Learn the scientific reasons for knee pain during stair climbing and practical solutions for joint health: “सरळ चालताना काही त्रास होत नाही… पण जिने चढायला लागलं की गुडघा दुखायला लागतो.” हा अनुभव अनेकांना येतो. विशेषतः मध्यमवयीन व्यक्ती आणि बैठ्या कामामुळे स्नायू कमकुवत झालेल्या लोकांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. मग प्रश्न असा, सपाट पृष्ठभागावर चालताना गुडघा दुखत नाही पण जिने चढतानाच गुडघा का दुखतो? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला गुडघा ‘कसा काम करतो’ हे समजून घ्यावं लागेल.
जिने चढणं आणि साधं चालणं फरक काय?
आपल्याला दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात, पण शरीरासाठी त्या खूप वेगळ्या आहेत. सरळ चालताना शरीराचं वजन तुलनेने समान पद्धतीने वाटलं जातं, गुडघ्यावरचा ताण नियंत्रित असतो, हालचाल रीदमिक असते. पण जिने चढताना शरीराचं पूर्ण वजन एका पायावर येतं, गुडघ्याला शरीर वर उचलावं लागतं, स्नायूंना जास्त ताकद लावावी लागते म्हणजेच, जिने चढताना गुडघ्यावरचा ‘लोड’ अचानक वाढतो.
गुडघ्यावर नेमका ताण कुठे येतो?
गुडघ्याच्या पुढच्या भागात एक लहान हाड असत याला ‘पटेला’ म्हणतात. जिने चढताना पटेला आणि मांडीचं हाड (femur) यांच्यात घर्षण होऊन जास्त दाब तयार होतो. विशेषतः जिने चढताना बसलेल्या जागेतून उठताना, खाली बसताना हा दाब वाढतो. जर स्नायू कमकुवत असतील, हालचाल नियंत्रित नसेल, वजन जास्त असेल तर हा ताण वेदनांमध्ये बदलू शकतो.

खुब्याचा आणि गुडघ्याचा संबंध
हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. अनेक वेळा गुडघा दुखतो, पण मूळ कारण खुब्यात असतं. जर खुब्याच्या आजूबाजूचे स्नायू कमकुवत असतील, शरीराचा तोल नीट राखला जात नसेल तर जिने चढताना गुडघ्यावर जास्त भार पडतो. म्हणूनच फिजिओथेरेपीमध्ये फक्त गुडघ्यावर उपचार केले जात नाहीत, तर खुब्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची कार्यक्षमता, घोट्याचा सांधा आणि चालण्याची पद्धत हे सगळं तपासलं जातं.
चालताना वेदना नाहीत नाही, पण जिने चढताना का?
कारण जिने चढणं हे शरीरासाठी अधिक ‘डिमांडिंग टास्क’ आहे. जिने चढताना गुडघा जास्त वाकतो, स्नायूंना जास्त ताकद लावावी लागते, सांध्यांवर कंप्रेसिव्ह लोड वाढतो म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यात वेदना फक्त जिन्यावर जाणवतात.
जिने उतरताना जास्त त्रास का होतो?
काही व्यक्तींना जिने चढताना कमी आणि उतरताना जास्त त्रास होतो. कारण उतरताना शरीराचं वजन ‘कंट्रोल’ करावं लागतं, मांडीचे स्नायू इसेंट्रिक पद्धतीने काम करतात, गुडघ्यावरचा दाब आणखी वाढतो म्हणून उतरणं अनेकदा अधिक वेदनादायक वाटू शकतं.
या वेदना कुणामध्ये अधिक प्रमाणात होऊ शकतात?
- वजन जास्त असणारे
- कमी हालचाल करणारे
- बैठे काम करणारे
- गुडघ्याचा ऑस्टिओ आर्थराइटिस असणारे
- व्यायाम न करणारे
- जिन्याचा वापर अचानक वाढलेले लोक
गुडघ्यातील वेदना म्हणजे प्रत्येकवेळी कार्टिलेजला इजा होतेच का?
अनेकांना वाटतं की गुडघा दुखतो म्हणजे सांधा घासला गेला. पण प्रत्येक वेळी तसं नसतं.
कधी कधी, स्नायूंची अकार्यक्षमता, भार सहन करण्याची क्षमता कमी असणं, हालचालींचा ताण
यामुळेही वेदना होऊ शकतात.
काय काळजी घ्यावी?
१. हालचाल पूर्ण बंद करू नका
दुखतंय म्हणून जिने चढणं बंद करणं हा उपाय नेहमी योग्य नसतो. योग्य प्रमाणात हालचाल आवश्यक असते.
२. स्नायूंची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं
विशेषत: मांडीचे स्नायू आणि खुब्याच्या आजूबाजूचे स्नायू हे बळकट असणं गरजेचं आहे.
३. वजन नियंत्रण
वजन वाढलं की गुडघ्यावरचा भार वाढतो. त्यामुळे वाढलेलं वजन कमी करणं आणि ते नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
४. अचानक लोड वाढवू नका
अचानक खूप जिने चढणं किंवा उतरणं टाळा.
५. योग्य फुटवेअर
पायाला सपोर्ट देणारी पादत्राणे वापरणं महत्वाचं आहे.
फिजिओथेरेपीची भूमिका
फिजिओथेरेपीमध्ये हालचाली, स्नायूंची कार्यक्षमता, तोल सांभाळण्याची क्षमता आणि हालचालींचा पॅटर्न
यांचा अभ्यास केला जातो. फिजिओथेरेपिस्ट योग्य स्ट्रेंग्थेनिंग व्यायाम देतात, लोड मॅनेजमेंट शिकवतात, जिनेचढण्याची पद्धत सुधारतात यामुळे वेदना कमी होतात, कॉन्फीडन्स वाढतो, दैनंदिन हालचाली सोप्या होतात
महत्त्वाची जाणीव
बहुतेकदा गुडघा हा फक्त ‘वेदना जाणवणारा भाग’ असतो. अनेक वेळा समस्या संपूर्ण हालचालीच्या पद्धतीत असते. जिने चढताना आणि उतरताना गुडघा दुखणं ही सामान्य समस्या आहे, पण ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
लक्षात ठेवा:
- जिने चढताना गुडघ्यावरचा ताण वाढतो
- स्नायूंची ताकद आणि हालचाल महत्त्वाची असते
- वेदना म्हणजे नेहमी मोठं डॅमेज नाही
शरीर हालचालीसाठी तयार झालेलं आहे, फक्त त्याला योग्य तयारी आणि योग्य लोडची गरज असते.
