KLM Royal Dutch Airlines Denied Boarding Indian Family : पेरूला निघालेल्या एका भारतीय कुटुंबीयांची स्वप्नवत सहल अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडली. तब्बल ४९ लाख रुपयांचे बिझनेस क्लास तिकीट असतानाही त्यांना विमानात चढण्यास नकार देण्यात आला. या प्रकरणानंतर सदरील कुटुंबाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. विमान कंपनीने दिलेली वागणूक आणि मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी कायदेशीर लढा देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके आहे तरी काय? लाखो रुपयांची तिकिटे काढूनही भारतीय कुटुंबाला विमानात प्रवास का नाकारण्यात आला? त्याविषयीचा हा आढावा…
पेरूला निघालेल्या भारतीय कुटुंबासोबत काय घडले?
परदेशात फिरायला जाण्याची कित्येक भारतीयांची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण लाखो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याची अनेक प्रकरणे आजवर समोर आली आहेत. असाच काहीसा प्रकार तमिळनाडूतील एका कुटुंबाबरोबर घडला आहे. तमिळनाडूतील सालेम येथील एका नामांकित वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष जे. एस. सतीशकुमार यांनी आपल्या कुटुंबीयांसह परदेशात फिरायला जाण्याचा बेत आखला. प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या पेरू देशाचे सौंदर्य पाहण्यासाठी त्यांनी तब्बल ४९ लाख रुपये करून विमानाच्या बिझनेस क्लासची तिकिटे बुक केली. मात्र, १९ जून २०२४ रोजी बेंगळुरू विमानतळावर पोहोचल्यानंतर व्हिसाचे कारण पुढे करीत त्यांना विमानात प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. तुमच्याकडे पेरू देशाचा व्हिसा नसल्याने तुम्ही प्रवास करू शकत नाही, असे त्यांना ‘केएलएम’ रॉयल डच एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
व्हिसा नियमांच्या चुकीच्या अर्थाचा फटका?
सतीशकुमार यांनी विमान कंपनीचा दावा खोडून काढला आहे. त्यांच्या मते, विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्हिसा नियमांचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत म्हटले की, भारतीय पारपत्रधारकांनी काही अटी पूर्ण केल्यास त्यांना पेरू देशात व्हिसाशिवाय प्रवेश दिला जातो. ज्या भारतीयांकडे आधीच अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसह युरोपमधील कोणत्याही देशाचा वैध व्हिसा आहे, त्यांना पेरूचा स्वतंत्र व्हिसा काढावा लागत नाही. आवश्यक ती पात्रता असतानाही विमान कंपनीने आम्हाला प्रवास करण्यापासून रोखले, असा आरोपही सतीशकुमार यांनी केला. त्याबाबत त्यांनी एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य परिचालन अधिकारी यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआरही दाखल केला. इतका संघर्ष करूनही आपल्याला तिकिटांचा परतावा मिळाला नसल्याचे सतीश कुमार सांगितले.
आणखी वाचा : समान नागरी कायद्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती? संविधान सभेत काय घडले होते?
डच एअरलाइन्सच्या अडचणी वाढणार?
पेरू सहलीसाठी निघालेल्या सतीश कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानात प्रवास नाकारणे ‘केएलएम’ रॉयल डच एअरलाइन्सला महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी न्यायालयाने बेंगळुरू पोलिसांना विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बेंगळुरू विमानतळ ज्या अधिकारक्षेत्रात येते, त्या देवनाहल्ली येथील दिवाणी न्यायालयाने हे आदेश जारी केले आहेत. बोर्डिंग नाकारल्याच्या आरोपावरून विमान कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य परिचालन अधिकारी यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही दुर्मीळ घटना आहे.
सतीशकुमार यांची नेमकी मागणी काय?
सतीशकुमार यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सांगितले की, आमचा लढा हा केवळ पैशांसाठी नसून अन्यायाविरोधातील आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. जर आज आम्ही गप्प बसलो, तर उद्या असा अन्याय कोणासोबतही घडू शकतो, अशी मागणी त्यांनी केली आहे. या वादावर आपली बाजू मांडताना केएलएम रॉयल डच एअरलाइन्सने सांगितले की, प्रवासाचे लागू असलेले सर्व नियम पाळणे ही कंपनीची जबाबदारी आहे. प्रवाशांकडे वैध आणि अचूक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला असला, तरी नियमांचे पालन करण्यावर त्यांनी भर दिला आहे. या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे.
पेरूच्या ‘व्हिसामुक्त’ प्रवेशाचे नियम काय?
सतीशकुमार आणि त्यांच्या कुटुंबाला बेंगळुरू विमानतळावर रोखल्यामुळे आता पेरू देशाच्या व्हिसा नियमांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पेरूमधील भारतीय दूतावासाने २७ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, काही अटींच्या अधीन राहून भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय पेरूमध्ये प्रवेश मिळू शकतो. पर्यटन किंवा व्यवसायानिमित्त अल्पकाळासाठी जाणाऱ्या भारतीयांना ही सवलत लागू आहे. जर भारतीयांकडे अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपियन युनियनमधील कोणत्याही देशाचा सहा महिन्यांचा वैध व्हिसा असेल, तर त्यांना पेरूचा स्वतंत्र व्हिसा काढण्याची आवश्यकता नाही. या नियमांनुसार, भारतीय नागरिक एका वर्षात जास्तीत जास्त १८० दिवसांपर्यंत पेरूमध्ये राहू शकतात.
हेही वाचा : इस्रायलसाठी धोक्याची घंटा? इटलीने रद्द केला संरक्षण करार; युरोप-इस्रायल संबंधांवर काय होणार परिणाम?
बोर्डिंग नाकारल्यास तिकिटाचा परतावा मिळतो का?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांनुसार, विमान कंपन्यांनी बोर्डिंग नाकारल्यास प्रवाशांना परतावा मिळण्याचा अधिकार आहे. जर विमान कंपनीने तांत्रिक/ऑपरेशनल कारणांमुळे प्रवाशाला बोर्डिंग नाकारले, तर त्याला पूर्ण परतावा किंवा पर्यायी विमान उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय प्रवाशाच्या जेवणाची आणि निवासाची सोयही कंपनीला करावी लागते. जर प्रवाशाकडे वैध व्हिसा किंवा आवश्यक कागदपत्रे नसतील, तर त्याला परतावा मिळणे कठीण असते. सतीशकुमार यांच्या प्रकरणात वाद हा कागदपत्रांच्या वैधतेचा आहे. त्यांचा असा दावा आहे की, प्रवासादरम्यान त्यांच्याकडे सर्व वैध कागदपत्रे होती; पण एअरलाइन्सने त्याचा चुकीचा अर्थ काढला. आता न्यायालयाच्या आदेशानंतर ‘केएलएम’ एअरलाइन्स यावर काय अधिकृत भूमिका घेते आणि सतीशकुमार यांना ४९ लाखांचा परतावा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
