डॉ. आनंद जोशी
Kissing Evolution HIstory: मानवाचे हावभाव, भावना आणि चुंबन ही क्रिया केवळ एक रोमँटिक भावना नसून तिच्यामागे मोठा जैविक आणि उत्क्रांतीचा वैज्ञिनाक इतिहास दडला आहे. जागतिक संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासातून पहिल्या चुंबनाचा काळ आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट झाली आहेत.

जैविक तंत्रज्ञान आणि चुंबनाचं कालमापन

मानवाची सगळी ‘एक्स्प्रेशन्स’अर्थात, हावभाव म्हणजे शिंकणं, हसणं तिरस्कार करणं, रागावणं वगैरे. हे सगळं उत्क्रांतीच्या उतरंडीतल्या खालच्या पायरीवरच्या प्राण्यांपासून मानव प्रजातीत उत्क्रांत झालं आहे, हे विचारपुरुष चार्लस डार्विन (१८०९-१८८२) सांगून गेलाय. तो डार्विनचा निरीक्षणाद्वारे केलेला अभ्यास होता. आज विकसित झालेल्या जैविक तंत्रज्ञान आणि कालमापनाच्या पद्धतीमुळे चुंबनाच्या उत्क्रांती करता पुरावे उपलब्ध झाले आहेत. काय आहेत, ते पुरावे? त्याचा हा रंजक आढावा…

नाजूक ओठ कशाकरता ?

जुन्या-पुराण्या इंग्लिशमध्ये cyssan याचा अर्थ ओठाने स्पर्श करणे असा आहे. जर्मानिक भाषेत kussjan हा किसिंग करताना येणारा आवाज, यावरून ‘किस’किसिंग हे शब्द इंग्लिशमध्ये आले असावेत, असं मानलं जातं. चुंबन हा शब्द संस्कृत ‘चुम्ब’ या धातू वरून आला आहे, याचा अर्थ ओठाने स्पर्श करणे असाच आहे. चुंबक म्हणजे आकर्षून घेणारा या शब्दाशी त्याचे साधर्म्य आहे.

Kissing Evolution History research graph | Science of Kissing Research Neanderthals | मानवाच्या पहिल्या चुंबनाचा वैज्ञानिक शोध | चुंबनाची उत्क्रांती आणि विज्ञानाचा रंजक इतिहास
चुंबनाची उत्क्रांती आणि विज्ञानाचा रंजक शोध (Image- Gemini)

इंग्लिश शब्दपुरुष शेक्सपियर याने किस हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. १५०२च्या सुमारास लिहिलेल्या ‘रिचर्ड तिसरा’ या नाटकात एका सुंदरीला उद्देशून “तुझ्या ओठांना असे रागावून बोलायला शिकवू नकोस, ते नाजूक ओठ चुंबनाकरता आहेत.” १६०१ साली लिहिलेल्या ‘ट्वेल्थनाईट’ या रोमँटिक कॉमेडीत एक वाक्य आहे “ये, एक काय, वीस चुंबने दे, ही ज्वानी फार काळ टिकणारी नाही.’

चुंबनाचे प्रकार तरी किती?

चुंबन या क्रियेचा वेध घ्यायचा तर, जैविकदृष्ट्या ओठावर ओठ टेकवणे याचे दोन प्रकार आहेत. प्लॅटॉनिक आणि लैंगिक. प्लॅटॉनिकमध्ये भावनिक जवळीक असते. परंतु लैंगिक वा रोमँटिक आकर्षण नसते. मराठीत याला ‘मुका’‘पापा’ असे शब्द आहेत, येथे चुंबन हा शब्द वापरत नाहीत. साहित्यात चुंबन हा शब्द लैंगिक भावना घेऊन येतो आणि वाचकात सुद्धा वैषयिक भाव उमलतात. दोन्ही प्रकारचे किसिंग हे अनाक्रमक वर्तन असते. प्राण्यांतसुद्धा गोडीगुलाबीने संबंध जोडण्यासाठी याचा उपयोग होतो.

चुंबनाचा उगम कधी?

प्राणीजगतात माकडं, पाखरं, धृवीय अस्वलं, कुत्री, पोहणारे मासे, मुंग्या चक्क ओठाला ओठ लावतात असे आढळून आलंय. खालपासून वरपर्यंतच्या प्राण्यांमध्ये चुंबन हे जीवनाच्या स्पर्धेत ‘जीवटपणे’ तगून राहाण्यासाठीचं उपयुक्त एक्स्प्रेशन आहे. चुंबनाला ‘सर्वायवल व्हॅल्यू’आहे. चुंबन ही क्रिया उत्क्रांत होत माणसात आली. तरीही जगात असे काही मानवी समूह आहेत ज्यांच्यात चुंबन ही क्रिया होत नाही. या चुंबनाचा उगम केव्हा झाला, त्याला तगून राहाण्याचं मूल्य आहे का या प्रश्नाचा शोध ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील संशोधकानी घेतला आहे.

