कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात हत्ती पाळण्याची शतकांची परंपरा आहे. येथील माधुरी हत्तीणीचा मठ ते वनतारा आणि वनतारा ते मठ हा प्रवास कसा झाला, याचा हा आढावा.
माधुरी हत्तीण वनताराला कशी पोहोचली?
माधुरी उर्फ महादेवी हत्ती गेली तीन दशके मठाचा अविभाज्य भाग होती. मठात लहानाची मोठी झालेली माधुरी हत्तीण म्हणजे या परिसरातील श्रद्धास्थान आणि जिव्हाळ्याचा विषय होता. धार्मिक मिरवणुकांमध्ये तिचा मान असायचा. मात्र, पेटा या प्राणी मित्र संघटनेने माधुरीच्या आरोग्याविषयी आणि मठातील अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च अधिकार समितीच्या निर्णयानुसार गतवर्षी जुलै महिन्यात गुजरातमधील जामनगर येथील अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले. यातूनच सुरू झाला बड्या यंत्रणेविरोधातील कोल्हापुरातील सामान्य जनतेचा असामान्य लोकलढा.
हत्तीसाठीचा जनभावनेचा उद्रेक कसा होता?
माधुरीला वनतारा घेऊन जात असताना नांदणी मठातील प्रशासनासह कोल्हापूरच्या स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. ती गावातून जात असताना ग्रामस्थ भावुक झाले होते. इतकेच नव्हे तर दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या पट्ट्यात मोठ्या संख्येने असलेल्या जैन बांधवांमध्ये तीव्र रोष पसरला. माधुरी ही केवळ हत्ती नाही तर आमची श्रद्धा आहे, अशी भावना व्यक्त होऊ लागली. कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिकांनीही या विरोधात आवाज उठवला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने महामोर्चा काढण्यात आला. एका प्राण्याच्या मुक्तीचा संघर्ष कृष्णा – पंचगंगा नदी काठी आकार घेऊ लागला. देशातील बड्या यंत्रणेविरोधात कोल्हापूरकरांचा आवाज बुलंद करू लागले.
‘वनतारा’कडे रवानगी नंतर ठिणगी कशी पडली?
न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर माधुरी हत्तीला गुजरातमधील जामनगर येथील उद्योगपती अनंत अंबानी यांच्या रिलायन्स संचलित वनतारा प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले. माधुरीच्या जीवनातील ‘वन’प्रस्थाश्रमाचा नवा अध्याय सुरू झाला. वनताराच्या नैसर्गिक वातावरणात इतर हत्तींच्या सहवासात राहिल्यामुळे तिच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली आणि तिची मानसिक स्थितीही सुधारली असा दावा तेथील प्रशासन करीत होते. तरीही कोल्हापुरात जनआंदोलनाचा भडका कायम राहिला. माधुरी परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, रास्ता रोको सुरू झाले. याची दखल घेऊन वनतारा वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी कोल्हापूरात येऊन जिल्हा, मठ प्रशासनाशी चर्चा केली. एका संवेदनशील आंदोलनात लोक उतरले असताना दुसरीकडे जिल्ह्यातील जैन समाजातील माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे आदी नेत्यांमध्ये या हत्ती परत आणण्यासाठीचा श्रेयवादही सुरू झाला. तो हत्ती परत येईपर्यंत कायम राहिला.
‘वनतारा’ला भूमिका का बदलावी लागली?
माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी, लोकप्रतिनिधींनी आणि मठ प्रशासनाने मोठा न्यायालयीन व सामाजिक लढा दिला. एका हत्तीवरून सामान्य जनतेच्या भावना किती तीव्र होतात याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. परिणामी महाराष्ट्र शासनाला या साऱ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली. माधुरी हत्ती नांदणी मठात परत आणला जाईल असे आश्वासन द्यावे लागले. शासनाने मध्यस्ती केल्यावर वनतारा प्रशासनाने कोल्हापूरच्या जनतेच्या धार्मिक व जिव्हाळ्याच्या भावनांचा संपूर्ण आदर केला जाईल, असे स्पष्ट केले होते. देशातील सर्वात मोठ्या यंत्रणेने एक पाऊल मागे येण्याची ही प्रक्रिया असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात उमटल्या.
शासकीय पातळीवरील काय घडत राहिले?
कोल्हापुरातील नागरिकांचा जनक्षोभ आणि माधुरी हत्तीणीबद्दलची गाढ धार्मिक व प्रामाणिक श्रद्धा लक्षात घेऊन राज्य सरकारने तिच्या पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांशी आणि संबधित यंत्रणांशी चर्चा करून हत्तीणीच्या वापसीचा मार्ग मोकळा कसा होईल हे पाहिले. राज्य शासन आणि नांदणी मठातर्फे सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्चस्तरीय समितीसमोर फेरविचार याचिका व कायदेशीर बाजू समर्थपणे मांडली. या साऱ्या प्रयत्नांमुळे ‘वनतारा’ प्रशासनानेही सहकार्य दर्शवले.
*परतीच्या जल्लोषात पुढील जबाबदारी कोणती?
अखेर सर्व घडामोडींची दखल घेऊन सर्वोच्च पातळीवरून माधुरीला नांदणीत परत पाठवण्याच्या हालचालींना वेग आला. त्यातही प्रशासकीय दिरंगाई आणि कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे काही काळ गेला. इकडे, वनताराने माधुरीच्या उत्तम आरोग्यासाठी मठाच्या प्रांगणातच सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधा, माधुरीसाठी प्रशस्त गजशाळा, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्याची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडली. मठातील या नवीन अत्याधुनिक केंद्राची पाहणी केल्यानंतर उच्चाधिकार समितीने माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यास अधिकृत मंजुरी दिली. जामनगर पासून निघालेला माधुरीचा अँब्युलन्स ट्रक हजारभर किमीचा प्रवास करून ११ सप्टेंबरच्या मध्यरात्री नांदणीच्या वेशीवर आला, त्या क्षणी कोल्हापूरने दिवाळीच साजरी केली. फटाके, गुलाल आणि अश्रूंनी तिचे स्वागत झाले. आव्हान किती मोठे असले आणि ते किती प्रभावशाली शक्तीविरोधात असले तरी लढून जिंकता येते हा विचार पेरणाऱ्या एका लोकलढ्याचा विजय होता.
माधुरी मठात परतली असली तरी तिच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जाणार आहे.वनताराचे डॉक्टर नियमितपणे मठात येऊन तिची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. तथापि, सारी जबाबदारी वनताराकडे सोपवून निवांत राहणे हे लढा देणाऱ्या कोणालाही शोभनीय असणार नाही. आता तिच्या शास्त्रोक्त संगोपनाची मोठी जबाबदारी मठ आणि प्रशासनावर सुद्धा आहे. जेणेकरून पुन्हा कोणी बोट दाखवू नये. एकंदरीत काय तर, हा संघर्ष केवळ हत्तीणीच्या पुनरागमनापुरता मर्यादित नव्हता, तर कोल्हापूरच्या जनतेच्या रस्त्यावर उतरलेल्या बाण्याने आणि अफाट सामूहिक शक्तीने मोठ्या यंत्रणेलाही गुडघे टेकवायला लावले, याचा हा ज्वलंत पुरावा आहे.
dayanand.lipare@expressindia.com
