कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार एरवी शासकीय मदतीवर कधीच अवलंबून नसतो. शासकीय मदतीची वाट न पाहता ते आपापल्या परीने परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो. पण यंदा पहिल्यांदाच बागायतदार शासकीय नुकसान भरपाईसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिस्थितीशी दोन हात करत जगणारे बागायतदार यंदा नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर का उतरले याचा थोडक्यात आढावा.

हवामान बदलांचा आंबा उत्पादनावर परिणाम 

निसर्गाच्या लहरीपणाने यंदा कोकणचा हापूस आंबा अडचणीत सापडला आहे. अवेळी पाऊस, बदलते तापमान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा आंब्याचा मोहोर करपून गेला. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १५ टक्केच उत्पादन हाती बागायतदारांच्या हाती लागले. काजू उत्पादनातही मोठी घट दिसून आली. खरे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यावर्षी कोकणातील हापूस आंबाबांगाना बंपर मोहोर आला होता. त्यामुळे बागायतदार सुखावले होते. बक्कळ उत्पादन येईल अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांचा हा अनंद फार काळ टिकला नाही. आंब्याचा मोहोर काळा पडला आणि जळून गेला. फळधारणा झालीच नाही. त्यामुळे वर्षभर बागांची निगा राखण्यासाठी केलेली मेहनत धुळीस मिळाली. देखभाल खर्चही भागणार नाही अशी गत बागायतदारांची झाली.

लागवडीखालील क्षेत्र किती? उत्पादन किती?

कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १ लाख ८२ हजार हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आली, ज्यातून दरवर्षी साधारणपणे ३ लाख ८ हजार ४८० टन आंबा उत्पादन होते. यातून सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटींची उलाढाल होते. यात जवळपास ८० कोटींच्या आसपास निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश असतो. दरवर्षी मोहोर येण्यापासून काढणीपर्यंत हवामानातील बदल, कीड, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पीक नुकसानीचे प्रमाण साधारणपणे ३० ते ४० टक्के असते. पण यावर्षी जवळपास ८० ते ८५ टक्के पीक नष्ट झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनाच्या १० ते १५ टक्के पीकच बागायतदारांच्या हाती पडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आंबा नुकसानीची ही पहिलीच वेळ आहे. काजू पिकावरही हवामान बदलांचा मोठा परिणाम झाला आहे. 

बागायतदार आक्रमक का बनले?

कृषी विभागाच्या अहवालानुसार अनेक बागायतदारांचे सरासरी उत्पादन ६०० पेट्या होते, ते यंदा ५० पेट्यांपर्यंत घसरले. यंदा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील असल्याचे बागायदारांचे म्हणणे आहे. हवामानातील बदलांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. यंदा थंडीमुळे परागीकरण झाले नाही, त्यातच पडणाऱ्या धुक्यामुळे मोहोर अक्षरशः करपून गेला. तुडतुडे, फुलकिडे, फळमाशी यांचाही प्रादुर्भाव झाला. धुक्यामुळे करपणाऱ्या मोहोराचे संरक्षण करण्यासाठी बाजारात बुरशीनाशकच उपलब्ध नाही. याचा एकत्रित परिणाम आंबा बागांवर दिसून आला. अवकाळी पाऊस, तापमानात सतत होणारे बदल, थंडीचा अभाव, वादळे, कीड रोग प्रादुर्भाव रोखण्यात येणारे अपयश यामुळे आंब्याचे उत्पादन सतत घटत चालले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढावा तरी कसा, या विंवचनेत बागायतदार सापडले आहेत. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, कामगारांना पगार कसा द्यायचा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. या कारणामुळे आंबा बागायदार नुकसानभरपाईसाठी आग्रही आहेत.

शासनातर्फे जाहीर मदतीविषयी नाराजी का?

आंबा आणि काजू बागायतदारांनी केलेली विविध आंदोलने, कोकणातील आमदार आणि खासदारांनी केलेली आग्रही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने कोकणातील आंबा बागायदारांसाठी भरपाई देण्याची घोषणा केली. बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पण या मदतीवर बागायतदार समाधानी नाहीत. मदत अतिशय अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रति कलम जेमतेम २२० रुपये इतकी मदत मिळणार आहे. ही बागायतदारांची चेष्टा असून, एक वेळचा फवारणी खर्चही यातून सुटणार नसल्याचे आंबा बागायतदार आणि शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. आंब्यासाठी हेक्टरी ५ लाख तर काजूसाठी हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या शिवाय कर्जमाफी, विमा संरक्षण, काजूला हमीभाव, बनावट हापूस विक्रीवर नियंत्रण अशा मागण्याही बागायदारांनी केल्या आहेत.  

harshad.kashalkar@expressindia.com