डॉ.देवदत्त पोखरकर
Kewda Plant History and Uses: “तुझ्या दरवळत्या सुगंधाने सारी वस्ती मोहोरून गेली, जणू निर्जन वाळवंटात कुणी केवड्याची सुवासिक उधळण केली”….असा हा सुगंधी केवडा…स्वतःच्या मोहक वासाने ओसाड वातावरणालाही चैतन्यमय करून टाकतो. त्याचा मंद, मादक सुगंध मनाला प्रसन्न करतो. केवड्याच्या मोहक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधामुळे तो भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. केवड्यापासून तयार होणारे अत्तर, केवडा जल आणि सुगंधी उत्पादने शतकानुशतके वापरली जात आहेत.
अलीकडेच केवडा या वनस्पतीबाबत झालेल्या एका महत्त्वपूर्ण पुरावनस्पती शोधामुळे तिच्या प्राचीन काळापासून असलेल्या अस्तित्वाचे नवे पुरावे लाभले आहे. आसाममधील माकूम कोलफिल्ड (कोळश्याच्या खाणीत) येथे सापडलेल्या जीवाश्मांच्या अभ्यासातून केवडा वनस्पती भारतीय उपखंडात किमान २४ दशलक्ष, म्हणजेच सुमारे २.४ कोटी वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शोधामुळे भारतातील प्राचीन वनस्पतीसंपदा, उष्णकटिबंधीय जंगलांचा इतिहास आणि हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर वनस्पतींची उत्क्रांती यांचा अभ्यास करण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे.
केवड्याचे शास्त्रीय नाव Pandanus odorifer असे आहे, ही उष्णकटिबंधीय हवामानात वाढणारी सदाहरित वनस्पती आहे. ही वनस्पती प्रामुख्याने समुद्रकिनारी, दलदलीच्या प्रदेशात आणि ओलसर जमिनीत उत्तम वाढते. भारतातील ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ तसेच महाराष्ट्रातील काही किनारी भागांत तिची नैसर्गिक अधिवासात आढळते. केवड्याची पाने लांब, अरुंद आणि टोकदार असतात. त्यांच्या कडांवर लहान पण तीक्ष्ण काटे असल्यामुळे त्यांना हाताळताना काळजी घ्यावी लागते. या वनस्पतीची नर आणि मादी अशी स्वतंत्र झाडे असतात. नर झाडांवर येणारी फुले अत्यंत सुगंधी असतात आणि त्यांच्यापासूनच केवडा अत्तर व केवडा जल तयार केले जाते. मादी झाडांना फळे येतात; मात्र सुगंधी उत्पादनांसाठी नर फुलांनाच अधिक महत्त्व आहे. फुलांमधून दरवळणारा गोड, मादक आणि नैसर्गिक सुगंध हीच केवड्याची खरी ओळख आहे.
भारतीय संस्कृतीत केवड्याला प्राचीन काळापासून विशेष स्थान आहे. अनेक धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि उत्सवांमध्ये सुगंधी फुलांचा वापर केला जातो. केवड्याचा सुगंध मनाला प्रसन्न करणारा मानला जात असल्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांत त्याचा समावेश केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीतही केवड्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवडा जलाचा वापर बिर्याणी, पुलाव, शाही मिठाई, रसगुल्ला, रसमलाई, खीर, फिरनी, शरबत आणि विविध पेयांमध्ये केला जातो. अगदी अल्प प्रमाणात वापरले तरी त्याचा सुगंध संपूर्ण पदार्थाला वेगळी ओळख देतो. नैसर्गिक सुगंधामुळे कृत्रिम सुवासिक द्रव्यांपेक्षा केवड्याला अधिक पसंती दिली जाते. सुवसिक अत्तर निर्मिती उद्योगातही केवडा अत्तराला मोठी मागणी आहे. नैसर्गिक अत्तर तयार करण्यासाठी त्याचा वापर अनेक देशांमध्ये केला जातो.
