Understand how a knee pain xray report reveals joint degeneration reasons without triggering immediate physical discomfort or structural failure: “डॉक्टर, माझ्या गुडघ्याच्या एक्स-रेमध्ये झीज दिसतेय. पण मला काहीच त्रास नाही. मग ही झीज नेमकी किती गंभीर आहे?” एक मध्यमवयीन गृहिणी मला विचारत होती, किंवा काही वेळा काही रुग्ण असंही सांगतात की “मला चालताना, जिने चढताना किंवा खुर्चीतून उठताना खूप वेदना होतात. पण रिपोर्टमध्ये काहीच विशेष दिसत नाही.” वरच्या दोन्हीही प्रसंगांमध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे रिपोर्टमध्ये दिसणारे बदल आणि वेदना यांचा नेमका संबंध काय असतो.

अनेकांना वाटतं की एक्स-रेमध्ये जितकी जास्त झीज दिसेल, तितक्या जास्त वेदना असायला हव्यात. पण शरीराची रचना आणि वेदनांचं विज्ञान यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आहे.

झीज म्हणजे नेमकं काय?

वय वाढत असताना शरीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात. जसं की, केस पांढरे होतात, त्वचेवर सुरकुत्या पडतात, तसंच सांध्यांमध्येही काही बदल दिसू लागतात.
उदाहरणार्थ:

  • सांध्यांमधील जागा कमी होणं
  • हाडांचे छोटे वाढीव भाग (osteophytes)
  • कार्टिलेज मधील बदल
  • ऑस्टिओआर्थरायटिसची सुरुवातीची चिन्हं

हे बदल एक्स-रेमध्ये दिसू शकतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बदल अनेक वेळा वयाचा भाग असतात. ते दिसले म्हणजे वेदना असतीलच असं नाही.

रिपोर्ट आणि वेदना नेहमी जुळतातच असं नाही

गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की, अनेक लोकांच्या गुडघा, कंबर किंवा मानेच्या एक्स-रेज मधे झीज किंवा वयानुसार होणारे बदल दिसतात (डिजनरेशन) दिसते, पण त्यांना कोणताही त्रास नसतो. तसंच काही व्यक्तींना खूप वेदना असतात, पण त्यांच्या रिपोर्टमध्ये फारसे बदल दिसत नाहीत. याचा अर्थ असा की, रिपोर्ट आणि वेदना यांच्यात संबंध असतो, पण तो नेहमीच सरळ आणि एक-एक असा नसतो.

वेदना फक्त सांध्यांमधून निर्माण होत नाही…

आपण अनेकदा वेदनांकडे फक्त हाडं किंवा सांधे यांच्याशी संबंधित समस्या म्हणून पाहतो. पण प्रत्यक्षात वेदना हा शरीर आणि मेंदू यांच्यातील एक अनुभव असतो. वेदनांवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक: स्नायूंची ताकद, सांध्यांची हालचाल, मज्जासंस्था (nervous system), झोप, मानसिक ताण, शारीरिक सक्रियता आणि पूर्वीचे वेदनांचे अनुभव. म्हणूनच दोन व्यक्तींचे रिपोर्ट सारखे असले तरी त्यांना होणाऱ्या वेदनेची तीव्रता, प्रमाण, आणि एकंदरीत वेदनांचा अनुभव पूर्णपणे वेगळा असू शकतो.

गुडघ्याचं उदाहरण

समजा दोन व्यक्तींना ऑस्टिओआर्थरायटिस आहे. दोघांच्या एक्स-रेमध्ये जवळपास समान प्रमाणात झीज दिसते.
पहिली व्यक्ती:

  • नियमित चालते
  • वजन नियंत्रणात आहे
  • सक्रिय जीवनशैली आहे
  • वेदना कमी आहेत

दुसरी व्यक्ती:

  • कमी हालचाल करते
  • वजन जास्त आहे
  • स्नायू कमकुवत आहेत
  • वेदना जास्त आहेत

दोघांचे एक्स-रे सारखे असले तरी त्यांचा अनुभव वेगळा आहे. कारण वेदना ही फक्त सांध्याची झीज किती आहे यावर अवलंबून नसते.

