Knee Pain, Stiffness And Cartilage Damage: “मी रोज सात ते आठ तास भरपूर झोपतो, तरीही सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर ठेवताना गुडघे जाम आखडलेले असतात. दिवसभर अंगात आणि सांध्यांमध्ये एक प्रकारचा जडपणा राहतो.” हा अनुभव सध्या घराघरांत ऐकायला मिळतो. कोणत्याही मोठ्या आजाराची किंवा सांधेदुखीची सुरुवात अशीच अगदी सौम्य आणि घरगुती तक्रारींपासून होते. सुरुवातीला जिना चढताना-उतरताना थोडा त्रास होतो. नंतर सकाळी उठल्यावर गुडघे आखडल्यासारखे होतात. नंतर चालताना, बसताना किंवा थोडे अंतर चालल्यानंतरही सांध्यात ठणका मारू लागतात.
ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका
बहुतांश लोक याला वाढत्या वयाचा अपरिहार्य परिणाम समजून किंवा कामाचा थकवा म्हणून दुर्लक्ष करतात. कोणत्याही औषधाशिवाय आपल्याला शरीराचे आरोग्य चांगले राखता यायलाच हवे, हा निसर्गाचा नियम आहे. परंतु, आपण अनेकदा आपल्या अवयवांना गृहीत धरतो, त्यांचे वेळेवर ‘तेलवंगण’ करत नाही. या त्रासाचे पुढचे टोक म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस नावाचा सांध्यांचा आजार. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर हे प्रकरण शेवटी महागड्या शस्त्रक्रियेपर्यंत (सर्जरी) जाऊ शकते.
कूर्चास्थी (Cartilage): हाडांमधील मऊ, नैसर्गिक गादी
सांध्यांच्या रचनेचा विचार शास्त्रज्ञांनी आणि आयुर्वेदाने अतिशय बारकाईने केला आहे. स्टिओआर्थरायटिसमध्ये सांध्यातील कूर्चास्थी म्हणजे ‘कार्टिलेज’ (Cartilage) हळूहळू झिजत जाते. ही कूर्चास्थी दोन हाडांच्या सांध्यामध्ये एका मऊ, गादीसारखे काम करते. त्यामुळे आपण जेव्हा चालतो, धावतो, शेतात काम करतो किंवा शरीराचा भार पेलतो, तेव्हा हाडांना थेट कोणताही यांत्रिक धक्का बसत नाही.
सोपी कामेही अवघड वाटू लागतात
पण जेव्हा शरीरातील वात वाढतो किंवा सांध्यांची काळजी घेतली जात नाही, तेव्हा ही गादी पातळ होत जाते आणि हाडांवरचा ताण वाढतो. सांधा दुखू लागतो, हालचाल कमी होते आणि रोजच्या जीवनातील साधी सोपी कामेही अवघड वाटू लागतात. चाळिशीनंतर अनेक प्रौढांना या वातविकाराचा आणि सांधेदुखीचा त्रास जाणवतो. काही संशोधनानुसार चाळिशीनंतर जवळपास प्रत्येक चार प्रौढांपैकी एकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास असू शकतो.

कधी न संपणारा औषधांचा खर्च
या आजाराची सर्वात मोठी अडचण म्हणजे एकदा सांध्यातील कार्टिलेज झिजू लागली की, ती पूर्णपणे पूर्ववत करण्याचा कोणताही सोपा आणि खात्रीशीर रासायनिक उपाय बाजारात उपलब्ध नाही. आधुनिक डॉक्टर यावर वेदना कमी करणारी औषधे (Painkillers), फिजिओथेरपी किंवा सांध्यात थेट इंजेक्शन देण्यासारखे तात्पुरते उपाय सुचवतात. आजार खूप वाढल्यास गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया (Knee Replacement) सुचवली जाते.
