– कुलदीप घायवट

देशातील पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बेस्ट बसचे लोकार्पण ऑगस्ट २०२२मध्ये झाले. येत्या काही दिवसांत ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईत सध्या डिझेलवर चालणारी दुमजली बस आहे. डिझेल बसची किंमत ३५ लाख रुपये, तर विद्युत दुमजली वातानुकूलित बसची किंमत दोन कोटी रुपये आहे. तसेच विद्युत दुमजली वातानुकूलित बसपेक्षा डिझेल बसमध्ये अधिक प्रवासी बसण्याची क्षमता आहे. असे असताना १ कोटी ६५ लाख रुपये जास्त मोजून नवीकोरी बस मुंबईकरांच्या आणि बेस्ट उपक्रमाच्या फायद्याची ठरणार की बेस्टला आणखी तोट्यात नेणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

बेस्टची भूमिका काय?

मुंबईतील वाढती वाहतूककोंडी, वाढते प्रदूषण, वाहन उभे करण्यास अपुरी जागा, रस्त्यांची चाळण झाल्याने खासगी वाहनांचे होणारे नुकसान, इंधनाचे वाढलेले दर, टॅक्सी-रिक्षाचे वाढते दर यांसारख्या अनेक समस्यांवर एकमेव तोडगा म्हणून बेस्टच्या नव्याकोऱ्या आणि पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसकडे बेस्टच्या चश्म्यातून पाहिले जात आहे. मुंबईच्या अतिप्रदूषित आणि उष्ण-दमट वातावरणातून प्रवास करण्याऐवजी आल्हाददायक गारेगार प्रवास अगदी बोटावर मोजण्याइतक्या रुपयांत होईल. डिझेल बससाठी प्रतिकिमी १५० रुपये आणि विदुयत बससाठी प्रतिकिमी ५६ रुपये खर्च येतो. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर विद्युत दुमजली वातानुकूलित बस चालवणे मुंबईकरांसह बेस्ट उपक्रमासाठी हिताचे ठरणार आहे. काही दिवसांत मुंबईच्या रस्त्यांवर बहुसंख्येने विद्युत दुमजली वातानुकूलित बस धावणार असल्याने सध्याचे अपेक्षांचे धूसर चित्र येत्या दिवसांत सुस्पष्ट होईल.

बेस्टचा इतिहास काय?

घोड्याने ओढायच्या ट्रामपासून ते डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रीड वातानुकूलित बस प्रवास मुंबईने पाहिला आहे. मुंबईचे रस्ते बेस्ट बसच्या बदलत्या स्वरूपाचे, जडणघडणीचे साक्षीदार आहेत. आता प्रदूषणविरहीत विद्युत दुमजली वातानुकूलित बस मुंबईकरांसाठी सुरू केली जाणार आहे. मुंबईत बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ पासून सुरू झाली. ही बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. त्यापूर्वी मुंबईत ट्राम धावत होती. कालांतराने त्यात बदल होत गेले आणि एकमजली बसच्या साथीला दुमजली बसही प्रवाशांच्या सेवेत आली. बेस्टची पहिली दुमजली बस १९३७ साली मुंबईकरांच्या सेवेत आली. १९४७ साली कंपनीचे नाव ‘बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट’ असे करण्यात आले. तर, १९९५ पासून बॉम्बेच्या जागी बृहन्मुंबई नाव वापरले जाऊ लागले. संपूर्ण शहरामध्ये बेस्ट सेवा दररोज हजारो प्रवाशांना सेवा देते.

प्रदूषणमुक्त प्रवास होणार का?

मुंबईतील हवा प्रदूषणात ३० टक्के वाटा हा वाहतूक क्षेत्राचा आहे. त्यामुळे मुंबईतील वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची पातळीही वाढत चालली आहे. खासगी वाहनांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रवाशांना खासगी वाहनांप्रमाणे प्रवास करता यावा यासाठी विद्युत दुमजली वातानुकूलित बसची मुंबईकरांना आवश्यकता आहे. देशातील ३५ टक्के प्रदूषण हे पेट्रोल – डिझेलमुळे होते. त्यामुळे वाहतुकीसाठी पारंपरिक इंधनाव्यतिरिक्त पर्यायी इंधनांचा वापर करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. विजेवर चालणाऱ्या बसमुळे प्रदूषण काही प्रमाणात कमी होईल. तसेच आयात इंधन तेलावरचे अवलंबित्व कमी होणार आहे.