कॅपॅसिटी आणि लोड यांचं गणित

  • फिजिओथेरेपीमध्ये कॅपॅसिटी आणि लोड ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते.
  • कॅपॅसिटी म्हणजे शरीराची एखादा ताण सहन करण्याची क्षमता.
  • लोड म्हणजे प्रत्यक्षात शरीरावर येणारा ताण.
  • उदाहरणार्थ: जर एखाद्या व्यक्तीचे स्नायू कमकुवत असतील आणि अचानक जास्त चालणं, जिने चढणं किंवा वजन उचलणं सुरू झालं, तर शरीरावरचा लोड वाढतो. या वेळी वेदना निर्माण होऊ शकतात, जरी एक्स-रेमध्ये फारसा बदल दिसत नसला तरी. उलट, एखाद्या व्यक्तीची क्षमता चांगली असेल तर झीज असूनही ती व्यक्ती वेदनामुक्त राहू शकते.

एमआरआयमधील शब्दांना घाबरायचं का?

कंबर किंवा मानेच्या एमआरआयमध्ये अनेकदा असे शब्द दिसतात:

  • Disc bulge
  • Disc degeneration
  • Spondylosis
  • Wear and tear
    हे शब्द वाचल्यावर अनेक जण घाबरतात. पण संशोधन सांगतं की, यापैकी बरेच बदल वेदना नसलेल्या लोकांमध्येही आढळतात. म्हणूनच रिपोर्टमधील प्रत्येक बदल म्हणजे गंभीर समस्या असंच समजणं चुकीचं ठरू शकतं.

रिपोर्टची भीतीही वेदना वाढवू शकते

काही वेळा “झीज” किंवा “डिजनरेशन” हे शब्द वाचून व्यक्ती घाबरते.
मग ती:

  • कमी चालू लागते
  • जिने टाळते
  • वाकणं टाळते
  • हालचालींची भीती बाळगते
    यामुळे स्नायू आणखी कमकुवत होतात, शरीराची क्षमता कमी होते आणि वेदना टिकून राहू शकतात.
    म्हणजेच काही वेळा रिपोर्टपेक्षा त्याबद्दलची भीती जास्त नुकसान करू शकते.

फिजिओथेरेपीची भूमिका

फिजिओथेरेपीमध्ये केवळ रिपोर्टकडे पाहून उपचार ठरवले जात नाहीत.
त्याऐवजी खालील गोष्टींचं मूल्यांकन केलं जातं:

  • व्यक्तीची हालचाल
  • चालण्याची पद्धत
  • स्नायूंची ताकद
  • संतुलन
  • दैनंदिन काम करण्याची क्षमता

याचा प्रमुख उद्देश असतो:

  • शरीराची क्षमता वाढवणं
  • आत्मविश्वास परत मिळवणं
  • योग्य हालचाली शिकवणं
  • वेदना कमी करणं
    अनेक वेळा वेदना कमी करण्यासाठी एक्स-रे बदलण्याची गरज नसते; शरीराची कार्यक्षमता सुधारण्याची गरज असते.

एक्स-रेमध्ये किंवा एमआरआयसारख्या तपासण्यांमध्ये झीज दिसणं म्हणजे वेदना असतीलच असं नाही. आणि वेदना असणं म्हणजे रिपोर्टमध्ये मोठी समस्या दिसलीच पाहिजे असंही नाही.

काय लक्षात ठेवाल?

  • वेदना अनेक घटकांवर अवलंबून असतात.
  • शरीराची क्षमता, हालचाल, झोप आणि जीवनशैली यांचाही तितकाच प्रभाव असतो.
  • तपासण्यांमध्ये “झीज” हा शब्द दिसला म्हणून घाबरण्याची गरज नाही.