scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण: बांगलादेश निर्मिती हा भारतासाठी ऐतिहासिक विजय आणि पाकिस्तानसाठी दारुण पराभव का होता? वाचा सविस्तर…

भारतासह बांगलादेशमध्ये १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये पाकिस्तानपासून अधिकृतपणे स्वतंत्र झाल्यानं या दिवसाला खूप विशेष महत्त्व आहे.

भारतासह बांगलादेशमध्ये १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये पाकिस्तानपासून अधिकृतपणे स्वतंत्र झाल्यानं या दिवसाला खूप विशेष महत्त्व आहे. पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करणं आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा जमीन, हवा आणि पाणी अशा सर्वच पातळ्यांवर पराभव करणं भारतासाठी ऐतिहासिक विजय होता. कारण या युद्धाचे, बांगलादेश निर्मितीचा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर एक राष्ट्र म्हणून मोठा परिणाम झाला. याशिवाय शत्रू राष्ट्रांनाही यातून खूप सडेतोड संदेश गेला.

बांगलादेश मुक्ती संग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदोलनाचं रुपांतर कधी भारत-पाकिस्तान युद्धात झालं हे जगाला समजू पर्यंत भारताने बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. यामुळे पाकिस्तानची सगळ्याच स्तरावर नाचक्की झाली. विशेष म्हणजे या युद्धाच्या वेळी भारताने पाकिस्तानशी जवळीक साधून असलेल्या अमेरिकेचाही दबाव झुगारला. यामुळेच जगभरात भारताची प्रतिमा एक कणखर आणि सार्वभूम राष्ट्र म्हणून झाली.

९३ हजार पाकिस्तानी सैन्याची शरणागती

विशेष म्हणजे पाकिस्तानने या युद्धात आपली संपूर्ण ताकद लावली. मात्र, भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानला लोटांगण घालावं लागलं. १९ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याचे जनरल आमीर अब्दुलाह खान नैझी यांनी ९३ हजार पाकिस्तानी सैन्यासह भारतीय सैन्य आणि मुक्ती वाहिनीसमोर ढाका येथे शरणागती पत्करली.

बांगलादेश निर्मितीत भारताची भूमिका काय?

तसं पाहिलं तर अधिकृतपणे तत्कालीन भारत आणि पाकिस्तानमध्ये केवळ १३ दिवस युद्ध चाललं. मात्र, प्रत्यक्षात पूर्व पाकिस्तानमधील (आत्ताचा बांगलादेश) बंडखोर आणि पाकिस्तानमध्ये त्याआधी बराच काळ म्हणजे मार्च १९७१ पासूनच संघर्ष सुरू होता.

“बंगाली नागरिकांच्या नागरी आणि राजकीय अधिकारांवरच टाच”

पाकिस्तानच्या सैन्याने पूर्व पाकिस्तानमधील बंगाली नागरिकांच्या नागरी आणि राजकीय अधिकारांवरच टाच आणली. त्यामुळे अखेर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशमधील या बंगाली लोकांना मदतीचा हात दिला. ही मदत बराच काळ गुप्तपणे करण्यात आली. अखेर शेवटच्या टप्प्यात ३ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्य अधिकृतपणे बंगाली नागरिकांच्या पाठिशी उभं राहिलं.

“जागतिक पातळीवर हे युद्ध संपवण्यासाठीही दबाव”

भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशमधील नागरिकांना पाठिंबा दिल्यानं पाकिस्तानची मोठी कोंडी झाली. पाकिस्तानला पूर्व पाकिस्तानवर नियंत्रण ठेवण्याच्या सर्व आशा सोडून द्याव्या लागल्या. यानंतर काही दिवसातच जागतिक पातळीवर हे युद्ध संपवण्यासाठीही दबाव तयार झाला. यातूनच पाकिस्तानला पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश म्हणून स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य करावा लागला. तसेच भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करावी लागली.

हेही वाचा : Video : १९७१ च्या युद्धात भारताच्या ‘किलर्स स्क्वॉड्रन’नं थेट कराची बंदरावर चढवला होता हल्ला; जाणून घेऊया नौदलाच्या या ताफ्याबद्दल!

बांगलादेशमधील बंगाली नागरिकांच्या अधिकारांसाठी भारतीय सैन्याने आपली जीवाची बाजी लावली. यात पाकिस्तानचा पराभव होऊन नाचक्की झाली. मात्र, या लढाईत काही जवान शहीदही झाले. याच वीरांच्या आठवणीत हा विजयाचा दिवस साजरा केला जातो. तसेच शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know all about historical victory of india for bangladesh in 1971 war against pakistan pbs