Kolkata Law college Rape case: २५ जून रोजी कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा याला तत्काळ अटकही करण्यात आली. मोनोजितला अटक झाल्यानंतर त्याची कित्येक वर्षांपासूनची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. मोनोजित याच्याविरुद्ध कसबा, आनंदपूर, गारियाहाट व कालीघाट या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग, हल्ला, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकावरही मोनोजितने याआधी हल्ला केला होता. कॉलेजमधील त्याचे वर्तन आणि अनियमित उपस्थितीवर प्रश्न उठवणाऱ्या शिक्षकांनाही त्याने गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.
२५ जून रोजी दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मोनोजित मिश्रा हा प्रमुख आरोपी आहे.
मोनोजित हा याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहे आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून तो काम करत होता.
महाविद्यालयातच शिकत असलेल्या प्रमित मुखोपाध्याय आणि झैब अहमद या दोन विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी पीडितेला नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी मारहाणीचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप या दोघांवर आहे. कॉलेज बंद असताना ही घटना घडवून आणण्यास मदत केल्याचा आरोप कॉलेजमधील एका सुरक्षा रक्षकावर आहे.
मोनोजित मिश्रा याला अटक केल्यानंतर त्याचा भूतकाळ आता समोर आला आहे. जवळपास १० वर्षांपूर्वीची त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे.
- २०१३ मध्ये मोनोजितवर एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. त्यानंतर तो २०१६ पर्यंत फरारी होता.
- माजी वर्गमित्र असलेल्या तीतस मन्ना याने इंडिया टुडेला सांगितले की, २०१२ मध्ये साउथ कोलकाता लॉ कॉलेजमधील तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेशी संबंधित असल्याने मोनोजित पुन्हा संपर्कात आला.
- २०१३ मध्ये मोनोजितने एका कॅटरिंग कामगारावर हल्ला करत त्याची बोटे कापल्याचा आरोप होता. त्यावेळी त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- कॅम्पसमध्ये मोनोजितला मँगो म्हणून ओळखले जाते. तो इतर विद्यार्थ्यांना कायम धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत असे.
- २०१६ मध्येही शहरात परतल्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झालेला नव्हता.
- २०१७ मध्ये त्याच्याविरुद्ध मारहाण आणि धमक्या दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता.
- त्याच वर्षी त्याने पुन्हा राजकारणात येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे टीएमसी नेत्यांनी त्याला पुन्हा पक्षात घेण्यास नकार दिला.
- जुलै २०१९ मध्ये एका विद्यार्थिनीने गरियाहाट पोलीस ठाण्यामध्ये मोनोजितविरोधात तक्रार दाखल केली होती. मोनोजितने या तरुणीचे कपडे फाडल्याचा आरोप तिने केला होता.
- ३१ डिसेंबर २०१९ रोजी एका पार्टीमध्ये मोनोजितवर म्युझिक सिस्टीम आणि इतर महागड्या वस्तू चोरल्याचा आरोप करण्यात आला. हरिदेवपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
- २०२२ मध्ये कोलकाताच्या स्विनहो स्ट्रीट इथल्या एका महिलेने कसबा पोलीस ठाण्यामध्ये मोनोजितविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती.
- २०२४ मध्ये त्याच्यावर कॉलेजच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याचा आणि कॉलेजच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप होता.
- २०२५ मध्ये त्याने एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मोनोजित मिश्रा हा कॉलेज सोडल्यानंतरही विद्यार्थी राजकारणात सक्रिय राहिला. विद्यार्थी आणि स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये त्याच्याकडे महत्त्वाचा मध्यस्थी म्हणून पाहिले जात होते.
२०२२ मध्ये टीएमसीपीच्या एका सदस्याने लॉ कॉलेजच्या प्राचार्यांकडे एक निनावी पत्र लिहिले होते. त्यामध्ये मोनोजितच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल इशारा देण्यात आला होता. तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी त्याच्यावर कारवाईची विनंती करण्यात आली होती. मात्र, कॉलेजकडून त्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीच्या एका सदस्याने द टेलिग्राफला सांगितले, “ज्या शिक्षकांनी त्याच्या उपस्थिती आणि भ्रष्टाचाराबाबत आक्षेप व्यक्त केला, त्यांना हिंसक धमक्या दिल्या जात होत्या.”
कोण आहे मोनोजित मिश्रा?
मोनोजित मिश्रा याने २०२२ मध्ये साउथ कोलकाता लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने अलीपूर लॉ कॉलेजमध्ये कायदे विषयाचा सराव सुरू केला. तृणमूल काँग्रेसच्या छात्र परिषदेच्या दक्षिण कोलकाता जिल्हा शाखेत संघटन सचिवपदावर मोनोजित काम करत होता. या घटनेनंतर महाविद्यालयाने मोनोजित आणि इतर दोन सहआरोपींना काढून टाकले होते. बुधवारी पश्चिम बंगालच्या बार काउन्सिलने मोनोजित मिश्रा याचे सदस्यत्व रद्द केले.
या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादविवाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष भाजपाने मिश्रा याचे टीएमसीपीशी संबंध असल्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने मोनोजितशी असलेला संबंध नाकारला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.