– अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या आकाशात दिसणारा भला मोठा फुगा अखेर पाडण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या या फुग्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आपला चीन दौरा रद्द केलाय, कारण हा फुगा चिनी बनावटीचा होता. चीनने अमेरिकेत हेरगिरी करण्यासाठी हा फुगा सोडल्याचा आरोप करण्यात आला. चीनने हा फुगा (फ्लाइंग बलून) आपलाच असल्याचे मान्य केले असताना तो पाडल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. दोन्ही देशांचे आधीच ताणले गेलेले संबंध आणखी बिघडले आहेत.

अमेरिकेत दिसलेल्या गूढ वस्तूचे सत्य काय?

उत्तर अमेरिकेतील मोंटाना राज्याच्या आकाशात गेल्या आठवड्यात पांढरी वस्तू दिसत होती. साधारण चंद्रासारखी दिसणारी मात्र आकाराने त्यापेक्षा खूप लहान अशी ही वस्तू काय, याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला अमेरिकेच्या सवयीनुसार ‘उडत्या तबकडी’चा लाडका सिद्धांत चघळला गेला. काही जिज्ञासू लोकांनी त्याची छायाचित्रे काढली आणि समाजमाध्यमांवर टाकली. दुसरीकडे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना या वस्तूची माहिती मिळाली होतीच. मोंटानाच्या बिलिंग्ज विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. आकाशात दिसणारी ही वस्तू नेमकी कोणती आहे, ती मोंटानाच्या आकाशात काय करीत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ लागली. तपासाअंती हा चिनी बनावटीचा अवाढव्य फुगा असल्याचे स्पष्ट झाले. या फुग्याशी चीनचे नाव जोडले गेल्यानंतर संशय अधिकच बळावला आणि हा फुगा अमेरिकेवर पाळत ठेवण्यासाठी सोडल्याची शंका घेतली जाऊ लागली. या सगळ्या घटना ब्लिंकेन यांच्या चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घडल्या. फुग्याचा वापर करून चीन हेरगिरी करत असल्याचा आरोप झाल्यानंतर ब्लिंकेन यांनी आपला दौरा रद्द केला.

फुग्याबाबत चीनची प्रतिक्रिया काय?

हा फुगा आपलाच असल्याचे चीनने मान्य केले आहे. मात्र तो टेहळणीसाठी अमेरिकेत पाठविल्याच्या आरोपाचा मात्र बीजिंगमधून इन्कार करण्यात आला. हा फुगा नागरी संशोधनासाठी सोडण्यात आला होता. वातावरण बदलांबाबत संशोधनाचा तो एक भाग होता. मात्र त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे भरकटला आणि मोंटानाच्या आकाशात पोहोचला, असा दावा करत चीनने झाल्या प्रकाराबाबत अमेरिकेची माफी मागितली आहे. चीनचे हे स्पष्टीकरण अर्थातच अमेरिकेने स्वीकारले नाही. पेंटॅगॉनपासून (अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय) ते व्हाईट हाऊसपर्यंत, अनेक पातळ्यांवर खल सुरू झाला. हे सगळे सुरू असतानाच दक्षिण अमेरिकेच्या आकाशात तसाच दुसरा फुगा दिसल्यामुळे टेहळणीचा संशय बळावला.

फुग्याबाबत अमेरिकेने कोणते पाऊल उचलले?

