Pakistan Balochistan News in Marathi : दुसऱ्याचे घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचे घर त्याच आगीत जळून खाक व्हावे, अशी दयनीय अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना थारा देऊन भारताविरोधात नेहमीच कुरापती करणारा हा देश त्याच दहशतवादाच्या पडछायेत सापडला आहे. पाकिस्तानला सध्या त्यांच्याच देशातील बलुचिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी लष्कर तैनात केले आहे. तरीदेखील बंडखोरांकडून एकापाठोपाठ एक हल्ल्यांचा सपाटा सुरूच आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानी लष्कराच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा असा प्रांत आहे आणि याच भौगोलिक रचनेचा गैरफायदा बंडखोरांना मिळत असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. त्यांनी हे विधान बलुच लिबरेशन आर्मीने दक्षिण-पश्चिम बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतरच्या काही दिवसांतच केले. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बलुचिस्तानमध्ये १९७ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केला. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने बंडखोरांचे निर्दालन करूनही संरक्षणमंत्र्यांनी हतबलता व्यक्त केल्याने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेची अनेकांनी खिल्ली उडवली.
नेमके काय म्हणाले पाकिस्तानचे संरक्षणमंत्री?
संसदेला संबोधित करताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, एखाद्या गजबजलेल्या शहराच्या किंवा परिसराच्या तुलनेत बलुचिस्तानमधील परिस्थिती हाताळणे अत्यंत कठीण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्याची गरज आहे. आमच्या सुरक्षा दलांचे जवान तिथे कार्यरत असून, बंडखोरांवर कारवाई केली जात आहे; परंतु इतक्या मोठ्या क्षेत्रावर नजर ठेवण्यास आणि गस्त घालण्यात लष्कराला अडचणी येत आहेत. आसिफ यांनी निदर्शनास आणून दिले की, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा प्रांत असून, तिथे प्रत्येक ३५ किलोमीटरवर केवळ एक व्यक्ती वास्तव्यास आहे.
आणखी वाचा : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या; कोण होते सैफ अल-इस्लाम गद्दाफी?
बंडखोरांशी चर्चेचा पर्याय का फेटाळला?
ख्वाजा आसिफ यांनी बलुच या दहशतवादी संघटनेशी चर्चा करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. बलुचिस्तानमधील बंडखोर दहशत निर्माण तरबेज असल्यामुळे त्यांच्यात व सरकारमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. पाकिस्तान सरकार कधीही हिंसेचे समर्थन करणार नाही. तुम्ही हिंसेचे समर्थन करता किंवा त्याला ‘स्वातंत्र्यलढा’ म्हणून संबोधता, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण- ते सत्य नसून, तो गुन्हेगारी कृत्यांना कायदेशीर ठरवण्याचा एक प्रयत्न आहे, असे आसिफ यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बलुचिस्तानमधील तस्करीसाठी राजकारणी व नोकरशाहीच्या धोरणाला जबाबदार धरले. काही राजकारण्यांमुळेच बलुच प्रांतातील नैसर्गिक संसाधनांची लूट झाली आहे. बलुचिस्तानची प्रगती रोखण्यासाठी याच लोकांनी गटबाजी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बलुचिस्तानची सद्य:स्थिती नेमकी काय?
नैसर्गिक खनिजांनी समृद्ध असलेला बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत गरीब प्रांत आहे. पाकिस्तानच्या २४ कोटी लोकसंख्येपैकी बलुच लोकांची संख्या केवळ १.५ कोटी आहे. आपल्या प्रांतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केवळ केंद्र सरकारच्या फायद्यासाठी केला जातो आणि स्थानिकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना तेथील लोकांमध्ये दीर्घकाळापासून आहे. यादरम्यान बलुचिस्तान पिछाडीवर असल्याचा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी फेटाळून लावला. मागील काही वर्षांत या प्रांतात पाकिस्तान सरकारने चांगली विकासकामे केली आहेत. देशातील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा इथे सर्वाधिक विमानतळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बलुचिस्तानमधून लोक गायब होत असल्याचाही आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
हेही वाचा : व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीमुळे भारताला फायदा की तोटा? काय सांगते आकडेवारी?
बलुच बंडखोरांकडे अमेरिकन शस्त्रसाठा?
बलुचिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी बलुच बंडखोरांकडे अत्याधुनिक अमेरिकन शस्त्रे असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दहशतवाद्यांकडे नाईट व्हिजन उपकरणे आणि महागड्या रायफल्ससह प्रगत लष्करी साहित्य आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांकडे प्रत्येकी सुमारे २० लाख पाकिस्तानी रुपयांची रायफल होती. आमच्याकडेही अशी रायफल नाही. त्यांच्याकडे ४,००० ते ५,००० डॉलर्स किमतीचे थर्मल वेपन साइट्सही होते. एकूण त्यांच्या लष्करी उपकरणांची किंमत जवळपास २०,००० डॉलर्सपर्यंत जाते. हे सगळं कुठून येतंय? यासाठी पैसा कोण देतोय, असा प्रश्न आसिफ यांनी उपस्थित केला.
पाकिस्तानचे भारतावर गंभीर आरोप
बलुचमधील बंडखोरांचे नेतृत्व अफगाणिस्तानच्या भूमीतून काम करत असल्याचा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी केला. या प्रांतातील खनिज तेलासह विविध प्रकारच्या तस्करीमुळे पाकिस्तान सरकारला अब्जावधी रुपयांचे नुकसान होत होते. या गुन्हेगारी माफियाने या चळवळीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. बलुचिस्तानमधील अलीकडील हल्ल्यांसाठी पाकिस्तानने थेट भारतालाच जबाबदार धरले आहे. दुसरीकडे- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्यावर आरोप करण्याऐवजी या प्रदेशातील लोकांच्या दीर्घकालीन मागण्यांकडे लक्ष द्यावे, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.