चुंबनावर शोधनिबंध

‘इवोल्युशन अँड ह्युमन बिहेवियर’ ही ४५ वर्षाची जुनी जाणती विज्ञान पत्रिका आहे. यात ‘चुंबनाची उत्क्रांती – एक तौलनिक दृष्टिकोन’ हा शोधनिबंध प्रकाशित झालाय. प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात ‘सेक्शुअल किसिंग’च्या उत्क्रांतीचा वेध घेतलेला आहे. अर्थातच हा शोधनिबंध काही हुशारीच्या गोष्टी सांगतो आहे.

संशोधनाची पद्धत कशी?

मानव प्रजातीच्या – होमो सेपियन्सच्या निकटच्या पूर्वजांमध्ये म्हणजेच नॉन ह्यूमन प्रायमेट्स अर्थात नर- वानर गणात चुंबनाची सुरुवात केव्हा झाली हे शोधून काढणे, हा संशोधनाचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी आधी संशोधकांनी संगणकाच्या मदतीने phylogeny – वंशवृक्षाची आखणी केली. या आखणीत जनुकीय साम्ये, मायक्रोबियोम म्हणजे नर-वानर गणांच्या शरीरात, तोंडात, आतड्यात असणाऱ्या जिवाणूंचे समूह अशी अनेक चलपदे घेतली. आखणीत प्रायमेट्सबरोबर निआन्डर्थल्स Neanderthals चा समावेशही केला. कारण निआन्डर्थल्स आणि होमोसापियन्स या दोन्ही प्रजातींचे पूर्वज एकच होते. असे १० दहा हजार वंशवृक्ष तयार केले. याचे Ancestral State Reconstruction म्हणजे पूर्वज स्थिती पुनर्रचना या आधुनिक तंत्राने विश्लेषण केले.

पहिले चुंबन कधी घेतले?

संशोधनानुसार, आफ्रो- युरेशियन मोठ्या एप्स म्हणजे थोडक्यात प्रायमेट्स मध्ये म्हणजे नरवानर गणात २१ मिलियन्स म्हणजेच, ‘दोन कोटी दहा लाख वर्षा पूर्वी’-पहिला किस, पहिले चुंबन घेतलं गेलं. यातही निआन्डर्थल्स आणि त्या काळातील होमो सेपियन्स यांच्या तोंडातील जीवाणू समुहातील काही जीवाणू समान होते, असं संशोधनात आढळून आलं. याचाच अर्थ, निआन्डर्थल्स आणि मानव प्रजाती यांच्यात चुंबन क्रिया घडत होती, शरीरसंबंधही होते. म्हणून तर त्यांचे जनुक मानवप्रजातीच्या जिनोममध्ये आजही सापडतात.

लैंगिक चुंबनाचे फायदे काय, तोटे काय?

लैंगिक चुंबनात ओठ आणि जीभ यांच्या क्रिया होतात. शरीरसंबंधाआधी आणि नंतरच्या (प्री अँड पोस्ट कॉप्युलेटरी किसिंग) चुंबनामुळे पुनर्जननाच्या यशाच्या शक्यता वाढतात. चुंबनात लैंगिक निवड होत असते. कारण चुंबनात एकमेकांच्या श्वासाच्या देवाणघेवाणीत जे वासांचे संदेश ऑल्फॅक्टरी सिग्नल्स एकमेकांना मिळतात त्या द्वारे, पार्टनरचं आरोग्य, जनुकीय फिटनेस, तोंडातील जीवाणूसमूह, रोगप्रतिकारक शक्ती, मासिक पाळीचा टप्पा, यांचं मूल्यमापन शरीर करत असतं. शरीरसंबंधाआधी होत असलेल्या चुंबनामुळे उत्तेजना होऊन गर्भधारणेच्या शक्यता वाढतात. पण, चुंबनाचा सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे, एकमेकांना असलेला इन्फेक्शनचा धोका हा आहे.

चुंबन संशोधनाची पुढची दिशा कोणती?

दोन प्रेमिकांमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी जेव्हा शब्द पोकळ ठरतात, तेव्हा चुंबन ही युक्ती निसर्गानेच योजली असावी, असं संशोधकानी नमूद केलं आहे. पण मुळात, चुंबनाची सुरुवात का झाली? याच्या सखोल आकलनासाठी आणखी शोध घेणं हे संशोधनाचं पुढचं पाऊल असणार आहे. काळजीवाहू व्यक्ती अन्न चावून मग बाळाला भरवते, जगात बऱ्याच माता हे करतात. या ‘गुणवैशिष्ट्या’मधून चुंबन उत्क्रांत झाले असावे, अशी दाट शंका संशोधकांना आहे. सस्तन प्राण्यात बाळाला स्तनपान देणं यातूनही चुंबन उत्क्रांत झालं असावं. या शंका, हे संशय चुंबनावरच्या संशोधनाला पुढे नेत राहणार आहे…