Kombucha Tea Benefits: आजवर आपण कटिंग चहा, कडक चहा, ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी, जॅस्मिन टी, आईस् टी अशा कितीतरी चहाच्या चवी ऐकल्या, चाखल्या, आणि आपल्या रोजच्या सवयींचा भागही केल्या. पण आज असा एक चहा समजून घेणार आहोत, जो ना केवळ वेगळा आहे, तर थोडासा गूढही आहे. कारण हा चहा उकळत नाही, तर तो घडत जातो… हळूहळू, शांतपणे, एका जिवंत प्रक्रियेमधून. आपण ज्याला साध्या भाषेत किण्वन केलेला चहा म्हणजेच फर्मेंटेड टी असं म्हणू शकतो, त्या खास चहाचं नाव आहे कोम्बुचा (Kombucha).
विरजण लावलेला चहा
“किण्वन केलेला चहा?” असा प्रश्न तुमच्या मनात लगेच उभा राहील… हे काय नविनच! तुमच्यापैकी क्वचितच काही जणानीं या चहाची चव घेतली असेल. आणि हो, हा चहा गरम नसतो; तो थंड, हलका फिजी, आणि पहिल्या घोटातच तुमच्या जिभेला एका नव्या जगाची ओळख करून देतो.
कोम्बुचा म्हणजे नेमकं काय?
चहाचा अर्क आणि साखर यांच्या साध्या मिश्रणावर SCOBY नावाचा जीवाणूयुक्त ‘स्टार्टर’ त्यात घातला की, काही दिवसांत तो चहा नव्या पेयात रूपांतरित होतो. इथे SCOBY (Symbiotic Culture Of Bacteria and Yeast) बद्दल एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. SCOBY खरंतर दह्याच्या विरजणाप्रमाणे स्वयंपाक घरातला सजीव स्टार्टर आहे. यात लॅक्टिक व ऍसिटिक आम्ल निर्माण करणारे जीवाणू आणि यीस्ट अशी सूक्ष्मजीवांची एक परिपक्व टीम एकत्र नांदते. ही टीम एकमेकांच्या कामाला पूरक असते. साखरेवर पहिली प्रक्रिया करून यीस्ट हलका फिज आणि अतिशय अल्प प्रमाणात (०.५% अथवा त्यापेक्षा कमी) अल्कोहोल तयार करते, तर ते दोन जीवाणू त्या पुढच्या टप्प्यावर काम करून आंबटसर कार्बनी आम्लांच्या छटा तयार करतात; काही वेळा लॅक्टिक आम्ल निर्माण करणाऱ्या जीवाणूंमुळे चवीत आणखी मृदू, ओलसर गोडवा- आंबटपणा येतो.
चव, सुगंध आणि झिणझिण
परिणामी चहा फक्त एक ‘चहापण’ असलेलं पेयं न राहता तो हळूहळू खुसखुशीत, टॅंजी, आणि चहाचा हलका सुगंध असणाऱ्या आस्वादपूर्ण पेयाचे रूप धारण करतो. SCOBY चा तो वरचा पातळ तवंग या पेयावर आढळतो तो वर नमूद केलेल्या सूक्ष्मजीवांचा सूक्ष्म-कारखाना असतो, जिथे चव, सुगंध, आणि नैसर्गिक झिणझिण एकाच वेळी घडत राहतात. ‘नॅचरल कार्बोनेशन’ सारखी त्यात एक नैसर्गिक चमकदार झिणझिण असते, त्याला आपण जणू चहाचं स्पार्कलिंग रूप असं म्हणू शकतो.

कोम्बुचाचे मूळ आशिया खंडातील
वैज्ञानिक आणि ऐतिहासिक आढाव्यानुसार कोम्बुचाची सुरुवात आशियात बहुधा चीन किंवा जपानमध्ये इ.स.पू. सुमारे २२० च्या आसपास झाली असावी; पुढे तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि पूर्व युरोपमध्ये पोहोचला आणि १९९० च्या दशकात अमेरिकेत ‘हेल्थ टॉनिक’ म्हणून त्याची मुख्य प्रवाहात ओळख वाढली. आता या प्रवासाची एक छान भारतीय वळणकथा अशी… भारतामध्ये कोम्बुचाची चाहूल २०१७-२०१८ च्या सुमारास मुंबई- पुणे- दिल्ली- गोवा अशा महानगरांतल्या कॅफे- वेलनेस सर्कल्समध्ये लागली.
फर्मेंटेड टी
२०२० नंतर गट- हेल्थ आणि इम्युनिटी यावरचा फोकस वाढताच या फर्मेंटेड टीने जणू वेग पकडला. त्यानंतर स्थानिक ब्रँड्स आणि व्यावसायिक उत्पादनव्यवस्था पुढे आली आणि २०२४ च्या सुमारास मोठ्या खेळाडूंनीही या श्रेणीत पाऊल टाकून कोम्बुचाला ‘मेनस्ट्रीम’ सिग्नल दिला. आज अनेक ठिकाणी कोम्बुचा सहज मिळतो आणि मजा म्हणजे, तो आपल्या मातीतला स्वाद घेऊन येतो: आले-लिंबू, कोकमसारख्या देशी छटांनी सजलेला.
