Psychology of Burger Outside, Salad Inside Diet Trend: रस्त्याने जात असताना येणारा आणि भूक चाळवणारा भजीचा मोहक गंध किंवा एखाद्या निवांत संध्याकाळी काहीतरी चटपटीत खाण्याची होणारी इच्छा …आणि अचानक आपण डाएट करतोय याची होणारी जाणीव. कदाचित ही जाणीव एखाद्या मोठ्या दुखा:प्रमाणे वेदनादायी नसेलही, परंतु खवय्यांसाठी मात्र मनाला चटका लावणारी नक्कीच असते. आपल्यासारखी सामान्य माणसंच नाही तर सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत.

अलीकडेच, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी अमिताभ बच्चन यांच्या समोर याची कबुली दिली. बिग बींनी त्यांना त्यांच्या फिटनेस आणि खाण्यापिण्याच्या आवडीविषयी प्रश्न विचारला होता. कार्तिक आर्यनने गमतीने संगितले, मी माझ्या मनाला समजावले आहे. शिवाय, माझ्या आवडीच्या पदार्थांना हेल्दी फूडमध्ये बदलले आहे. तो सांगतो, जेव्हा आम्ही बर्गर ऑर्डर करतो, तेव्हा त्यात बन नसतोच. यालाच दुजोरा देत अनन्या सांगते, म्हणजे नाव बर्गरचचं असतं, बाहेरून बर्गर पण आत सॅलेड असतं. त्यामुळे बर्गर खाल्याचं समाधान मिळतं.

ही गोष्ट फक्त कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचीच नाही. तर, शहरी भागात राहणार्‍या तरुण वर्गात हा वाढता ट्रेंड दिसून येत आहे. तरुण वर्गात क्लीन आणि हेल्दी फास्ट फूड आणि कमी कॅलरी असलेल्या पदार्थांची लोकप्रियता वाढत आहे. बनशिवाय बर्गर, ब्रेड शिवाय सँडविच, भाज्यांचा क्रस्ट (बेस) असलेला पिझ्झा अशी नाव आता फास्ट फूडच्या यादीत सामाविष्ट झाली आहेत. कोणत्याही अपराधी भावनेशिवाय चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा असणार्‍या भारतीयांच्या आहारात हे पदार्थ आपलं स्थान बळकट करत आहेत. त्यामुळेच या वाढत्या ट्रेंडमागील मानसिकता समजून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मानसशास्त्रज्ञ Ms Mehezabin Dordi (सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल) यांच्याशी संपर्क साधला.

जंक फूडचं नाव, पण आत हेल्दी घटक आणि त्यातून मिळणारं समाधान यांचा परस्पर संबंध काय आहे? याविषयी दोर्डी सांगतात, अन्न ग्रहण केल्यानंतर मिळणारं समाधान हे केवळ कॅलरी किंवा चरबीच्या प्रमाणावर अवलंबून नसतं. त्या पदार्थाच्या पूर्वानुभवावरही काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे, तो पदार्थ कसा दिसतो यावरून इंद्रिय मेंदूला संकेत पाठवतात. म्हणूनच आत सॅलेड असले तरी तो पदार्थ बाह्य आकार, पोत किंवा गंध यांची नक्कल करून न्यूरल मार्गांना सक्रिय करतो.

आधीच्या अनुभवावरून अंदाज बांधणं हा मुळातच मेंदूचा स्वभाव आहे. त्यामुळे बर्गरसारखा पदार्थ समोर येताच आतले घटक वेगळे असले तरी मेंदू मूळ बर्गरप्रमाणेच समाधान मिळणारं सर्किट सक्रिय करतो. त्यामुळे पोत, कुरकुरीतपणा, उबदारपणा आणि उमामी चवीमुळे oral satisfaction मिळते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर मेंदूसाठी अन्नाइतकीच त्याची बाह्य ओळख आणि त्याभोवतीच्या पद्धती महत्त्वाच्या असतात.

प्लेसिबो अनुभव

एखादी गोष्ट आपण खाताना किंवा अनुभवताना ती हेल्दी आहे, चांगली आहे असे आपल्या मनात ठामपणे वाटत असेल, तर त्या विचारामुळेच आपल्याला समाधान वाटते. प्रत्यक्ष चव किंवा घटक तितके महत्त्वाचे नसतात; त्या पदार्थाबद्दल आपण काय समजतो, त्याचा अर्थ आपल्या मनासाठी काय आहे, यावर अनुभव ठरतो. जसे प्लेसिबो औषध घेतल्यावर प्रत्यक्ष औषध नसतानाही बरे वाटते, तसेच मेंदू इथेही तसाच वागतो.

पदार्थाशी जोडल्या गेलेल्या भावना

पदार्थांना दिली जाणारी नावे तृप्तीच्या अनुभवात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या पदार्थाला बर्गर किंवा पिझ्झा असे नाव दिले की, त्याच्याशी आपोआप एक भावनिक ओळख तयार होते असे डोर्डी सांगतात. मुळात मेंदू केवळ कॅलरी किंवा पोषकद्रव्यांवर समाधान मानत नाही; तो त्या पदार्थाशी जोडलेल्या कथा, आठवणी, अनुभव आणि प्रतिकांनाही प्रतिसाद देतो. त्यामुळेच बन नसला, घटक वेगळे असले तरी बर्गर म्हणून ओळख मिळालेला पदार्थ मनाला तितकच समाधान देऊ शकतो.

अनेक लोकांसाठी अशा आरोग्यदायी आवृत्त्या उपयुक्त ठरतात, कारण त्या वंचितपणाची भावना कमी करतात. सतत काहीतरी नाकारले जात आहे, आपल्याला आवडणारे पदार्थ खाण्यास मनाई आहे, अशी भावना निर्माण झाली की, ती binge restrict चक्राला चालना देते. त्याउलट, परिचित चव आणि स्वरूप असलेले, पण तुलनेने हलके किंवा आरोग्यदायी पर्याय उपलब्ध असतील, तर मनावरचा ताण कमी होतो. जेव्हा मेंदूला “मला काहीतरी नाकारले जात आहे” असे वाटत नाही, तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होते आणि ते दीर्घकाळ टिकते.

मात्र, मानसशास्त्रज्ञ याच वेळी एक महत्त्वाचा इशाराही देतात. अन्नाबाबत कठोर नियम लावणे किंवा नैतिक शिक्के मारणे… जसे की, बर्गर वाईट आहे किंवा हीच एकमेव खाण्याची योग्य पद्धत आहे, हे दीर्घकाळात नुकसानकारक ठरू शकते. अशा विचारांमुळे मनात नकळत बंधने तयार होतात. परिणामी, जे पदार्थ निषिद्ध ठरवले जातात, त्यांच्याविषयीची ओढ अधिक वाढते आणि योग्य वेळ मिळताच अतिखाणे किंवा नंतर अपराधी भावना वाटणे असे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणूनच, संतुलित दृष्टिकोन ठेवणे आणि अन्नाकडे अपराधी भावनेऐवजी समजूतदारपणे पाहणे अधिक आरोग्यदायी ठरते.