Kashmiri Pandit Wandhama Massacre Investigation : जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेने १९९८ मध्ये घडलेल्या बहुचर्चित वंधामा हत्याकांडाचा तपास पुन्हा सुरू केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या या पथकाकडून २०२३ पासून काश्मिरी पंडितांच्या हत्यांशी संबंधित अनेक प्रकरणांचा फेरआढावा घेतला जात आहे. त्यापैकीच वंधामा हत्याकांड हे एक महत्वाचे प्रकरण आहे. १९८० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादाला सुरुवात झाल्यानंतर तेथील पंडितांच्या एकापाठोपाठ एक हत्या करण्यात आल्या. मृतांमध्ये फुटीरतावादी संघटना जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक मोहम्मद मकबूल भट याला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश नीलकंठ गंजू आणि तत्कालीन राज्यातील भाजपाचे उपाध्यक्ष टीका लाल टपलू यांच्याही समावेश होता. त्यानंतरच्या काळात संग्रामपोरा, वंधामा आणि नादिमार्ग येथे काश्मिरी पंडितांच्या तीन मोठ्या हत्याकांडांच्या घटना घडल्या. त्याविषयी…
काश्मिरी पंडितांचे तीन मोठे नरसंहार कसे घडले?
२२ मार्च १९९७ रोजी मध्यरात्री बडगाम जिल्ह्यातील संग्रामपोरा गावात सात पंडितांची हत्या करण्यात आली होती. २६ जानेवारी १९९८ च्या मध्यरात्री काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील वंधामा गावात दहशतवाद्यांचा एक गट आला. त्यांनी काश्मिरी पंडितांना एका ठिकाणी एकत्र केले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात चार मुले आणि नऊ महिलांसह २३ काश्मिरी पंडितांना आपले प्राण गमावावे लागले होते. त्यानंतर २४ मार्च २००३ रोजी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नदिमार्ग गावात २४ काश्मिरी पंडितांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती.
काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची आकडेवारी
२००८ मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्याकडे नोंदवलेल्या प्रकरणांवर एक अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार, १९८९ ते २००८ या कालावधीत दहशतवाद्यांनी तब्बल २०९ काश्मिरी पंडितांची हत्या केली होती. त्यापैकी १९९० मध्ये १०९ जणांची हत्या झाली होती. या आकडेवारीत संग्रामपोरा, वंधामा आणि नादिमार्ग येथील हत्याकांडांचाही समावेश होता. त्यावेळी पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १४० गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी बहुतांश प्रकरणे आरोपी किंवा ठोस पुरावे न मिळाल्याने ‘अनट्रेस्ड’ म्हणून बंद करण्यात आली होती. मार्च २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जम्मू-काश्मीर विधानसभेत काश्मिरी पंडितांच्या हत्यांची माहिती दिली. त्यानुसार, १९८९ पासून दहशतवाद्यांनी २१९ काश्मिरी पंडितांची हत्या केली होती. २०११ मध्ये श्रीनगरस्थित काश्मिरी पंडित संघटना काश्मिरी पंडित संघर्ष समितीने असा दावा केला होता की, १९९० पासून किमान ३९९ पंडितांची हत्या झाली आहे. त्यापैकी ७५ टक्के हत्या पहिल्याच वर्षात झाल्याचे समितीने म्हटले होते.
हत्याकांडाच्या पुन्हा तपासासाठी याचिका
२०१७ मध्ये काश्मिरी पंडित संघटनेने या सर्व हत्याकांडांचा नव्याने तपास करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, त्याचवर्षी जुलैमध्ये तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणांना २७ वर्षे उलटून गेली असून, आता पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे, असे त्यावेळी खंडपीठाने नमूद केले होते. डिसेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काश्मिरी पंडितांच्या कथित ‘वंशसंहाराची’ चौकशी करण्याची मागणी करणारी सुधारणा याचिकाही फेटाळून लावली. त्यावर प्रतिक्रिया देताना काश्मीरमधील मानवाधिकारांसाठी काम करणारी प्रसिद्ध संघटना ‘जम्मू काश्मीर कोअॅलिशन ऑफ सिव्हिल सोसायटीने न्यायालयाच्या निर्णयावर उघडपणे टीका केली होती.
काश्मिरी पंडितांचा आरोप काय होता?
‘गुन्ह्याला कधीही कालमर्यादा नसते’ या प्रस्थापित कायदेशीर तत्त्वापासून हा निर्णय पूर्णपणे फारकत घेणारा आहे. हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार न्याय मिळवण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसते. काश्मिरी पंडित आणि इतर अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या सर्व घटनांचा आजवर निष्पक्ष तपास झालेला नाही. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये पद्धतशीर आणि संस्थात्मक स्वरूपाचा हिंसाचार झाला आहे. त्यातील बहुतांश हिंसाचार भारतीय राज्य यंत्रणेच्या हातून झाला असल्याचा आरोप ‘जम्मू काश्मीर कोअॅलिशन ऑफ सिव्हिल सोसायटी’ या संघटनेकडून करण्यात आला होता. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे पुरावे उपलब्ध असतानाही आजपर्यंत सुरक्षा दलांच्या जवानांविरोधात न्यायालयांमध्ये जवळपास कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही संघटनेने केला होता.
‘एसआयए’कडून प्रकरणांचा फेरतपास सुरू
सर्वोच्च न्यायालयाने काश्मिरी पंडितांच्या संघटनेची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर सात महिन्यांनी एसआयएने हत्याकांडाशी संबंधित पहिल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण काश्मिरी पंडित न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्येशी संबंधित आहे. नोव्हेंबर १९८९ मध्ये श्रीनगरमध्ये ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (JKLF) या संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी गंजू यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी जेकेएलएफचा संस्थापक मोहम्मद मकबूल भट याला फाशीची शिक्षा सुनावली होती. गंजू यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर एसआयएने परिचारिका सरला भट यांच्या अपहरण आणि हत्येचे प्रकरणही पुन्हा तपासासाठी उघडले आहे. १९९० मध्ये श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वसतिगृहातून सरला भट यांचे अपहरण करण्यात आले होते. याशिवाय, १९९० मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये कवी आणि लेखक सर्वानंद प्रेमी कौल तसेच त्यांच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण आणि १९८९ मध्ये श्रीनगरमध्ये भाजप नेते टीका लाल टपलू यांच्या हत्या प्रकरणाचाही एसआएकडून तपास सुरू आहे.
सरला भट यांच्या हत्याप्रकरणात आरोपपत्र
गंजू यांच्या हत्येच्या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली नसली, तरी सरला भट यांच्या हत्येच्या प्रकरणात एसआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात तुरुंगात असलेला जेकेएलएफचा अध्यक्ष यासिन मलिक याच्यासह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. पाच आरोपींपैकी तिघांचा मृत्यू झाला असून, एक आरोपी पाकिस्तानमध्ये आहे. याबाबत एसआयएच्या सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, काश्मिरी पंडितांच्या हत्यांच्या प्रकरणांचा पुन्हा तपास करून नव्याने पुरावे गोळा करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून वंधामा हत्याकांडाचे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. काश्मीरमधील एसआयएने अनेक दशकांपूर्वीच्या या प्रकरणांचा केंद्रित पद्धतीने तपास सुरू केला आहे. हा तपास अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेचा भाग आहे. या घटनांमागील कट उघड करण्यासाठी विश्वासार्ह पुरावे शोधून ते सिद्ध करण्यासाठी आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे दोषींना ओळखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे एसआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
