Kidney stone symptoms and UTI prevention tips in Marathi: कडक उन्हाळ्यात नेहमीच किडनी स्टोन अर्थात मूतखडा आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या (UTI) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. परंतु, यावर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. निर्जलीकरण, बैठी जीवनशैली आणि मधुमेह तसेच लठ्ठपणाचे वाढते प्रमाण याचा या दोन्ही आजारांशी जवळून संबंध आहे. हिवाळ्यात साधारणपणे दररोज किडनी स्टोनचा एक रुग्ण आढळतो; मात्र उन्हाळ्यात ही संख्या दुप्पट होते आणि महिन्याला ५० ते ६० रुग्णांपर्यंत पोहोचते, असा डॉक्टरांचा अनुभव आहे.
वैज्ञानिक संदर्भ आणि हवामानाचा परिणाम
उष्ण हवामान आणि किडनी स्टोन यांच्यातील संबंधावर वैज्ञानिक संशोधन झाले आहेत. Clinical Journal of the American Society of Nephrology मध्ये २०१४ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात संशोधकांनी अमेरिकेतील विविध शहरांतील तापमान आणि किडनी स्टोनच्या रुग्णसंख्येचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार तापमान वाढल्यावर काही आठवड्यांच्या आत किडनी स्टोनची प्रकरणे वाढताना दिसतात.
लघवीतील खनिजांचे स्फटिक होतात
संशोधकांच्या मते, उष्ण हवामानामुळे शरीरातून घामाद्वारे अधिक पाणी बाहेर पडते आणि त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होऊन ते अधिक दाट (concentrated) होते. परिणामी लघवीतील कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिडसारख्या खनिजांचे स्फटिक तयार होण्याची शक्यता वाढते आणि किडनी स्टोन तयार होऊ शकतात (Tasian et al., Clinical Journal of the American Society of Nephrology, 2014).
निर्जलीकरण आणि किडनी स्टोनचा संबंध
यासंदर्भात अमेरिकेतील National Kidney Foundation देखील सांगते की, पुरेसे पाणी न पिणे आणि निर्जलीकरण ही किडनी स्टोन होण्यामागील सर्वात महत्त्वाची कारणे मानली जातात. संस्थेच्या मते, लघवी अधिक दाट झाल्यास त्यातील खनिजे आणि क्षार एकत्र येऊन क्रिस्टल तयार करतात आणि त्यापासून पुढे स्टोन तयार होऊ शकतो. त्यामुळे विशेषतः उष्ण हवामानात दररोज पुरेसे द्रवपदार्थ घेणे हा किडनी स्टोन टाळण्यासाठीचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.
दिवसाला २ लिटर लघवी
त्याचप्रमाणे American Urological Association च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (AUA Guidelines), किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी प्रौढ व्यक्तींनी दिवसाला इतके द्रवपदार्थ घ्यावेत की दररोज किमान २ ते २.५ लिटर लघवी तयार होईल. संशोधनानुसार पुरेसे पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये स्टोन पुन्हा होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी आढळते. त्यामुळे उष्ण हवामानात निर्जलीकरण टाळणे हे किडनी स्टोनच्या प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

तज्ज्ञ काय सांगतात?
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट डॉ. राजीव शेट्टी यांनी सांगितले की, “पाणी कमी पिणे हे सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. विशेषतः लाल मांसासारख्या पदार्थांचे जास्त सेवन, जास्त मीठ असलेले जंक फूड आणि बैठी दिनचर्या यामुळेही स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. शहरी भागात दीर्घकाळ बसून काम करणार्यांना अधिक धोका असतो.” या वाढत्या प्रवृत्तीला दुजोरा देताना साक्रा वर्ल्ड हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण, युरो-ऑन्कोलॉजी, युरोलॉजी आणि अँड्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. गोवर्धन रेड्डी यांनी सांगितले की, सध्या त्यांच्याकडे दररोज १ ते २ किडनी स्टोनचे रुग्ण येत आहेत.
‘सायलेंट स्टोन’ आणि लक्षणे
किडनी स्टोन झाल्यास तीव्र पोटदुखी किंवा लघवीतून रक्त येणे अशी लक्षणे दिसतात; मात्र डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. नियमित आरोग्य तपासण्या आणि अल्ट्रासाऊंड चाचण्यांचा वाढता वापर यामुळे लक्षणे नसलेल्या (असिम्प्टमॅटिक) स्टोनचे निदान वाढले आहे. “किडनीच्या आत असलेले स्टोन तेव्हाच त्रास देतात जेव्हा ते युरेटरमध्ये अडकतात. युरेटर ही किडनीतून मूत्राशयाकडे लघवी वाहून नेणारी नळी आहे. ती अडथळा निर्माण झाल्यावरच वेदना किंवा इतर लक्षणे दिसू लागतात,” असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
“माझ्याकडे ३-४ सेंटीमीटर इतके मोठे स्टोन (silent stones) असलेले रुग्ण आहेत, मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षण दिसून आले नाही. मात्र उपचार न केल्यास हे स्टोन वारंवार होणाऱ्या मूत्रमार्गाच्या संसर्गाला (UTI) कारणीभूत ठरू शकतात आणि कालांतराने किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात,” असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.
किडनी स्टोनचे प्रकार
किडनी स्टोन (Pathophysiology) साधारणपणे चार प्रकारचे असतात. कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन (सर्वाधिक सामान्य) युरिक अॅसिड स्टोन स्ट्रुवाइट स्टोन (संसर्गामुळे) सिस्टीन स्टोन (दुर्मिळ, अनुवंशिक कारणांमुळे)

मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) का वाढतो?
किडनी स्टोनमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. प्रशांत जी. केडलया म्हणाले, “आमच्याकडे UTI घेऊन येणाऱ्या बहुतेक रुग्णांमध्ये मधुमेह, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, स्टोनमुळे आधी झालेला मूत्रमार्गातील अडथळा किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटशी संबंधित समस्या अशी काही ना काही जोखमीची कारणे असतात. उन्हाळ्यात निर्जलीकरणामुळे स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. हे स्टोन लघवीचा प्रवाह अडवू शकतात आणि त्यामुळे UTI होण्याचा धोका वाढतो.” UTI च्या बाबतीत महिलांमध्ये हा त्रास अजूनही सर्वाधिक प्रमाणात आढळतो.
संसर्ग आणि अँटिबायोटिक्सचा वापर
डॉ. गोवर्धन यांच्या मते, प्रवासादरम्यान वापरल्या जाणाऱ्या सामायिक कार्यालयीन किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे काही प्रकरणांमध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो, मात्र तेच एकमेव कारण नाही. काही वेळा वाढलेला लैंगिक संपर्क आणि ‘हनीमून सिस्टायटिस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थितीशीही याचा संबंध आढळतो.
डॉक्टरांना वारंवार होणाऱ्या आणि उपचारांना कठीण ठरणाऱ्या UTI च्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. “यामागे समुदायामध्ये अँटिबायोटिक्सचा अतिरेक किंवा चुकीचा वापर विशेषतः उच्च श्रेणीतील अँटिबायोटिक्स कारणीभूत असू शकतो. नेमके कारण निश्चित नसले तरी प्रतिरोधक (resistant) आणि पुनरावृत्ती होणाऱ्या संसर्गांचे प्रमाण वाढत असल्याची प्रवृत्ती स्पष्ट दिसते,” असे डॉ. गोवर्धन यांनी सांगितले.