चालण्याशी संबंधित सोपा उपाय
परंतु, वारंवार आणि कधी न संपणारा औषधांवरचा खर्च सर्वांनाच परवडेल असे नाही. तसेच प्रत्येक रुग्णावर शस्त्रक्रिया करणे वयाच्या किंवा इतर आजारांच्या कारणांमुळे शक्य होत नाही. अनेकांना वर्षानुवर्षे वेदना सहन करत जगण्याची पाळी येते. अशा परिस्थितिमध्ये संशोधकांनी एक अत्यंत वेगळा, सोपा आणि आशादायक मार्ग सुचवला आहे. हा मार्ग कोणत्याही महागड्या गोळ्या-औषधांचा नसून, तो थेट आपल्या ‘चालण्याच्या नैसर्गिक पद्धतीशी’ (Gait Pattern) संबंधित आहे.
तीन बलाढ्य विद्यापीठांचे संशोधन आणि ‘लॅन्सेट’चा निर्वाळा
युनिव्हर्सिटी ऑफ युटा, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी वर्षभर केलेल्या एका मोठ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे दिसून आले की, काही रुग्णांना त्यांच्या पायाचा कोन (Foot Angle) बदलून चालण्याचे प्रशिक्षण दिल्यावर गुडघ्यावरील अंतर्गत ताण लक्षणीयरीत्या कमी झाला. यामुळे केवळ वेदना कमी होण्यास मदत झाली नाही, तर एमआरआय (MRI) तपासणीत कार्टिलेजची झीज मंदावल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. या संदर्भातील शोधनिबंध ‘The Lancet Rheumatology’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

या संशोधनाचे सहनेतृत्व करणारे स्कॉट उहलरिच सांगतात की, “गुडघ्यावर जास्त भार येणे हे ऑस्टिओआर्थरायटिसशी संबंधित आहे, हे विज्ञानाला आधीपासूनच ज्ञात होते. पायाचा कोन बदलल्यास गुडघ्यावरील काही भार दुसरीकडे वळवला जाऊ शकतो, ही कल्पनाही नवीन नव्हती. पण या पद्धतीचा रुग्णांवर प्रत्यक्ष उपयोग होतो का, हे तपासण्यासाठी शास्त्रीय चाचणी झाली नव्हती, त्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे.”
‘मेडिअल कम्पार्टमेंट’ आणि वैयक्तिक पायाचा कोन
या चाचणीत सौम्य ते साधारण स्वरूपाच्या ‘Medial compartment knee osteoarthritis’ असलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. ‘Medial compartment’ म्हणजे गुडघ्याच्या आतील भाग. आपण जेव्हा चालतो आणि उभे राहतो, तेव्हा शरीराचे वजन गुडघ्याच्या या आतील भागावर अधिक प्रमाणात येते. त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास या भागात जास्त दिसतो. संशोधकांनी याच भागावरील ताण कमी करण्यासाठी चालण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न केला.
आरोग्यरक्षण व रोग निवारणाकरिता नाना गोष्टींची निवड करताना, प्रत्येक रुग्णाच्या स्वतंत्र रचनेचा विचार केला गेला. या उपचारात व्यक्तिनिहाय चाल बदलणे महत्त्वाचे होते, त्यामुळे सर्व रुग्णांना एकच साचेबद्ध सल्ला दिलेला नव्हता.
- काही लोकांमध्ये पायाची बोटे थोडी आत वळवून चालल्यास गुडघ्यांवरचा भार कमी होत होता.
- काहींमध्ये पायाची बोटे बाहेर वळवणे अधिक फायदेशीर ठरत होते.
- काहींसाठी ५ अंशांचा बदल पुरेसा होता, तर काहींसाठी १० अंशांचा बदल आवश्यक होता.
- याउलट, काही लोकांमध्ये कोणताही बदल फायदेशीर ठरत नव्हता.
चुकीचा बदल केल्यास गुडघ्यांवरचा ताण कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता होती. यामुळेच संशोधकांनी प्रत्येक रुग्णाची चाल वैज्ञानिक पद्धतीने मोजली. सुरुवातीच्या भेटीत रुग्णांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्यांना ‘Pressure-sensitive treadmill’ वर चालण्यास सांगितले. त्यांच्या चालण्यातील बदल, पायाचा कोन, गुडघ्याची हालचाल आणि गुडघ्याावर येणारा भार ‘Motion capture cameras’ च्या मदतीने मोजण्यात आला. या तपासणीतून प्रत्येक रुग्णासाठी कोणता फूट अँगल (Foot Angle) सर्वाधिक उपयोगी ठरेल, हे निश्चित करण्यात आले.
