Reasons behind rare chimpanzee conflict: युगांडामधील ‘किबेल राष्ट्रीय उद्याना’त चिंपांझींचा एक मोठा समूह वास्तव्य करतो. या उद्यानातील चिंपाझींमध्ये सध्या रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे. चिंपांझींच्या दोन गटांमध्ये टोकाचे वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. चिंपांझींमध्ये झालेल्या या बदलाचा अभ्यास मागील काही वर्षांमध्ये करण्यात आला. चिंपांझींमध्ये सध्या दिसून येत असलेले वर्तन अत्यंत दुर्मिळ मानले जाते. तसेच ते ५०० वर्षांत एकदा आढळते. दरम्यान, चिंपांझी दोन गटांत विभागले गेल्याचे दुसऱ्यांदा आढळून आले आहे. चिंपांझींमध्ये संघर्ष का सुरू आहे? त्यांच्या वर्तनात कोणते बदल झाले? याबाबतचा अभ्यास अहवाल ‘सायन्स’ मासिकात प्रकाशित झाला आहे. युगांडातील किबेल नॅशनल पार्कमधील चिंपांझी रक्तरंजित संघर्षात का अडकले आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

युगांडातील किबेल नॅशनल पार्क

युगांडामधील किबेल नॅशनल पार्कमध्ये चिंपांझींचा एक मोठा समूह राहतो. जवळपास २०० चिंपांझी एकत्र राहतात. कालांतराने या चिंपांझींमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले. मध्य भागात वास्तव्य करणाऱ्या चिंपांझींच्या समूहाला ‘सेंट्रल’ चिंपांझी, तर पश्चिम भागात वास्तव्य करणाऱ्या चिंपांझींला ‘वेस्टर्न’ चिंपांझी म्हणून ओळखले जाऊ लागले. या चिंपांझींबद्दल नेटफ्लिक्सवर ‘चिंप एम्पायर’ नावाने एक डॉक्युमेण्टरीदेखील दाखवण्यात आली होती. या चिंपांझींच्या वर्तणुकीत होणारे बदल आणि त्यांची जंगलातील रचना यांचा संशोधक व अभ्यासक सातत्याने बारकाईने अभ्यास करत असतात.

चिंपांझींमध्ये फूट कशी पडली?

२०१५ मध्ये चिंपांझींमध्ये फूट पडली व दोन गट तयार झाले. त्याआधी सगळे चिंपांझी एकत्र राहत होते. त्यांच्यात विभागणी झाली नव्हती, असे प्राइमेटोलॉजिस्ट (वानर, माकड, चिंपांझी आणि तत्सम सस्तन प्राण्यांचा अभ्यास करणारे) एरॉन सँडेल यांनी म्हटले आहे. ‘सायन्स’ मासिकात प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात सँडेल हे सहभागी होते. ते ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात प्राइमेटोलॉजिस्ट म्हणून काम करतात.

प्राइमेटोलॉजिस्ट एरॉन सँडेल यांनी ‘सायन्स’ला सांगितले की, चिपांझींच्या ‘वेस्टर्न’समूहातील एका गटाने ‘सेंट्रल’ गटातील चिंपांझींना जवळ येताना पाहिले. सहसा, हे दोन्ही गट काही वेळ एकमेकांत मिसळतात. पण यावेळी तसे झाले नाही. त्याऐवजी, जेव्हा ‘वेस्टर्न’ चिपांझींनी ‘सेंट्रल’ चिपांझींचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांच्यात एक प्रकारची शांतता पसरली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला आणि ‘सेंट्रल’ समूहातील चिपांझींनी त्यांचा पाठलाग केला. यापूर्वी असे कधीही पाहण्यात आले नव्हते, असे सँडेल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, माझ्याबरोबर प्राण्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करणारे मिशिगन विद्यापीठातील इकॉलॉजिस्ट जॉन मितानी होते. त्यांनी काही दशकांपासून चिंपांझींचा अभ्यास केला आहे. चिंपांझींमधील बदल पाहून ते देखील चक्रावून गेले. चिंपांझींच्या वागण्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘एनबीसी न्यूज’ शी बोलताना जॉन मितानी म्हणाले, तिथे फक्त गोंधळ सुरू होता. चिंपांझींनी अचानक ओरडायला, किंचाळायला व एकमेकांचा पाठलाग करायला सुरूवात केली होती.

