– अमोल परांजपे

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणी निक्की हॅले यांनी २०२४च्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अर्थात, ही उमेदवारी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी (प्रायमरीज) आहे. त्यांना आधी आपले नेतृत्व पक्षात सिद्ध करावे लागेल आणि त्यामध्ये त्या यशस्वी झाल्या, तर मग अमेरिकन जनतेच्या दरबारात जावे लागेल. त्यांची ही वाटचाल किती खडतर असेल, त्यांच्यासमोर कोणती आव्हाने आहेत, याचा आढावा घेणे आवश्यक आहे.

Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
Parbhani, Vitekar
महायुतीकडून परभणीत विटेकर की बोर्डीकर ? भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात नाराजी

उमेदवारी लवकर जाहीर केल्याचा हॅले यांना फायदा होईल?

अमेरिकेमध्ये राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल, तर आधी आपल्या पक्षातून निवडून यावे लागते. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक असे दोन मोठे पक्ष तेथे आहेत. निक्की हॅले या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या आहेत. मंगळवारी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उतरत असल्याचे त्यांनी एका दृक्-श्राव्य संदेशाद्वारे जाहीर केले. रिपब्लिकन पक्षातून अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेल्या त्या दुसऱ्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी आपली प्रचार मोहीम आधीच सुरू केली आहे. पक्षांतर्गत निवडणुकीला अद्याप अवकाश असताना हॅले यांनीही उमेदवारी जाहीर केल्यामुळे सध्या तरी ट्रम्प हेच त्यांचे प्रमुख विरोधक आहेत.

हॅले यांची राजकीय पार्श्वभूमी काय?

हॅले या रिपब्लिकन पक्षातील बड्या नेत्या मानल्या जातात. २०११ ते २०१७ या सहा वर्षांच्या काळात त्या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर होत्या. जानेवारी २०१७मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅले यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणून केली. या काळात त्यांनी उत्तर आणि दक्षिण कोरियातील वादामध्ये लष्करी बळाचा वापर करण्याची भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये इस्रायलचे समर्थन केले. डिसेंबर २०१८मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

ट्रम्प आणि हॅले यांचे संबंध कसे आहेत?

२०१८च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी झालेल्या ‘प्रायमरीज’मध्ये ट्रम्प यांना दक्षिण कॅरोलिना राज्याने मोठा हात दिला होता. २०२२च्या अध्यक्षीय निवडणुकीत हॅले यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. मात्र हे साधारणत: अमेरिकेतील परंपरेला धरून होते. विद्यमान राष्ट्राध्यक्ष पुन्हा निवडणूक लढत असेल, तर त्याला पक्षातून शक्यतो कुणी आव्हान देत नाही. या परंपरेला अनुसरून हॅले यांनी पाठिंबा दिला असला तरी त्या दोघांनी अनेकदा एकमेकांवर जाहीर टीका केली आहे. विशेषत: ६ जानेवारी २०२१च्या कॅपिटॉल दंगलींनंतर हॅले यांनी ट्रम्प यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती.

भारतीय वंशाच्या नेत्या असल्याचा फायदा होईल?

आपली उमेदवारी जाहीर करताना दिलेल्या दृक्-श्राव्य संदेशाच्या पहिल्याच वाक्यात हॅले यांनी आपल्या भारतीय वंशाची ओळख दिली आहे. ‘मी भारतातून आलेल्यांची कन्या असल्याचा मला अभिमान आहे. मी श्वेतवर्णीय नाही. कृष्णवर्णीय नाही. मी सर्वांपेक्षा वेगळी आहे,’ या वाक्याने त्यांनी आपला संदेश सुरू केला आहे. २०१८च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेत असलेल्या भारतीय वंशाच्या मतदारांनी ट्रम्प यांना भरभरून पाठिंबा दिला होता. रिपब्लिकन पक्षातून उमेदवारी मागताना ट्रम्प यांच्या भात्यामधले हे शस्त्र त्यांच्या भारतीय वंशामुळे निष्क्रिय होऊ शकते.

ट्रम्प यांच्याखेरीज हॅले यांना कुणाचे आव्हान असेल?

सध्या या दोघांव्यतिरिक्त पेरी जॉन्सन, स्टीव्ह लॅफे आणि कोरी स्टॅपल्टन या तिघांनी रिपब्लिकन पक्षातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तर फ्लोरिडामधील उद्योजक विवेक रामस्वामी यांनीही प्रायमरीजमध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत. असे झाल्यास ते भारतीय वंशाचे दुसरे उमेदवार ठरतील. मात्र ट्रम्प-हॅले यांच्या तुलनेत हे सर्वजण फारच दुबळे उमेदवार आहेत. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, माजी उपाध्यक्ष माइक पेन्स, माजी सुरक्षा सल्लागार जॉन बाल्टन अशी काही मोठी नावेही चर्चेत असून त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यास हॅले यांना या सर्वांशी दोन हात करावे लागतील.

हेही वाचा : विश्लेषण : फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?

पहिल्या महिला, पहिल्या भारतीय वंशाच्या अध्यक्ष होण्याची संधी?

हॅले या रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरल्या तर त्यांना बहुधा जो बायडेन यांच्याशी मुकाबला करावा लागेल. त्यामुळेच त्यांनी आपल्या पहिल्या संदेशात नव्या पिढीकडे सूत्रे देण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प आणि बायडेन या दोघांपेक्षा हॅले वयाने कितीतरी लहान आहेत. हे मुद्दे मतदारांच्या गळी उतरविण्यात त्या यशस्वी झाल्या, तर मात्र पहिल्या भारतीय वंशाच्या आणि पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा इतिहास त्या घडवू शकतात.

amol.paranjpe@expressindia.com