केवडा ही केवळ सुगंधी वनस्पती नसून औषधी गुणधर्मांनीही समृद्ध आहे. आयुर्वेदात तिचा उल्लेख शीतल, सुगंधी आणि शरीराला ताजेतवाने करणारी वनस्पती म्हणून आढळतो. पारंपरिक औषधांमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तिचा वापर केला जातो. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये केवड्याच्या अर्काचा समावेश केला जातो. सुगंधोपचारामध्येही तिच्या अत्तराचा वापर मनःशांती, एकाग्रता आणि ताजेपणा मिळवण्यासाठी केला जातो. आधुनिक विज्ञान या गुणधर्मांचा अधिक सखोल अभ्यास करत असून नैसर्गिक सुगंधी वनस्पतींच्या संशोधनात केवड्याला महत्त्वाचे स्थान मिळत आहे.
आसाममधील माकूम कोलफिल्ड येथे झालेला जीवाश्मांचा शोध हा भारतीय वनस्पतिशास्त्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. संशोधकांना येथे सापडलेल्या जीवाश्मांचा सखोल अभ्यास केल्यानंतर ते केवडा वनस्पतीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. या जीवाश्मांचे वय सुमारे २४ दशलक्ष वर्षे असल्याचे वैज्ञानिकांनी निश्चित केले आहे. याचा अर्थ असा की आज आपण ज्या केवडा वनस्पतीचा सुगंध अनुभवतो, तिचे पूर्वज लाखो वर्षांपूर्वी भारतातील दाट उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये वाढत होते. हा शोध भारतातील वनस्पतींच्या उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. पृथ्वीवरील हवामानात वेळोवेळी मोठे बदल झाले, खंडांची रचना बदलली आणि अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या. अशा परिस्थितीत केवडा वनस्पतीने स्वतःला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत आजपर्यंत टिकून राहिल्याचे या संशोधनातून स्पष्ट होते.
या शोधामुळे भारतातील प्राचीन हवामानाचाही अभ्यास करण्यास मदत झाली आहे. जीवाश्मांवरून असे दिसून येते की त्या काळात ईशान्य भारतात दाट, दमट आणि उष्णकटिबंधीय जंगले होती. अशा जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता अस्तित्वात होती. केवडा ही त्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग होती. त्यामुळे त्या काळातील वनस्पतींची रचना, पर्जन्यमान, तापमान आणि पर्यावरणीय परिस्थिती समजून घेण्यासाठी या जीवाश्मांचा उपयोग होत आहे. हवामान बदलाच्या आजच्या काळात अशा संशोधनाचे महत्त्व अधिक वाढले आहे, कारण भूतकाळातील पर्यावरणीय बदलांचा अभ्यास केल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा अंदाज बांधणे कठीण आहे.
पर्यावरणीय दृष्टीनेही केवडा अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. समुद्रकिनारी आणि वाळूमिश्रित प्रदेशात तिची मजबूत मुळे मातीची धूप रोखण्यास मदत करतात. किनारी भागातील परिसंस्था टिकवून ठेवण्यात तिचा मोठा वाटा असतो. अनेक पक्षी, कीटक आणि लहान प्राण्यांना या वनस्पतीमुळे अन्न व निवारा मिळतो. त्यामुळे जैवविविधतेचे संतुलन राखण्यात तिची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नैसर्गिक आपत्ती, विशेषतः चक्रीवादळे आणि समुद्राच्या लाटांमुळे होणारी मातीची झीज कमी करण्यासाठीही अशा वनस्पती उपयुक्त ठरतात.
केवड्याचे आर्थिक महत्त्वही मोठे आहे. विशेषतः ओडिशातील गंजाम परिसर केवडा अत्तर उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. तेथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह केवडा लागवड, फुले गोळा करणे, अत्तरनिर्मिती आणि त्याच्या विक्रीवर अवलंबून आहे. नैसर्गिक सुगंधी पदार्थांची वाढती जागतिक मागणी लक्षात घेता केवड्याची लागवड ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते. योग्य संशोधन, आधुनिक प्रक्रिया आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास या वनस्पतीपासून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते.
आज हवामान बदल, जंगलतोड, शहरीकरण आणि नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास यामुळे अनेक वनस्पती संकटात सापडत आहेत. केवड्यासारख्या प्राचीन आणि उपयुक्त वनस्पतींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. तिच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण, वैज्ञानिक पद्धतीने लागवड, जनजागृती आणि संशोधन यांवर भर दिल्यास या वनस्पतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवता येईल.