मुंबईकरांना फायदा होणार का?

लंडनच्या धर्तीवर देशातील पहिली विद्युत दुमजली वातानुकूलित बस सेवा लवकरच मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने मुंबईतील प्रवासी खर्च खिशाला भार झाला आहे. मात्र, या बससाठी प्रति ५ किमीला ६ रुपये आकारले जाणार असल्याने मुंबईकरांच्या फायद्याचे ठरणार आहे सध्या मुंबईत धावणाऱ्या विनावातानुकूलित बसची जागा वातानुकूलित बस घेणार आहेत.

तोट्यातील बेस्टला नवसंजीवनी मिळणार का?

बेस्टने २०१९मध्ये नवीन पर्व सुरू करून सुधारित भाडेदर जाहीर केले. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित बस भाडेतत्त्वावर समाविष्ट करून बसचा ताफा वाढवला. त्यानंतर हळूहळू प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने महसूल वाढला. मात्र, अद्यापही बेस्ट फायद्यात नाही. दोन कोटींच्या नव्याकोऱ्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसच्या पहिल्याच फेरीमुळे तोट्यातील बेस्ट उपक्रमाला नवसंजीवनी मिळणार आहे. या बसमुळे बेस्टचा नफा वाढत जाणार आहे. या बसचा प्रतिकिमी ५६ रुपये खर्च होईल आणि ७५ रुपये उत्पन्न मिळेल. त्यामुळे १९ रुपयांचा निव्वळ नफा बेस्टच्या तिजोरी जमा होणार आहे. मार्चपर्यंत आणखीन २० विद्युत दुमजली वातानुकूलित बस दाखल होणार असल्याने बेस्टचा संचित तोटा कमी होत जाईल असा दावा बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २०० दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने वर्षाला सुमारे दोन कोटी ६० लाख लीटर डिझेलवरील खर्च वाचणार आहे.

पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसची वैशिष्ट्ये काय?

सध्या बेस्टच्या ताफ्यात डिझेलवर चालणाऱ्या विनावातानुकूलित ४५ दुमजली बस आहेत. या बसची एकूण प्रवासी क्षमता ७८ आहे. तर, विद्युत दुमजली वातानुकूलित बसमध्ये एकूण ६५ आसने असून पहिल्या मजल्यावर ३० आसने आणि दुसऱ्या मजल्यावर ३५ आसने आहेत. विनावातानुकूलित दुमजली बसमध्ये एकच जिना होता. मात्र, विद्युत दुमजली वातानुकूलित बसमध्ये दोन जिने आणि दोन दरवाजे देण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूने चढणे आणि दुसऱ्या बाजूने उतरणे प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. या बसमध्ये थांब्याची माहिती देण्यासाठी फलक, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, डिजिटल तिकिट सुविधा उपलब्ध आहे. तर, ८० मिनिटांत बस चार्ज होऊ शकते.

हेही वाचा : नरिमन पॉइंटवरून सीएसएमटीला जाण्यासाठी रात्री १०.३० पर्यंत बस मिळणार, बस क्रमांक १११, ११५ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसचे मार्ग काय?

पहिली बस कुर्ला ते वांद्रे – कुर्ला संकुल ते वांद्रे (पू) या मार्गावरून धावण्याचे नियोजित केले आहे. तसेच, ताफ्यात येतंय काळात दाखल होणाऱ्या बस या सध्याच्या दुमजली बसच्या मार्गावरून धावतील. मात्र, तरीही या नवीन बसला वळण घेताना कोणत्या अडचणी येत आहेत का, पुलाखालून योग्यरित्या बस जाईल का, बसच्या मार्गात उंच झाडांमुळे कोणती समस्या निर्माण होत आहे का, याबाबत सर्वेक्षण सुरू आहे.