प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर ‘खान सर’ यांच्या पाटण्यातील कोचिंग क्लासबाहेर मंगळवारी रात्री गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. या घटनेत एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असतानाच पोलिसांनी मात्र गोळीबार झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले. हा प्रकार गोळीबाराचा नसून दोन कोचिंग संस्थांमधील वादातून घडलेला आहे. तसेच या प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये गोळीबाराचा कोणताही उल्लेख नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे या घटनेबाबत समोर आलेल्या सुरुवातीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नेमके घडले तरी काय, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
खान सरांनी काय दावा केला?
बिहारची राजधानी पाटणा येथील मुसल्लाहपूर हाट परिसर अनेक कोचिंग सेंटर्सनी गजबजलेला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची या परिसरात नेहमीच वर्दळ असते. प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर ‘खान सर’ यांचे कोचिंग सेंटर हे या भागात सर्वात प्रसिद्ध आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास काही व्यक्तींनी आपल्या कोचिंग सेंटरबाहेर अंदाधूंद गोळीबार केल्याचा आरोप खान सर यांनी केला. विद्यार्थ्यांकडून अत्यंत कमी शुल्क आकारले जात असल्याने सूडाच्या भावनेतून हा गोळीबार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना खान सर म्हणाले की, हल्लेखोरांनी माझ्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. आमच्या सुरक्षा रक्षकाने हल्लेखोरांना ओळखले असून, ते शेजारील कोचिंग सेंटरमधीलच लोक असल्याचे सांगितले आहे. आम्हाला सुरक्षेची गरज असून प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे.
खान सरांचा नेमका आरोप काय?
खान सर पुढे म्हणाले की, या हल्ल्यामागे शेजारची कोचिंग संस्था असल्याचे सर्वांनाच स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी माझे कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकीही अनेकदा दिलेली आहे. जेव्हा आमच्या संस्थेतील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात, तेव्हा काही समाजकंटकांना स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्यासारखे वाटते. गरिबांनाही शिक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हे लक्षात घेऊन प्रशासनाने आमच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहावे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही आपण अधिकृत तपास यंत्रणांच्या आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे खान सर यांनी सांगितले. मात्र, या घटनेबाबत पोलिसांचा दावा आणि खान सर यांच्या आरोपांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्यामुळे खरंच गोळीबाराची घटना घडली का? असा प्रश्न काहींनी समाजमाध्यमांवर उपस्थित केला आहे.
घटनेबाबत पोलिसांनी काय सांगितले?
मुसल्लाहपूर हाट परिसरातील घटनेनंतर पाटणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस अधिकारी आणि अनेक तपास पथकांनी घटनास्थळी पोहोचून सखोल तपासाला सुरुवात केली. पाटणा पूर्वचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय के. शर्मा यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, हा प्रकार गोळीबाराचा नसून दोन कोचिंग संस्थांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीचा आहे. या घटनेत एक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचा आणि स्थानिक नागरिकांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. जखमी सुरक्षा रक्षकावर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींची चौकशीही केली जात आहे.
खान सर आणि पोलिसांच्या दाव्यात तफावत
या संपूर्ण प्रकरणात खान सरांचा दावा आणि पोलिसांची अधिकृत भूमिका यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. खान सरांनी सांगितले की, सर्व हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या या हल्ल्यात स्फोटकांचाही वापर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी गोळीबार आणि स्फोटक वापराच्या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही. अधिकृत एफआयआरमध्ये अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख नसून, हा वाद दोन प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींमध्ये झाला आणि त्यातून मारहाणीची घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेनंतर काही तासांतच खान सर यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये आणि पोलिसांच्या अहवालात दिसून आलेली ही तफावत समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.
वादाचे नेमके मूळ कारण काय?
प्राथमिक तपासानुसार, ही घटना कोचिंग क्षेत्रातील वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खान सर आणि एका प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थेच्या संचालकामध्ये वर्चस्व आणि प्रभावाच्या मुद्द्यावरून काही काळापासून तणाव निर्माण झाला होता. खान सर यांच्या मते, या संघर्षाचे मूळ त्यांच्या शुल्क संरचनेत आहे. त्यांची ‘खान ग्लोबल स्टडीज’ ही संस्था विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून ३६५ रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारते, जे परिसरातील अनेक इतर कोचिंग संस्थांच्या तुलनेत खूपच कमी आहे. खान सर यांनी यापूर्वीही कमी शुल्कात शिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे काही प्रतिस्पर्धी संस्था त्यांच्याविरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. काही वृत्तांनुसार, हा वाद खान सर यांच्या संस्थेचा आणि शेजारील एका कोचिंग संस्थेचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रतिस्पर्धी संस्थेचे नाव संशयित म्हणून अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.
खान सर नेमके आहेत तरी कोण?
समाजमाध्यमांवर आणि विद्यार्थ्यांमध्ये ‘खान सर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या शिक्षकाचे नाव ‘फैसल खान’ असल्याचे सांगितले जाते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील देवरिया येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी तसेच भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. खान सर यांनी ‘Khan GS Research Centre’ या यूट्यूब चॅनेलद्वारे शैक्षणिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून ते स्पर्धा परीक्षांसाठीचे शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध करून देतात. २०२१ मध्ये त्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी मोबाईल अॅपही सुरू केले. याच वर्षी त्यांनी ‘Khan Global Studies’ या संस्थेची स्थापनाही केली. सध्या बिहारच्या पाटणा शहरात या संस्थेच्या दोन शाखा कार्यरत आहे. त्यापैकी एक मुसल्लाहपूर हाट परिसरात तर दुसरे बोरिंग रोड भागात आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खान सर विशेष लोकप्रिय आहेत. अत्यंत कमी शुल्कात आणि सोप्या हिंदी भाषेत शिकवण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे कोट्यवधी फॉलोअर्स असून देशभरातील विद्यार्थी त्यांच्या व्याख्यानांना पसंती देतात. विशेष म्हणजे, खान सर यांनी आजपर्यंत आपले पूर्ण नाव सार्वजनिकरित्या अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यांच्या खऱ्या नावाबाबत प्रश्न विचारला असता, वैयक्तिक माहिती सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.
