अमोल परांजपे

अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना पाण्यात पाहणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी अलिकडच्या काळात अधिक आक्रमक धोरणे स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. जपानच्या आकाशातून क्षेपणास्त्र उडवून त्यांनी पुन्हा एकदा थेट अमेरिकेसमोर दंड थोपटण्याचे साहस केले. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे प्रत्यक्ष अमेरिकेची भूमी उन यांच्या टप्प्यात आली आहे, हे विशेष…

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

उत्तर कोरियाच्या ताज्या क्षेपणास्त्र चाचण्या किती धोकादायक?

उत्तर कोरियाने मंगळवारी अण्वस्त्रवहन क्षमता असलेल्या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र जपानच्या भूमीवरून गेले आणि त्यामुळे तिथे क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सक्रिय करावी लागली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करावे लागले. जपान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे. ‘क्वाड’ या लष्करी सहकार्य गटाचे दोघे सदस्य आहेत. (भारत आणि ऑस्ट्रेलियादेखील क्वाडचे सदस्य आहेत.) तब्बल ५ वर्षांच्या खंडानंतर उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र चाचणीचे धाडस केले. यापूर्वी २०१७ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उन यांची ‘धमक्यांची स्पर्धा’ सुरू असताना उत्तर कोरियाने अशी चाचणी केली होती.

आताची चाचणीही अमेरिकेला धमकावण्यासाठी आहे का?

या चाचणीमुळे जपानमध्ये गोंधळ उडाला असला, तरी खरे म्हणजे या चाचणीमुळे अमेरिका अधिक सावध झाली. कारण पश्चिम प्रशांत महासागरात अमेरिकेच्या ताब्यात असलेले गुआम हे बेट आता उत्तर कोरियाच्या टप्प्यात आले आहे. ट्रम्प यांच्याशी झडलेल्या शाब्दिक भांडणात उन यांनी अनेकदा थेट अमेरिकेवर हल्ल्याची धमकी दिली होती. आता ही धमकी प्रत्यक्षात उतरवणे शक्य होणार आहे.

चाचणीवर अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

चाचणीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याशी फोनवर चर्चा केली. ही चाचणी म्हणजे जपानच्या नागरिकांसाठी आणि परिसराच्या शांततेसाठी धोकादायक ठरणारी आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील ठरावांचे उघडउघड उल्लंघन असून याची अमेरिकेने तीव्र दखल घेतल्याचे व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आक्रमकतेला कायद्याचा मुलामा देण्याची खटपट?

उत्तर कोरियाने गेल्या वर्षभरात २० प्रक्षेपण तळांवरून किमान ४० क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. एकीकडे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करताना आणि अण्वस्त्रसज्जता वाढवताना कायद्याचा मुलामा देण्याची किम जोंग यांची खटपट सुरू आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यात उत्तर कोरियामध्ये एक ‘घटनादुरुस्ती’ करण्यात आली. ‘विशिष्ट परिस्थितीमध्ये सावधगिरीचा उपाय म्हणून अण्वस्त्रांचा आधी हल्ला करण्याची परवानगी असेल’ असा कायदा करण्यात आलाय. याचा अर्थ आपल्याला ‘वाटले’ म्हणून दक्षिण कोरिया, जपान किंवा अमेरिकेवर अण्वस्त्र डागण्याची घटनात्मक तरतूदच किम जोंग उन यांनी करून ठेवली आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या वादाचा इतिहास काय?

दोन कोरियांमधील वादाला थोडीथोडकी नव्हे, तर ७७ वर्षांची परंपरा आहे. २०१०मध्ये जपानने कोरियात सैन्य घुसवले. तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत कोरियाचा प्रदेश जपानच्या अधिपत्याखाली होता. महायुद्धानंतर, १९४५ साली अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएट महासंघाने कोरिया आपापसात वाटून घेतला. फाळणी झाल्यानंतर उत्तर कोरिया रशियाच्या अधिपत्याखाली तर दक्षिण कोरिया अमेरिकेच्या पंखांखाली गेला. दोनच वर्षांनी किम जोंग इल (किम जोंग उन यांचे वडील) यांनी दक्षिण कोरियात फौजा घुसवल्या. ३ वर्षांनी हे कोरियन युद्ध थांबले, मात्र तणाव एक क्षणही कमी झालेला नाही.

उत्तर आणि दक्षिण कोरियाची लष्करी सिद्धता किती?

चिलखती वाहने, युद्धनौका इत्यादी सर्व बाबींमध्ये दक्षिण कोरियाची क्षमता कितीतरी जास्त आहे. याचे मुख्य कारण त्यांना असलेले अमेरिका, युरोप आणि जपानचे भक्कम पाठबळ. दुसरीकडे उत्तर कोरियाची बहुतांश शस्त्रास्त्रे ही सोव्हिएट महासंघ, नंतर रशिया आणि चीन यांच्याकडून घेतलेली आहेत. मात्र उत्तर कोरियाकडे अधिक मनुष्यबळ आहे. ताज्या आकडेवारीनुसार हुकूमशाही असलेल्या उत्तर कोरियाकडे सुमारे १२ लाख सैनिक आहेत, तर दक्षिण कोरियाकडे ५ लाख ५५ हजार. शिवाय अमेरिकेच्या दबावाला न जुमानता किम जोंग अणू कार्यक्रम रेटत असल्याने त्यांची अण्वस्त्र सज्जता वाढत आहे.

‘विक्षिप्त’ किम जोंगमुळे अणुयुद्धाचा अधिक धोका?

शीतयुद्धानंतर प्रथमच जगभरात अणुयुद्धाचा तणाव आहे. याचे कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाच्या निमित्ताने दिलेला इशारा हे आहे. दुसरीकडे अण्वस्त्रसज्ज चीनही तैवानच्या निमित्ताने अमेरिकेशी झगडतो आहे. मात्र या दोघांपेक्षा अणुयुद्ध छेडले जाण्याचा सर्वाधिक धोका हा किम जोंग यांच्यापासून असल्याचे काही संरक्षणतज्ज्ञ मानतात. याचे मुख्य कारण म्हणजे ते ‘विक्षिप्त’ आणि ‘खुनशी’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विक्षिप्तपणाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका किंवा अन्य एखाद्या देशावर अण्वस्त्र डागायला मागेपुढे पाहणार नाहीत, असे काहींचे मत आहे. अणुयुद्धाची ठिणगी पडलीच, तर ती युक्रेन-तैवानपेक्षा कोरियामध्ये पडण्याची शक्यता अधिक असल्याने भारताचे तिथल्या घटनांवर लक्ष असते.

कोरियाच्या वादात भारताची भूमिका काय?

भारताचे दोन्ही कोरियांसोबत राजनैतिक संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण कोरियासोबत भारताची मैत्री अधिक वाढली. उत्तर कोरियाच्या आक्रमक अण्वस्त्र कार्यक्रमाला भारताचा विरोध आहे, त्याच वेळी दोन्ही देशांमधला तणाव निवळावा अशी भूमिका आपण सातत्याने मांडली. विशेषत: महायुद्धानंतर फाळणी झालेले दोन्ही कोरिया पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिकाही भारताने मांडली. मात्र सध्या तरी तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जगाची डोकेदुखी वाढली आहे.