प्रयोगाची रूपरेषा
एकूण ६८ सहभागी रुग्णांना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते आणि त्यांना दोन गटांत विभागले गेले:
१. इंटरव्हेंशन ग्रुप (Intervention Group): या गटातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुडघ्यावरील भार सर्वाधिक कमी करणारा वैयक्तिक पायाचा कोन (Gait Retraining) सांगून त्याचे प्रशिक्षण दिले गेले.
२. शॅम ग्रुप (Sham Group): या गटातील लोकांनाही प्रशिक्षण दिले गेले, पण त्यांना दिलेला पायाचा कोन त्यांच्या नैसर्गिक चालण्याच्या पद्धतीसारखाच होता. त्यामुळे प्रत्यक्षात भार कमी करणारा मोठा बदल झालेला नव्हता. अशा प्रकारे मानसिक प्रभावाचा (Placebo Effect) खेळ नियंत्रणात ठेवण्यात आला.
दोन्ही गटांनी सहा आठवडे प्रयोगशाळेत चालण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात सहभागी लोक ट्रेडमिलवर चालत असताना त्यांच्या पिंडरीवर /पोटर्यांवर (Calf Muscle वर) एक विशेष इलेक्ट्रॉनिक उपकरण लावले जात असे. हे उपकरण सतत ‘व्हायब्रेशन फीडबॅक’ (Vibration Feedback) देत असे.
म्हणजेच, चालताना पायाचा कोन योग्य राखला गेला नाही, तर कंपनांद्वारे (Vibrations) रुग्णाला त्वरित सूचना मिळत असे. या सततच्या फीडबॅकमुळे रुग्णांना शरीराविरुद्ध न जाता नवी चाल शिकणे अत्यंत सोपे झाले. सहा आठवडे पूर्ण झाल्यावर त्यांना दररोज किमान २० मिनिटे या नव्या पद्धतीने चालण्याचा सराव करण्यास सांगितले गेले. उद्देश असा होता की, ही नवीन चाल कृत्रिम न राहता संपूर्णपणे अंगवळणी पडावी आणि नैसर्गिक व्हावी.
एमआरआय (MRI) चे निष्कर्ष आणि उपचाराचा परिणाम
एका वर्षानंतर संशोधकांनी जेव्हा रुग्णांची पुन्हा तपासणी केली, तेव्हा निकाल अत्यंत लक्षणीय होते. वैयक्तिक गेट रिट्रेनिंग घेतलेल्या गटातील रुग्णांना शॅम गटाच्या तुलनेत अधिक वेदनाशामक फायदा झाला होता. अभ्यासातील तांत्रिक माहितीप्रमाणे, इंटरव्हेंशन ग्रुपमध्ये ‘Medial Knee Pain’ मध्ये (गुडघ्याच्या आतील वेदनांमध्ये) मोठी घट दिसली. तसेच ‘नी अॅडक्शन मोमेंट पिक’ म्हणजेच गुडघ्याच्या आतील भागावर येणाऱ्या भाराशी संबंधित मोजमापही लक्षणीयरीत्या कमी झाले.
एमआरआय स्कॅनमधून कार्टिलेजच्या मायक्रोस्ट्रक्चरशी संबंधित असलेल्या ‘T1ρ relaxation time’ या मोजमापातही फरक दिसला. इंटरव्हेंशन ग्रुपमध्ये कार्टिलेजच्या आरोग्याशी संबंधित झीज शॅम ग्रुपपेक्षा खूपच कमी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
हा उपचार झिजलेले कार्टिलेज पूर्णपणे नवीन किंवा दुरुस्त करत नाही. मात्र, यामुळे सांध्यांची पुढील झीज बऱ्याच अंशी रोखता किंवा संथ करता येऊ शकते, हे या अभ्यासाने दाखवून दिले आहे.