सर्वात आधी हा फुगा अमेरिकेच्या आकाशक्षेत्रातून (एअर स्पेस) हद्दपार करणे, ही गोष्ट प्राधान्याने करायची असल्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले. त्यासाठी पेंटॅगॉनमध्ये विचारविनिमय सुरू झाला. हा फुगा आकाशात नष्ट करण्याची योजना आखली गेली. त्यासाठी लढाऊ विमाने सज्जही करण्यात आली. मात्र फुग्यातील अवजड उपकरणे जमिनीवर पडून नुकसान, कदाचित जीवितहानी होईल अशी भीती व्यक्त केली गेली. त्यामुळे ही योजना लांबणीवर पडली. अखेर रविवारी अमेरिकेच्या एफ-१६ विमानातून क्षेपणास्त्र डागून हा फुगा नष्ट करण्यात आला. त्याचे अवशेष समुद्रात पडले आणि त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. आता मुद्दा आहे फुग्याचे काम नक्की काय होते, हे शोधण्याचा. चीनचा दावा खरा आहे की खरोखरच टेहळणीसाठी हा फुगा सोडला होता, हे अमेरिकेला आता शोधून काढावे लागेल.

घटनेचा अमेरिका-चीन संबंधांवर परिणाम काय?

तैवानची स्वायत्तता, दक्षिण चीन समुद्रातील चीनचे आक्रमक धोरण, करोनाच्या उगमस्थानावर निर्माण झालेला वाद, पश्चिम चीनमधील झिनझिआंग प्रांतातील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळी दडपण्याचा प्रयत्न यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आधीच ताणले गेले आहेत. युक्रेन युद्धात चीन उघडउघडपणे रशियाची बाजू घेत आहे. ब्लिंकेन यांच्या दौऱ्यातून तणाव काहीसा निवळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच फुग्यामुळे दोन महासत्तांचे संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. फुग्याचे सत्य समोर येईपर्यंत ते निवळण्याची शक्यता नाही. हा फुगा पाडल्यानंतर चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही देशांचे भावी संबंध हे फुग्याच्या सत्यतेवर अवलंबून असतील. कारण अशा फुग्यांचा लष्करी वापर फार पूर्वीपासून केला जात आहे.

हेही वाचा : कथित हेरगिरी करणाऱ्या चीनच्या ‘बलून’ला हवेतच केले नष्ट, कारवाईसाठी अमेरिकेची विशेष मोहीम!

फुग्याचा टेहळणीसाठी वापर केला जातो का?

१८व्या शतकात फ्रेंच राज्यक्रांतीवेळी युद्धभूमीचे चित्र नीट दिसावे, म्हणून फुग्यातून टेहळणी होत असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. त्यानंतर अमेरिकेतील यादवी, पहिले महायुद्ध यासह अनेक लढायांमध्ये टेहळणीसाठी या फुग्यांचा वापर झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात तंत्रज्ञान अधिक प्रगत झाल्यानंतर जपानने या फुग्यांच्या माध्यमातून चक्क अमेरिकेवर स्फोटके सोडली. यातील एका स्फोटात काही नागरिकांचा मृत्यूही झाला. मात्र अलिकडच्या काळात कृत्रिम उपग्रह, अतिशय उंचावरून उडणारी विमाने आणि मुख्य म्हणजे ड्रोन तंत्रज्ञानामुळे या फुग्यांचा युद्धनीतीमधील वापर कमी झाला आहे. हे फुगे विमाने किंवा ड्रोनप्रमाणे प्रत्यक्षात ‘चालवता’ येत नाहीत. त्यांची उंची कमी-जास्त करून हवेच्या योग्य प्रवाहात आणून त्यांना विविक्षित स्थळी न्यावे लागते. मात्र यांचा फायदा असा की वेगाने जाणाऱ्या उपग्रहांपेक्षा कमी उंचीवर असल्यामुळे अधिक चांगली छायाचित्रे या फुग्यांमधून मिळू शकतात आणि मुख्य म्हणजे उपग्रहांपेक्षा यांचा खर्च प्रचंड कमी असतो. या कारणांमुळे अमेरिकेने केलेला हेरगिरीचा आरोप पूर्णपणे फेटाळताही येणारा नाही. खरे काय, ते प्रकरणाच्या संपूर्ण तपासानंतरच समोर येईल.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know what is spy balloon age old military device tension between us america china print exp pbs
First published on: 05-02-2023 at 15:48 IST