Ketan Agrawal Siya Goyal : जून महिन्यात लोहगडाच्या ४०० फूट खोल दरीत पडून व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच त्याच्या हत्येचा भयंकर कट रचल्याचे तपासातून समोर आले. आता ७९ दिवसांनंतर पुन्हा हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सुरुवातीला ‘ट्रेकिंग’दरम्यान केतन अग्रवालचा अपघात झाला, असे भासवण्यात आले. मात्र, तपास पुढे गेला आणि या प्रकरणामागे प्रेमसंबंधातून रचलेला हत्येचा कट असल्याचा दावा पोलिसांनी केला. आता सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरीच्या मित्राला अटक झाल्याने या प्रकरणात आणखी एक नवा धागा जोडला गेला आहे.
केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आता २२ वर्षीय रितेश हांगे याला अटक करण्यात आली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर झालेली ही अटक या प्रकरणातील महत्त्वाचा धागा मानला जात आहे. कारण, आतापर्यंत सिया आणि चेतन यांच्याभोवतीच तपास फिरत होता. त्यानंतर आता ५ सप्टेंबर रोजी रितेश हांगे याला अटक झाली आहे. म्हणजेच केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी तब्बल ७९ दिवसांनी तिसरी अटक झाली आहे.
रितेश हांगे हा चेतन चौधरीचा मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हत्येच्या कटाची त्याला आधीपासूनच माहिती असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हेगारी कट (Criminal Conspiracy) रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, सिया आणि चेतन यांच्या प्रेमसंबंधात केतन अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. मात्र, या कटात रितेशची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास सध्या सुरू आहे.
पूर्वनियोजित हत्येचा तपास आता आणखी मजबूत?
केतन अग्रवालचा मृत्यू हा ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात नव्हता. तपासात समोर आलेल्या मुद्द्यांवरून हत्येचा संशय बळावत होता; मात्र हे सिद्ध करणे पोलिसांसाठी आव्हान ठरत होते. परंतु, रितेश हांगेच्या अटकेनंतर हा कट आधीपासूनच रचला गेला होता, याचा थेट पुरावा हाती लागला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनविरोधात १८ जूनच्या आधी आखलेल्या कटाची रितेशला माहिती होती. त्या योजनेनुसार आधी केतनचे हात-पाय मोडून, त्याला जखमी करायचे आणि त्यानंतर त्याची हत्या करायची, असा डाव आखला गेला होता. मात्र, पुढे ही ‘योजना’ बदलण्यात आली आणि १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रितेशचा सिया आणि चेतन या दोघांशीही हत्येपूर्वी संपर्क होता.
डिजिटल पुरावे ठरले महत्त्वाचे
फॉरेन्सिक पथकाने डिलीट केलेला डिजिटल डेटा मिळवल्यानंतर पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. चेतन चौधरीच्या मोबाईलमधील एन्क्रिप्टेड मेसेज आणि डिलीट केलेले चॅट्स तपासल्यानंतर पोलिसांना रितेश हांगे आणि मुख्य आरोपी सिया यांच्यात झालेल्या संभाषणांची माहिती मिळाली. यावरून केतनला किल्ल्यावरून ढकलण्याबाबत, तसेच त्यानंतर पुरावे नष्ट करण्याबाबत चर्चा झाल्याचे समोर आले. या डिजिटल पुराव्यांमुळे हत्येच्या कटाबाबत पोलिसांना तपास पुढे नेण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावे मिळाले आहेत, जे कोर्टातील पुढील सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
हत्येनंतर पुरावे लपवण्याचा प्रयत्न?
रितेश हांगेची भूमिका केवळ हत्येच्या नियोजनापुरती मर्यादित होती की, त्याने जाणीवपूर्वक गुन्हा लपवला याबद्दल पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी चेतन चौधरी अनेक तास ऑफलाइन होता. त्यानंतर त्याने रितेशची भेट घेतली होती. हत्येनंतर सिया गोयलचाही रितेशचीसोबत संपर्क सुरू होता. आता या सर्व घटना आणि तिघांमधील संपर्काची वेळ तपासून पाहिली जात आहे. डिजिटल पुरावे नष्ट करणे, खोटे पुरावे तयार करणे किंवा पोलिसांचा माग काढणे कठीण व्हावे याकरिता ठरावीक कोडवर्ड वापरण्यासाठी रितेशने सिया आणि चेतनला मदत केली होती का, याचा तपास सुरू आहे.
आरोपींच्या परस्परविरोधी दाव्यांची पडताळणी
रितेश हांगेच्या अटकेपूर्वी चौकशीदरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी एकमेकांवर आरोप केल्याचे समोर आले होते. हत्येचा कट नेमका कोणी रचला, यावर दोघांनीही वेगवेगळे दावे केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता रितेशला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. रितेशची जबाब सिया आणि चेतनच्या जबाबांशी पडताळून पाहण्याची संधी तपास यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे हत्येमागे नेमकी कोणाची प्रमुख भूमिका होती, हे स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता आणखी व्यापक झाला आहे. हत्येपूर्वी केतनच्या आयुष्यात घडलेल्या काही संशयास्पद घटनांचाही तपास केला जात आहे. त्यापैकी एक म्हणजे बालीमधील प्री-वेडिंग शूटच्या आधी मुंबईतील एका फूड मॉलमधून केतनचा पासपोर्ट रहस्यमयरीत्या चोरीला जाणे. या घटनेचा आणि हत्येचा काही संबंध होता का, तसेच केतनचे आयुष्य उद्धवस्त करण्यात आणखी कोणी मदत केली होती का, याचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सिया गोयल, चेतन चौधरी व रितेश हांगे या तिघांची नावे समोर आली आहेत. मात्र, लोहगड किल्ल्यावर नेमकं काय घडलं, हा कट कधीपासून रचला गेला आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याची उत्तरं पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.
