Doctor Suggests Six Simple Ways to Prevent Kidney Stones in Winters : किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा मानवी शरीरातील एक महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मूत्रपिंडावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. अलीकडच्या काळात अनेकांना किडनी स्टोनचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच हिवाळ्यात या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील झेन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे यूरोलॉजिस्ट डॉ. भाविन पटेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. हिवाळ्यात किडनी स्टोनचा का वाढतोय धोका? नेमकी काय आहेत त्यामागची कारणे? त्याविषयीचा हा आढावा…

किडनी स्टोनचा का वाढतोय धोका?

बहुतांश लोकांना हिवाळा हवाहवासा वाटत असला तरी तो काहींसाठी डोकेदुखीचा ठरतो. कडाक्याच्या थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन किडनीवरील दबाव वाढतो. शरीरातील अतिरिक्त द्रव आणि खराब रसायने काढून टाकण्यासाठी किडन्यांना अधिक रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. हिवाळ्यातील थंडी शरीराला सुखद वाटत असली तरी मूत्रपिंडांसाठी मात्र ती धोकादायक ठरू शकते. “थंडीत लोक कमी पाणी पितात आणि त्यामुळे लघवी अधिकच घट्ट होऊन त्यात खडे तयार होण्याची शक्यता वाढते”, असे डॉ. भाविन पटेल यांनी सांगितले. जास्त मीठ आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात खनिजांचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो, असेही ते म्हणाले.

किडनी स्टोन वाढण्याची कारणे कोणती?

डॉ. भाविन पटेल यांच्या मते, थंड हवामानातील कोरडे वातावरण आणि कमी घाम येणे यांमुळेही शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि लघवी अधिक घट्ट होते. परिणामी मधुमेह, लठ्ठपणा, सांधेदुखीचा आजार किंवा मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये हिवाळ्यात किडनी स्टोनचा धोका वाढतो. डॉ. पटेल यांच्या निरीक्षणांना अनेक संशोधनांनीही दुजोरा दिला आहे. हिवाळ्यात डीहायड्रेशनच्या प्रमाणात वाढ होत असल्याने मूत्र अधिक दाट होते आणि त्यामुळे किडनी स्टोनची शक्यता वाढते. ‘Environmental Health Insights’ या जर्नलमध्ये २०१४ साली एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. थंड हवामानात तहान लागण्याची नैसर्गिक जाणीव कमी होते आणि त्यातून निर्माण झालेले डीहायड्रेशन व घट्ट लघवी किडनी स्टोनला कारणीभूत ठरते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले होते.

Award Banner

आणखी वाचा : Stomach Cancer : मसालेदार पदार्थांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; काय सांगतात तज्ज्ञ?

किडनी स्टोनचा सर्वाधिक धोका कुणाला?

हिवाळ्यात किडनी स्टोनचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही अभ्यासातून देण्यात आला होता. २०१६ मध्ये ‘द क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ या जर्नलमध्येही अशाच प्रकारचा अभ्यास प्रसिद्ध झाला होता. मिठाचे अतिसेवन आणि प्राणीजन्य प्रथिनयुक्त आहार घेतल्यास लघवीतील कॅल्शियम आणि युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. त्यातच कमी पाणी प्यायल्यास ही स्थिती अधिक गंभीर होते आणि स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो, असे या अभ्यासात म्हटले होते. यादरम्यान २०२२ मध्ये ‘किडनी इंटरनॅशनल रिपोर्टस्’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात काही निरीक्षणेदेखील नोंदवण्यात आली होती. लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या लघवीमध्ये स्टोन निर्माण करणारे घटक अधिक प्रमाणात असतात, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले होते.

किडनी स्टोनची मुख्य लक्षणे कोणती?

डॉ. पटेल यांनी हिवाळ्यात किडनी स्टोनचा धोका उद्भवण्याची काही लक्षणे सांगितली आहेत. पाठ, बाजू किंवा खालच्या पोटात तीव्र वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, गढूळ, लालसर किंवा दुर्गंधीयुक्त लघवी होणे, मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटणे, लघवीला जाण्याची वारंवार इच्छा होणे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे पटेल म्हणाले. किडनी स्टोनकडे दुर्लक्ष केल्याने लघवीचा मार्ग बंद होऊन किडनी इन्फेक्शन होऊ शकते. ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असल्याचा इशारा डॉ. पटेल यांनी दिला आहे. या आजारावरील उपचार स्टोनच्या आकार आणि प्रकारावर अवलंबून असतात. लहान स्टोन पुरेसे पाणी प्यायल्यास नैसर्गिकरीत्या बाहेर पडू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Brain and Weight loss: मेंदू वाढवतोय तुमचं वजन; काय काळजी घ्याल?

हिवाळ्यात किडनी स्टोन टाळण्याचे उपाय

हिवाळ्यात किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी डॉ. पटेल यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. तहान लागली नसली तरी दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यावे, मीठ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे, लिंबू आणि संत्री यांसारख्या आंबट फळांचे सेवन करावे. कारण- या फळांमध्ये सायट्रेट असते आणि सायट्रेट स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते. तसेच नियमित व्यायाम करावा. कारण- त्याने चयापचय प्रक्रिया सुधारते आणि किडनीचे कार्य सुरळीत चालते. लघवीत वेदना, जळजळ किंवा रक्त दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. पटेल यांनी सांगितले आहे.