२४ चिपांझींचा बळी

‘सायन्स फोकस’ने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर वेस्टर्न चिंपांझींनी सेंट्रल चिंपांझींवर हल्ले करण्यास सुरूवात केली होती. पुढील पाच वर्षात ७ मोठे चिंपांझी व १७ लहान चिंपांझीं या संघर्षात मारले गेले. संशोधक असेही सांगतात की, २०२१ ते २०२४ दरम्यान १४ लहान चिंपांझी बेपत्ता झाले किंवा मारले गेले. दरम्यान, सध्या सेंट्रल चिंपांझींचा समूह विस्तारला आहे. त्यामुळे सेंट्रल चिंपांझींनी वेस्टर्न चिंपांझींला संपवल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

चिंपांझींमध्ये रक्तरंजित संघर्ष का सुरू झाला याबाबत संशोधकांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. चिंपांझींच्या दोन समूहांनी एकमेकांमध्ये मिसळणे बंद केल्यानंतर चिंपांझींमधील संघर्ष वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. “चिंपांझींचे एकमेकांमध्ये मिसळणे बंद झाल्यास किंवा दररोजचा त्यांचा संपर्क कमी झाल्यास त्यांच्यातील अंतर वाढत जाते”, असे प्राइमेटोलॉजिस्ट कॅथरिन होबैटर यांनी सांगितले. त्या स्कॉटलँडमधील सेंट अँड्रयु विद्यापीठात कार्यरत आहेत.

पाच नर व एका मादी चिंपांझीच्या मृत्यूने संघर्षाला सुरूवात?

चिंपांझींच्या अभ्यासात सहभागी संशोधकांनी सांगितले की, २०१४ मध्ये श्वसनाशी संबंधित काही आजार झाल्याने पाच वयस्कर नर चिंपाझींचा आणि एका प्रौढ मादी चिंपांझीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१५ पासून चिंपांझींमध्ये फूट पडली. “ज्या नर चिंपांझींचा मृत्यू झाला त्यांना चिंपांझींच्या समूहात महत्वाचे स्थान होते. खूपच कमी कालावधीत त्या चिंपांझींना गमावल्याने त्याचा विपरीत परिणाम झाला”, असे प्राइमेटोलॉजिस्ट जॅकॉब एनग्रे यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर समूहांत फूट पडली व त्यांच्यातील संबंध बिघडले.

“काही चिंपांझी हे इतर चिंपांझींशी चांगले संबंध ठेवून असतात. ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो तेव्हा चिंपांझींमधील व्यवस्था डळमळीत होते”, असे ड्यूक विद्यापीठातील प्राइमेटोलॉजिस्ट जोसेफ फेल्डब्लम यांनी म्हटले आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, चिंपांझींमधील अल्फा चिंपांझीची जागा एक नवीन जॅक्सन नावाच्या चिंपांझीने घेतली होती. सँडेल म्हणाले, चिंपांझींच्या रचनेत बदल झाला होता. असा बदल ज्यावेळेस होतो, तेव्हा नर चिंपांझी अधिक आक्रमक होतात. याच कालावधीत श्वसनासंबंधी आजाराने काही चिंपांझींचा मृत्यू झाला. त्यानंतर चिंपांझींमध्ये रक्तरंजित संघर्षाला सुरूवात झाली. दरम्यान, याआधी देखील चिंपांझींमध्ये संघर्ष पाहण्यात आला आहे.

जेन गुडॉल यांनीही अनुभवला होता चिंपांझींमधील संघर्ष

चिंपांझींचा अभ्यास करणाऱ्या दिवंगत प्राइमेटोलॉजिस्ट जेन गुडॉल यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह चिंपांझींमधील ही आक्रमकता याआधी अनुभवली आहे. १९७० मध्ये टांझानियातील गोम्ब स्ट्रिम नॅशनल पार्कमध्ये चिंपांझींमध्ये चार वर्ष संघर्ष चालला होता. “गोम्ब नॅशनल पार्कच्या इतिहासातील तो सर्वात काळा अध्याय होता”, असे गुडॉल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. “चिंपांझी असे का वागतात, याचा अभ्यास करण्यात माझे अनेक वर्ष गेले. चिंपांझींबाबतची ती काळी बाजू होती”, असे गुडॉल म्हणाल्या.

संशोधनात सहभागी अभ्यासकांनी चिंपांझींबद्दल खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले आहे. “एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागणारे चिंपांझी अचानक एकमेकांचे शत्रू झाले आहेत. चिंपांझींच्या मनोवृत्तीचा अभ्यास करण्याची ही अत्यंत दुर्मिळ संधी आहे. समूहाची ओळख ही त्यांच्या संबंधांपेक्षा मोठी झाली आहे. ते एकमेकांवर हल्ला करताना दिसतात, तेव्हा वेदना होतात. त्यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय केले पाहिजे, याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे”, असे सँडेल म्हणाले.