Kissing Disease: जोडीदाराचे अतिचुंबन घेण्याची सवय असल्यास गंभीर आजार होऊ शकतो, असे एका संशोधन अहवालातून नुकतेच समोर आले आहे. ‘किसिंग डिसिज’ अर्थात अतिचुंबनाची सवय किंवा विकार जडला असेल तर ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ (एमएस – MS) हा आजार होण्याचा धोका निर्माण होतो. हा एक संसर्गजन्य आजार असून अत्यंत दुर्मिळ व असामान्य मानला जातो. चुंबन घेताना लाळेमार्फत ‘एपस्टिन बार व्हायरस’ या विषाणूचा संसर्ग होऊन मोनो हा आजार होतो. मोनो आजारच ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ या धोकादायक आजाराला निमंत्रण देतो, असे संशोधन अहवालातून समोर आले आहे. या आजाराची लक्षणे काय, धोका किती, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

‘किसिंग डिसिज’ नेमकं काय आहे?

अतिचुंबनामुळे ‘इनफेक्शिअस मोनोन्यूक्लेओसिस’ हा संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारालाच ‘मोनो’ असे देखील म्हटले जाते. हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘एपस्टिन-बार व्हायरस’ (EBV) या संसर्गजन्य विषाणूमुळे हा आजार होतो. ‘एपस्टिन-बार व्हायरस’ (EBV) हा विषाणू चुंबन घेत असताना लाळेतून शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे चुंबन घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. मुख्यत: लाळेतून पसरणारा हा विषाणू इतर मार्गाने देखील मानवी शरीरात प्रवेश करतो. जसे की एकमेकांनी एकाच भांड्यात अन्नपदार्थ खाणे, एकाच ग्लासमध्ये ड्रिंक्स किंवा शितपेय घेणे किंवा दोघांना सर्दी, कफ झालेला असताना चुंबन घेणे या गोष्टींमुळे या ‘एपस्टिन-बार व्हायरस’ विषाणूचा संसर्ग होतो. परिणामी ‘मोनो’ या आजाराला सामोरे जावे लागते.

विषाणूचा संसर्ग कसा होतो?

बहुतांश व्यक्तींच्या शरीरात जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ‘एपस्टिन-बार व्हायरस’ (EBV) हा विषाणू असतो. हा विषाणू शरीरात असूनही कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. प्रौढावस्थेत या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे दिसून येते. त्यावेळी मोनो हा आजार झाल्याचे निदान डॉक्टर करतात. ‘एपस्टिन-बार व्हायरस’चा संसर्ग झाल्यास बहुतेक वेळा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. या विषाणूमुळे कालांतराने मात्र मोनो हा आजार जडतो. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे महत्वाचे ठरते.

चुंबन घेताना लाळेतून पसरतो विषाणू?

चुंबन घेतल्याने लाळेतून पसरणाऱ्या एपस्टिन बार व्हायरसमुळे मोनो हा आजार होतो. मोनो आजाराची लक्षणे खूपच सामान्य असतात. त्यामुळे हा आजार झाल्याचे अनेकदा लक्षातही येत नाही. मोनो आजार झाल्यास फ्ल्यू होतो किंवा घसा दुखतो. थकवा येणे, ताप येणे, घसा दुखणे आणि शरीरातील मानेजवळ असलेल्या लसिका ग्रंथींची वाढ होणे (लिम्फ नोड्स) ही लक्षणे आढळून येतात. लिम्फ नोड्स म्हणजे मान, काख किंवा जांघेत वेदनादायक किंवा वेदनारहित गाठी होतात. यकृत या अवयवावर सूज येते. मोनो हा आजार झाल्यास काही आठवडे किंवा काही महिने सतत थकवा जाणवतो. दरम्यान, मोनोन्यूक्लेओसिस म्हणजेच मोनो या आजाराचे रूग्ण आपोआप स्वाभाविकपणे बरे होतात. अनेकदा त्यांना डॉक्टरांची गरज भासत नाही. आराम केल्यास, तसेच शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवल्यास हा आजार बरा होता.

अभ्यास अहवालातून काय समोर आले ?

मोनोन्यूक्लेओसिस व मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) हे दोन वेगवेगळे आजार आहेत. दरम्यान, मोनोन्यूक्लेओसिस म्हणजेच मोनो हा आजार झालेल्या रूग्णाला मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा आजार होण्याचा अत्याधिक धोका असतो. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात मोनो आजार झालेल्या रूग्णांना मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) आजार होण्याचा धोका तीन पट अधिक असतो. या दोन आजारांमध्ये परस्पर संबंध असले तरी या आजारांमुळे जीव गमावण्याचा धोका अत्यंत कमी असतो. मोनो या आजारामुळे मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार उद्भवतो, असे संशोधन व अभ्यास अहवालातून समोर आले आहे.

मेंदू, पाठीच्या कण्यावर परिणाम?

मानवी शरीरात मोनोन्यूक्लेओसिस या आजाराला कारणीभूत ठरणारा एपस्टिन बार व्हायरस रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करतो. रोगप्रतिकार प्रणालीत अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या बी पेशींमध्ये एपस्टिन बार व्हायरस विषाणूंचा संसर्ग होतो. त्याचा परिणाम मज्जातंतुंच्या आवरणावर होतो. त्यामुळे मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार होण्याचा धोका संभवतो. हा रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा एक आजार आहे. या आजाराने मानवी मेंदू तसेच पाठीच्या कण्यावर देखील परिणाम होतो. मोनो आजारामुळे होणारा मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार धोकादायक ठरतो, परंतु, तो होण्याचे प्रमाण फारच कमी असते.

काळजी घेण्याची आवश्यकता आहे का?

या आजाराबाबत फारशी काळजी घेण्याची आवश्यकता नाही. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ९० ते ९५ टक्के प्रौढावस्थेतील व्यक्तींना एपस्टिन बार व्हायरस विषाणूचा संसर्ग होतो. परंतु, मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार होण्याचे प्रमाण खूपच नगण्य असते. ज्या व्यक्तींना मोनो आजार होतो त्यांची प्रकृती शक्यतो आपोआप बरी होते. हा आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करतात. मल्टिपल स्क्लेरोसिस आजार झाल्यास मेंदू व दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु, हा परिणाम मात्र जीवनात खूप उशीरा दिसून येतो. त्यामुळे या आजाराबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही. मोनो या आजारापासून मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा आजार होऊ शकतो हेच या संशोधनातून समोर आले आहे.