Less Sleep Effects on Human Body : कामाच्या धावपळीत तुम्ही किती तास जागे राहू शकता? राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या अभिनेत्री कीर्ती सुरेश यांनी तब्बल ४१ तास सलग झोप न घेता काम केल्याचा खुलासा केला आहे. चित्रपटांच्या शूटिंगमुळे त्यांना जवळपास २०-२० तास काम करावे लागले आहे. दोन कामांमध्ये त्यांना फक्त एक तासाचा ब्रेक मिळत होता, असा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दीर्घकाळ झोप न घेतल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
कीर्ती सुरेश यांचा अनुभव अपवाद नाही. आज अनेक जण काम पूर्ण करण्याच्या नादात स्वतःची झोपच गमावत आहेत. डॉक्टरांची दीर्घ ड्युटी, आयटी कंपन्यांमधील डेडलाईन, स्टार्टअप उभारणारे तरुण, कॉर्पोरेट अधिकारी किंवा आपत्कालीन सेवेत काम करणारे कर्मचारी अशा अनेकांना रात्रभर जागून काम करावे लागते. ‘आता काम करू आणि नंतर झोप भरून काढू,’ असा विचार अनेक जण करतात. मात्र, झोपेच्या बाबतीत केलेली ही तडजोड शरीराला मोठी किंमत मोजायला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा झोपेविषयक तज्ज्ञ देत आहेत.
दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील श्वसन, अतिदक्षता आणि निद्रा चिकित्सा विभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. निखिल मोदी सांगतात, “एक रात्र झोप झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो; पण जवळपास दोन दिवस सलग जागे राहिल्यास मेंदू आणि शरीरावर गंभीर ताण येतो. झोप ही चैनीची गोष्ट नसून, शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आवश्यक असलेली जैविक गरज आहे.”
संशोधनानुसार, सलग १७ ते १९ तास जागे राहिल्यानंतर व्यक्तीची निर्णयक्षमता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि प्रतिक्रिया देण्याचा वेग कमी होतो. त्याचा ०.०५ टक्के इतक्या अल्कोहोलच्या प्रमाणाइतका (BAC) आपल्या शरीरावर परिणाम होतो. तर, २४ तास झोप न घेतल्यास हा परिणाम BAC ०.१० टक्क्यांवर पोहोचू शकतो. अशा वेळी कामात छोट्या चुका होण्याची शक्यता वाढते, महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होतात आणि प्रसंगावधान राखणे कठीण होते.
जास्त वेळ जागे राहिल्यावर शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
कामाच्या व्यापात अनेक जण सर्वांत आधी झोपेशीच तडजोड करतात. एखाद्या दिवशी उशिरापर्यंत जागरण केल्याने फारसा त्रास होत नाही. मात्र, सलग अनेक तास किंवा दिवस झोप न घेतल्यास शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता कमी होऊ लागते. आपल्या शरीराचे नैसर्गिक झोप व जागेपणाचे चक्र असते. हे चक्र सतत बिघडत राहिल्यास केवळ शरीरावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
सर्वप्रथम मेंदूवर होतो परिणाम
दीर्घकाळ जागे राहिल्यानंतर मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. लक्ष केंद्रित करणे, माहिती समजून घेणे, निर्णय घेणे आणि पटकन प्रतिक्रिया देणे कठीण होते. त्यामुळे कामात चुका होण्याची, अपघात होण्याची किंवा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या कमतरतेचा सर्वाधिक परिणाम निर्णयक्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागांवर होतो. त्यामुळे चिडचिड वाढणे, मूड सतत बदलणे, लक्ष विचलित होणे आणि तणाव हाताळणे कठीण जाणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
‘मायक्रोस्लीप’चा मोठा धोका
सलग २४ ते ३६ तास जागे राहिल्यानंतर मेंदू काही सेकंदांसाठी अचानक काम करणे थांबवू शकतो, यालाच ‘मायक्रोस्लीप’ म्हणतात. या काही सेकंदांत व्यक्तीला कळतही नाही की, तिचा मेंदू क्षणभर झोपेच्या अवस्थेत गेला आहे. त्यामुळे ती व्यक्ती जागी असल्यासारखी दिसत असली तरी प्रतिसाद देऊ शकत नाही. अशा वेळी वाहन चालवणे, यंत्रसामग्री हाताळणे किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते.
हार्मोन्स आणि चयापचयावरही परिणाम
पुरेशी झोप ही केवळ शरीराला विश्रांती देत नाही, तर भूक, तणाव आणि ऊर्जा नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन राखण्याचेही महत्त्वाचे काम करते. पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरातील कॉर्टिसोलसारख्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढू शकते. त्याचबरोबर भूक लागणे आणि पोट भरल्याची जाणीव करून देणाऱ्या हार्मोन्सचाही समतोल बिघडतो.
परिणामी वारंवार भूक लागणे, गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा वाढणे आणि खाण्याचे वेळापत्रक बिघडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, झोपेची कमतरता ही रोजची सवय बनली, तर वजन वाढणे, चयापचय (मेटाबॉलिझम) मंदावणे आणि इतर चयापचयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो परिणाम
आपण झोपेत असताना शरीरात अनेक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे सुरू असतात. झोपेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते, पेशींची दुरुस्ती होते आणि दिवसभराचा थकवा दूर होतो. मात्र, वारंवार अपुरी झोप झाल्यास शरीराची आजारांचा सामना करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि आजार किंवा थकवा दूर होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
हृदय आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम
पुरेशी झोप न मिळाल्यास हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके तात्पुरते वाढू शकतात. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो. ही समस्या दीर्घकाळ सुरू राहिल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो, विशेषतः आधीपासूनच आरोग्य समस्याग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो.
झोपेचा मानसिक आरोग्याशीही जवळचा संबंध आहे. झोप अपुरी झाल्यास तणाव वाढणे, सतत मूड बदलणे, कामात उत्साह कमी होणे आणि दैनंदिन समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तसेच, आधीपासूनच चिंता (Anxiety) किंवा नैराश्य (Depression) असलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आणखी गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भरपाईची झोप किती महत्त्वाची?
अनेकांचे कामाचे वेळापत्रक व्यग्रतापूर्ण असते. अशावेळी जबाबदाऱ्या आणि पुरेशी विश्रांती यांच्यात समतोल राखणे त्यांना अवघड जाते. अशा परिस्थितीत फक्त एकाच दिवशी जास्त वेळ झोपून अपुऱ्या झोपेची भरपाई केली जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. वारंवार झोप अपुरी होत असल्यामुळे शरीरावर कायमस्वरूपी दुष्परिणाम होऊ शकतात. ते लक्षात घेता, काम आणि विश्रांती यांमध्ये योग्य तो समतोल राखला जाणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, दररोज ठरावीक वेळी झोपणे, कामादरम्यान पुरेशी विश्रांती घेणे, संतुलित आहार घेणे आणि शरीर थकलेले असल्याचे संकेत वेळेवर ओळखणे हेच आरोग्य टिकविण्यासाठी महत्त्वाचे आहे. झोप ही केवळ आराम करण्याची वेळ नसून, मेंदू आणि शरीराची दुरुस्ती, संतुलन आणि पुढील दिवसासाठी आपल्याला तयार करणारी अत्यावश्यक जैविक प्रक्रिया आहे.