निसर्गाच्या साहाय्याने औषधमुक्त उपचार
या उपचाराची आणखी एक महत्त्वाची आणि सर्वात चांगली बाजू म्हणजे तो कोणत्याही रासायनिक औषधांवर अवलंबून नाही. अनेक रुग्ण वेदना कमी करण्यासाठी सतत पेनकिलर्स घेतात, परंतु दीर्घकाळ औषध घेताना त्याचे शरीरावर, विशेषतः पोटावर, यकृतावर आणि किडन्यांवर अनेक दुष्परिणाम होण्याची चिंता असते. शस्त्रक्रिया हा एक अत्यंत मोठा आणि खर्चिक निर्णय असतो आणि तो प्रत्येकालाच परवडेल किंवा सोसवेल असे नाही. अशा स्थितीत चालण्याची पद्धत बदलून गुडघ्यावरचा यांत्रिक ताण कमी करणे हा शरीराच्या नैसर्गिक हालचालीवर आधारित एक उत्तम, बिनखर्चाचा घरगुती स्वरूपाचा उपाय ठरू शकतो.
या अभ्यासातील एका सहभागी व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया या उपचाराच्या व्यावहारिकतेकडे लक्ष वेधते. तो म्हणाला, “मला आता कोणतीही औषधं घ्यावी लागत नाहीत किंवा दिवसभर शरीरावर एखादं अवजड उपकरण घालावं लागत नाही.” कारण कोणताही वैद्यकीय उपचार फक्त प्रयोगशाळेत यशस्वी होणे पुरेसे नसते, तो रुग्णाच्या रोजच्या साध्या आयुष्यात उपयोगी पडणे गरजेचे असते. चालण्याची पद्धत एकदा शरीराच्या अंगवळणी पडली, की ती आयुष्यभराची सोबती होते.
सावधानतेचा इशारा: घरी स्वतः प्रयोग करू नका!
तरीही संशोधकांनी एक अत्यंत महत्त्वाचा सावधानतेचा इशारा दिला आहे. हा उपाय रुग्णांनी घरी स्वतःहून किंवा इंटरनेटवर पाहून करून नये. “पायाची बोटे आत वळवा” किंवा “बाहेर वळवा” असा सर्वांसाठी एकच सरधोपट सल्ला योग्य नाही. चुकीच्या प्रमाणात पायाचा कोन बदलून चालण्याचा प्रयत्न केला, तर गुडघ्याच्या इतर चांगल्या भागांवर ताण वाढून वेदना अधिक तीव्र होऊ शकतात. प्रत्येक रुग्णासाठीचा योग्य कोन हा केवळ आणि केवळ प्रयोगशाळेतील ‘बायोमेकॅनिकल अॅनालिसिस’ (Biomechanical Analysis) करूनच ठरवावा लागतो.
भविष्यातील ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान
सध्याच्या घडीला ही पद्धत सर्वसामान्य दवाखान्यात किंवा स्थानिक फिजिओथेरपी केंद्रात सहज उपलब्ध नाही. कारण यासाठी महागडे मोशन कॅप्चर कॅमेरे, प्रेशर सेन्सेटिव्ह ट्रेडमिल्स आणि उच्च प्रशिक्षित संशोधकांची आवश्यकता असते. परंतु, संशोधक भविष्यात हा उपचार अधिक सोपा आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा विचार करत आहेत.
स्मार्टफोनचे व्हिडिओ कॅमेरे, अंगावर परिधान करता येणारे ‘Wearable sensors’, ‘Smart shoes’ (स्मार्ट बूट) किंवा मोबाईल अॅप्सचा वापर करून हे वैयक्तिक चालीचे विश्लेषण तंत्रज्ञान भविष्यात आपल्या जवळच्या क्लिनिकमध्ये आणता येऊ शकते. यामुळे रुग्णाला कोणत्याही मोठ्या प्रयोगशाळेत न जाता, स्वतःच्या घराजवळच्या बागेत किंवा शेतात चालतानाही मोबाईलद्वारे “तुमचा पायाचा कोन योग्य आहे का?” याचा अचूक फीडबॅक मिळू शकेल.
संदर्भ:
Uhlrich, S. D., Mazzoli, V., Silder, A., Finlay, A. K., Kogan, F., Gold, G. E., Delp, S. L., Beaupre, G. S., et al. (2025). Personalised gait retraining for medial compartment knee osteoarthritis: a randomised controlled trial. The Lancet Rheumatology.
