०२८ मध्ये सत्तेत येणे हे पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणासाठी गरजेचे ठरते. मे २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये भाजपची राजवट संपवून काँग्रेसला संधी मिळाल्यावर सिद्धरामैय्या-डी.के.शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी प्रत्येकी अडीच वर्षे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मात्र नोव्हेंबरमध्ये अडीच वर्षे पूर्ण होऊनही सिद्धरामैय्या यांनी पद सोडले नसल्याने काँग्रेस अंतर्गत राजकारणात अस्वस्थता होती. विशेषत: शिवकुमार समर्थकांत चलबिचल होती. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींनी बैठक घेत नेतृत्व बदलावर सिद्धरामैय्यांना राजी केले. त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला. मात्र ७७ वर्षीय सिद्धरामैय्या दिल्लीच्या राजकारणात जातील का, याबाबत शंका आहे. आजही काँग्रेसचे आमदार मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहेत.

‘अहिंदा’ समीकरण प्रभावी

कर्नाटकमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम सिद्धरामैय्या यांचा आहे. यापूर्वी देवराज अर्स यांच्या नावे हा पराक्रम होता. जनता परिवारातून राजकीय कारकीर्द सुरु करणारे सिद्धरामैय्या २००५ मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले. राज्यात सात ते आठ टक्के असलेल्या कुरबा समुदायातून ते येतात. अल्पसंख्याक, दलित समुदायाला एकत्र आणून राजकीय समीकरण देवराज अर्स यांनी तयार केले. पुढे सिद्धरामैय्या यांनी त्या आधारे काँग्रेसला पुन्हा यश मिळवून दिले. दक्षिणेत भाजपला फारसे यश मिळत नसताना कर्नाटकमध्ये मात्र पक्षाची सत्ता होती. येथे भाजपच्या हिंदुत्वाला तोंड देण्यासाठी ही रणनीती कामी आली. उत्तम रणनीतीकार, विविध समाज घटकांचे समर्थन सिद्धरामैय्या यांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला त्यांना हटविणे सहज शक्य झाले नाही. आताही नव्या मंत्रिमंडळात आपल्या समर्थकांनी महत्त्वाची खाती मिळावीत यासाठी त्यांचा आग्रह राहण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेवरही प्रभुत्वासाठी ते प्रयत्नशील राहतील अशी चिन्हे आहेत.

एकीचा संदेश देण्याचा प्रयत्न

सिद्धरामैय्या यांनी नाश्त्यासाठी मंत्र्यांना निवासस्थानी बोलावले होते. त्यात शिवकुमारही सहभागी झाले होते. यातून दोघांमध्ये एकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवकुमार यांनी सिद्धरामैय्या यांचे आशीर्वाद घेत, सत्ताबदलात कोणतीही कटुता नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये ४५ मिनिटे चर्चाही झाली. यामुळे काँग्रेस श्रेष्ठींना दिलासा मिळाला. विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. सत्ताविरोधी वातावरण निर्माण होऊ नये याची दक्षता नव्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. राज्यात काँग्रेसचा सामना थेट भाजपशी आहे. देवेगौडा यांना धर्मनिरपेक्ष जनता दल जुन्या म्हैसूर पट्ट्यापलीकडे विशेष प्रभावी नाही. देवेगौडा हे आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत. त्यामुळे काँग्रेसविरोधातील मते मोठ्या प्रमाणात विभागली जाणार नाहीत. अशा स्थितीत सत्ता राखताना काँग्रेसची कसोटी लागेल. नियोजित मुख्यमंत्री शिवकुमार हे कुशल राजकारणी तर मानले जातातच, पण काँग्रेससाठी संसाधन उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे पक्ष वर्तुळात सांगितले जाते.

‘संकटमोचक’ शिवकुमार

शिवकुमार हे राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या वोक्कलिगा समुदायातून येतात. राज्यात हा समुदाय १० ते १२ टक्के आहे. जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्यामुळे वोक्कलिगा मते ही मोठ्या प्रमाणात धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे वळत. मात्र शिवकुमार मुख्यमंत्री होतील या अपेक्षेने २०२३ मध्ये काँग्रेसला या समुदायातून मोठा पाठिंबा मिळाला होता. जुन्या म्हैसूर पट्ट्यात प्रभावी आहेत. तेथे काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. राज्यात विधानसभेच्या २२४ जागा असून, जुना म्हैसूर भागात ६१ आमदार आहेत. यात ९ जिल्हे आहेत. शिवकुमार यांनी १९८० मध्ये विद्यार्थी दशेपासून काँग्रेस संघटनेत सक्रिय भूमिका बजावली. प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्रिमंडळात विविध खात्यांचा अनुभव ६४ वर्षीय शिवकुमार यांना आहे. काँग्रेसकडून विविध राज्यांमध्ये प्रचाराची जबाबदारी त्यांनी सांभाळली. संकटमोचक म्हणूनही त्यांची ओळख आहे. पक्षात कोठे समस्या निर्माण झाल्यास अनेक वेळा शिवकुमार यांना त्या राज्यात पाठवले जाते. आता कर्नाटकात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचे आव्हान त्यांच्या पुढे असेल. काँग्रेस श्रेष्ठींनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला तो त्यांना सार्थ ठरवावा लागेल.