– हृषिकेश देशपांडे

ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लमीन (एमआयएम) या पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन मुंबईत पार पडले. राज्यात १४ ते १६ टक्के मुस्लीम मतदार असल्याचा अंदाज आहे. एक खासदार, दोन आमदार तसेच काही शहरांमध्ये नगरसेवक असे महाराष्ट्रात या पक्षाचे बळ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) त्यांनी ४४ जागा लढविल्या होत्या. त्यात पूर्वीच्या दोन जागा जाऊन नव्या दोन मिळाल्या. आता महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा प्रश्नच आहे. कारण पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी त्यांची युती होती. आता एमआयएम मित्रांच्या शोधात आहे. राज्यातील राजकारण दोन आघाड्यांभोवतीच सध्या केंद्रित झाले आहे. अशा वेळी ही कोंडी कशी फोडणार, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”

हैदराबाद येथे प्रभाव…

पक्षाध्यक्ष असादुद्दिन ओवेसी हे हैदराबादचे खासदार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हैदराबाद शहरातील मुस्लीमबहुल भागावर एमआयएमची पकड आहे. या पक्षातून काही जण बाहेर पडले, त्यांनी मूळ पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. हैदराबाद शहरातील विधानसभेच्या पाच ते सहा जागा एमआयएमला हमखास मिळतात. महापालिका त्यांच्याच ताब्यात आहे. अर्थात त्यामागे काही प्रमाणात संस्थात्मक काम त्यांनी शहरात उभे केले आहे. बँक, शिक्षण संस्था या पक्षाशी निगडित आहेत. तेलंगणमध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीपाठोपाठ सध्या विधानसभेत एमआयएमचे सात सदस्य आहेत. कारण प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सातत्याने फूट पडली. हैदराबाद स्थित हा पक्ष राष्ट्रव्यापी करण्यासाठी ओवेसी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र देशपातळीवर अद्याप त्याला फारसे यश मिळालेले नाही.

बिहारमध्ये निकाल फिरवला?

एमआयएम जी मते घेईल त्याचा लाभ भाजपला होतो असा आरोप त्यांच्यावर विरोधक करतात. अर्थात त्यांना तो मान्य नाही. लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असा एमआयएमचा युक्तिवाद आहे. गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत (२०२०) एमआयएमने राज्यात दीड टक्के मते मिळवत पाच जागा जिंकल्या होत्या. मुस्लीमबहुल सीमांचल भागात हे आमदार विजयी झाले. त्यात प्रामुख्याने किशनगंज जिल्हा व आसपासच्या परिसराचा समावेश आहे. त्यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या पुढाकाराने महाआघाडीविरोधात भाजप-संयुक्त जनता दल यांची आघाडी असा सामना होता. त्यात राजदची सत्ता थोडक्यात हुकली होती. त्याला एमआयएमने घेतलेली मते कारणीभूत होती. याखेरीज अलीकडे बिहारमध्ये एका पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला तेथेही एमआयएमची मते निर्णायक ठरली होती. त्या अर्थाने बिहारमध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळाले. मात्र उत्तर प्रदेशात विधानसभेला त्यांना विशेष यश मिळाले नाही. पुढे बिहारमध्येही त्यांच्या पाच पैकी चार आमदारांनी राजदची वाट धरली.

महाराष्ट्रात चित्र वेगळे…

उत्तर प्रदेशपाठोपाठ सर्वाधिक ४८ खासदार महाराष्ट्रातून जातात. त्यामुळेच राज्यावर त्यांचे लक्ष आहे. सध्या धुळे तसेच मालेगावमध्ये एमआयएमचे आमदार आहेत. याखेरीज नांदेडमध्ये त्यांच्या उमेदवाराचा विजय थोडक्यात हुकला होता. नांदेड महापालिकेतही त्यांना काही जागा मिळाल्या. एकेकाळी पत्रकारितेत असलेल्या इम्प्तियाज जलील यांच्या लोकसभेवरील विजयाने औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला होता. अर्थात मतविभागणीमुळे जलील लोकसभेत पोहोचले. विषयांची अचूक मांडणी, समाजाचे प्रश्न मांडण्याची हातोटी याच्या जोरावर त्यांची कामगिरी लक्षवेधक ठरली खरी. भाजपला पराभूत करणाऱ्या प्रभावी पक्षाशी आघाडीस आमचे दरवाजे उघडे आहेत असे जलील यांनी स्पष्ट केले असले तरी, महाराष्ट्रात त्यांचा मित्रपक्ष कोण असणार? राज्यात दोन आघाड्यांमध्ये सामना आहे. तसेच अल्पसंख्याक मतदार प्रामुख्याने काँग्रेसच्या पाठीशी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे एमआयएमची राज्यातील वाटचाल आव्हानात्मक आहे. काही संस्थात्मक काम उभे केल्यास मते मिळू शकतात. मुंबई येथे पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच झाले. त्या दृष्टीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात विस्ताराची त्यांना महत्त्वाकांक्षा असली तरी, संभाव्य आघाडी, मित्र पक्ष कोण, याचे उत्तर मिळत नाही. लोकसभेला वर्षभराचा अवधी आहे. त्यामुळे याबाबत स्पष्टता गरजेची आहे.

हेही वाचा : ‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

ठाकरे गटाला लाभ?

गेल्या काही वर्षांत राज्यात मुस्लीम मतदारांचे चित्र बदलले आहे. मुंबई महापालिकेत गेल्या वेळी शिवसेनेकडून अल्पसंख्याक नगरसेवक विजयी झाले होते. काँग्रेसही कमकुवत होत असल्याने भाजपला पराभूत करेल असा पर्याय म्हणून ठाकरे गटाकडे मुस्लीम मतदार पहात आहेत. त्यामुळे मुंबईत मु्स्लिमांची मोठ्या प्रमाणात मते त्यांना मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे येथेही एमआयएमला मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये त्यांनी पक्ष संघटना उभारणीचा प्रयत्न केला. मात्र त्यात सातत्य नाही. पतंग ही या पक्षाची निशाणी आहे. त्यामुळे एमआयएमचा पतंग राज्यात किती भरारी घेणार याची उत्सुकता आहे.