– संदीप नलावडे

‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ या संस्थेने जागतिक लोकसंख्येचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालानुसार लोकसंख्येत भारताने चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी असून चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी असल्याची नमूद केले आहे. चीनची लोकसंख्या सहा दशकांत प्रथमच कमी झाली आहे, मात्र हा कल अल्पावधीत या देशासाठी चिंताजनक ठरू शकतो, असे तज्ज्ञ म्हणतात. त्याशिवाय चीनच्या घटत्या लोकसंख्येची चिंता जगातील अनेक विकसित देशांनाही वाटत आहे. चीनची घटती लोकसंख्या आणि त्याचे परिणाम याविषयी…

China's eyes on donkeys in Africa, why is China's hunger for the continent of Africa a headache?
आधी वटवाघळं, आता गाढवं; चीनची भूक आफ्रिका खंडासाठी का ठरत आहे डोकेदुखी?
china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
Why Indian Muslims are banish from elections
भारतीय मुस्लीम निवडणुकीतून हद्दपार का?
Will climate change be key issue in this years election What do youth think
विश्लेषण : यंदाच्या निवडणुकीत हवामान बदल हा कळीचा मुद्दा ठरेल का? तरुणाईला काय वाटते?

चीनची लोकसंख्यावाढ मंदावण्याची कारणे काय?

गेली सहा दशके चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता. १९५० मध्ये चीनची लोकसंख्या ५५ कोटी ४४ लाख होती. त्यात सातत्याने वाढ होत गेली. मात्र लोकसंख्यावाढीच्या नव्या आकडेवारीनुसार चीनला भारताने मागे टाकले असून चीन आता दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधील जन्मदर घसरतो आहे. यासाठी अनेक धोरणे राबविण्यात आली होती. चीनचा राष्ट्रीय जन्मदर दर एक हजार नागरिकांमागे ६.७७ इतका असून हा विक्रमी नीचांकी दर आहे. चीनमध्ये लोकसंख्या कमी करण्यासाठी ऐंशीच्या दशकात एक मूल धोरण राबविण्यात आले. प्रत्येक दाम्पत्यास केवळ एक अपत्य जन्मास घालण्याचा अधिकार असेल. हा नियम ज्या कुटुंबांनी पाळला नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सरकारी कर्मचारी असलेल्यांनी या नियमाचे पालन न केल्याने त्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली. मात्र या निर्णयामुळे लोकसंख्यावाढीचा वेग मंदावला असला तरी त्याचे अनेक सामाजिक परिणाम चीनला भोगावे लागले. त्यामुळे २०१६मध्ये चीनने हे धोरण रद्द केले असले तरी विवाह झालेल्या जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र तरीही चीनचा जन्मदर वाढत नसल्याचे दिसून आले आहे.

लोकसंख्यावाढीचा दर घटल्याने चीनवर काय परिणाम होऊ शकतो?

लोकसंख्यावाढीचा दर कमी होत असल्याने त्याबाबत चीनला चिंता वाटत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वीही देशात लोकसंख्याशास्त्रीय संकटाची घोषणा करण्यात आली होती. लोकसंख्या वाढीचा दर सातत्याने कमी राहिला तर अल्पावधीतच ते देशासाठी विनाशकारी असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण लोकसंख्या घटल्याने देशात दीर्घकाळपर्यंत श्रमशक्ती कमी होण्याची भीती आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी चीनने अनेक धोरणे राबविल्याने जन्मदर वर्षानुवर्षे मंदावला आहे. वृद्ध लोकसंख्येने जगभरातील अर्थव्यवस्थांसमोर आव्हान उभे केले असताना, चीनसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या लोकसंख्येतही सर्वाधिक संख्या वृद्धांचीच आहे. वृद्धांची संख्या वाढल्याने श्रमशक्ती कमी होतेच, त्याशिवाय आरोग्यसेवा आणि इतर सामाजिक सुरक्षा खर्च यांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. चीनमध्ये तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर वाढत आहे. कमी वेतनामुळे तरुणांमध्ये विवाहाचे वय वाढत असून मूल जन्माला घालण्याच्या वयोमानातही वाढ होत आहे. त्यामुळे नवजात बालकांची संख्या कमी होऊ शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

लोकसंख्येचा दर घटल्याने चीनवर आर्थिक परिणाम काय?

चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मानली जाते. मात्र लोकसंख्येचा दर घटत असल्याने २०३० च्या पुढे हा लोकसंख्याशास्त्रीय ताण चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहेत. चीनमध्ये कमावत्या नागरिकांची संख्या २०१२पासून घसरत चालली आहे. चीनमध्ये वय अवलंबित्व गुणोत्तर वाढले असून २०१०मध्ये ३७.१२ टक्क्यांवरून २०२०मध्ये ४४.१४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार या शतकात १५ ते ६४ वयोगटातील चिनी नागरिकांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. बेरोजगारी आणि कमावत्या नागरिकांची घटती संख्या यामुळे उत्पादन व बांधकाम क्षेत्रांत कमालीचा सुस्तपणा आला आहे. बांधकाम क्षेत्रातील सुमारे एकतृतीयांश कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ही दोन्ही क्षेत्रे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असून त्यांच्यातील सुस्तपणा वाढणे हे आर्थिक वृद्धीसाठी धोकादायक आहे.

हेही वाचा : न्यूयॉर्कमध्ये चीनच्या गुप्त पोलीस चौकीचा भांडाफोड; जगभरात चीनने १०० गुप्त पोलीस चौक्या का उभारल्या?

चीनच्या घटत्या लोकसंख्येचा जगावर काय परिणाम?

चीनच्या घटत्या लोकसंख्येचा परिणाम केवळ चीनच्याच नव्हेत तर जगाच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो, असा इशारा जागतिक अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करू शकणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जगातील अनेक देशांसाठी चीनमधून कर्मचारी वा कामगार पुरविले गेले. चीनमधील कमावत्या वयाची लोकसंख्या जागतिक आर्थिक प्रक्रियेला गती देत आहे. कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या मजुरांच्या बळावर उत्पादित होणारा माल जगभरात निर्यात केला जातो. मात्र आता येथील लोकसंख्यावाढीचा दर घटत असल्याने चीनमध्ये कमावत्या वयाची लोकसंख्याही कमी होत आहे. त्यामुळे चीनमध्ये कारखान्यातील मजुरांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या या मजुरांची संख्या कमी होत असल्याने चीनबाहेरील ग्राहकांसाठी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे. अमेरिकेसह अनेक विकसित देश चीनमधील आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मजुरांच्या खर्चात वाढ झाल्याने या देशांमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कामगारांच्या वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत असल्याने बऱ्याच कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेत व्हिएतनाम व मेक्सिको या कमी खर्चात कामगार उपलब्ध होणाऱ्या देशांत आपला मोर्चा वळविला आहे.