हा चहा म्हणजे स्मार्ट मायक्रोबियल टीमवर्कचा परिणाम
या चहात जादू नाही, पण शास्त्र आहे आणि ते शास्त्र फारच सुंदर आहे. कोम्बुचाच्या मागे एक स्मार्ट मायक्रोबियल टीमवर्क काम करत असतो. त्यात निर्माण झालेल्या आम्लामुळे त्यात काही प्रमाणात नैसर्गिक संरक्षक ताकदही तयार होते. त्यामुळे त्यात बाह्य रासायनिक परिरक्षके टाकण्याची गरज नसते. त्यामुळे हे पेय पूर्णतः नैसर्गिक आहे. कोम्बुचा मधील अल्कोहोल पूर्ण टाळायचं असल्यास यीस्टचा वापर काही उत्पादक कंपन्या टाळतात. तसेच काही फळांचे रस देखील कोम्बुचाच्या किण्वन प्रक्रियेत वापरतात. जेणे करून त्यांचा सुगंध त्या कोम्बुचाचा वेगळेपणा दर्शवितो.
चव कशी असते?
माझ्या शब्दांत सांगायचं तर टी+लेमन+व्हिनेगरचा हलकासा टच+फिज. पहिल्या घोटात तुम्हाला हलकी आंबटसर झिंग जाणवेल, मग चहाचे नाजूक नोट्स आणि शेवटी त्या फिजची फ्रेश झुळूक. अनेक ब्रँड्समध्ये किंवा घरगुती बॅचेसमध्ये नंतर ‘सेकंड फर्मेंटेशन’ केलं जातं. यात आलं, लेमन, बेरी, हिबिस्कस, पुदिना असे फ्लेवर्स घातले जातात. त्यामुळे प्रत्येक कोम्बुचा बॅच जणू आपली स्वतंत्र ओळख घेऊन येतो; काही हलका फुलका, काही जास्त टँजी, काही फळांच्या सुवासाने भरलेला.
लोक कोम्बुचा का पितात?
इथे मी ठामपणे सांगू इच्छितो की, कोम्बुचा हे ‘मॅजिक हेल्थ ड्रिंक’ नाही. पण ते एक ‘फंक्शनल फर्मेंटेड पेय’ नक्कीच आहे. लोक त्याकडे ओढलं जातात, कारण चहातले अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स अनेकदा टिकून राहतात आणि किण्वन प्रक्रियेमुळे त्यांचे प्रोफाइल काही प्रमाणात बदलू शकते. शिवाय या पेयात तयार होणारी कार्बनी आम्ले काही लोकांना पचनासाठी मदत करू शकतात आणि तोंडाला फ्रेश वाटण्याचा अनुभव देतात.
कमी कॅलरी
तिसरा मोठा मुद्दा म्हणजे, सर्वसामान्य सॉफ्ट ड्रिंक्सच्या तुलनेत काही कोम्बुचा प्रकारांमध्ये साखर/ कॅलरी कमी असू शकतात; अर्थात, इथे ‘लेबल वाचा’ हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हो, महत्त्वाचं असं की, मानवी क्लिनिकल पुरावा अजूनही मर्यादित आहे; म्हणून ‘डिटॉक्स’, क्युअर, चमत्कार अशा शब्दांचा गोड सापळा ऐकला की, लगेच ब्रेक लावा. चांगलं आरोग्य म्हणजे डेटा आणि शिस्त… भावनांच्या भरात घेतलेली हमी नाही.
सेफ्टी आणि स्मार्ट
सेफ्टी आणि स्मार्ट वापर इथेच गेम जिंकतो. कोम्बुचा फर्मेंटेड असल्यामुळे तो प्रत्येकासाठी एकसारखा असतोच असं नाही. म्हणून पहिल्यांदा घेताना लहान प्रमाणात… उदा. ५०– १०० मिली. सुरुवात करणं शहाणपणाचं. खूप आंबट किंवा जास्त प्रमाणात घेतलं तर काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोट बिघडण्याची शक्यता असू शकते. काही वेळा अल्कोहोलचे ट्रेसही राहू शकतात, विशेषतः घरी बनवलेल्या किंवा जास्त दिवस फर्मेंट केलेल्या बॅचमध्ये.
काय काळजी घ्याल?
गर्भवती महिला, इम्यून‑कम्प्रमाइज्ड व्यक्ती, किंवा यकृत/ मूत्रपिंड समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी वैद्यकीय सल्ला घेणं योग्य राहील. आणि जर तुम्ही घरच्या घरी कोम्बुचा तयार करणार असाल, तर स्वच्छता ही ‘तडजोड न करता पाळायची’ बाब आहे; स्वच्छतेत कुचराई झाली, तर दूषित होण्याचा धोका वाढतो, आणि मग हे “आरोग्यदायी”पेय उलट अपायकारक ठरू शकतं.
तुळस, आलं आणि कोकमाचा कोम्बुचा
भारतासाठी कोम्बुचाचा पुढचा टप्पा मला अत्यंत आशादायक वाटतो. आपल्या देशात स्थानिक चवी + प्रमाणित गुणवत्ता हे संयोजन खरोखरच गेम-चेंजर ठरू शकते. तुळस–आलं–लिंबू, जांभूळ, आवळा, कोकम अशा असंख्य घटकांमुळे आपल्या हातात चवींचे अभिनव संयोग घडवण्याची प्रचंड संधी आहे.
फंक्शनल पेयं
मात्र त्याच वेळी प्रक्रियाशिस्त, गुणवत्तेची स्पष्ट मोजमापे (quality metrics) आणि सुरक्षा- नियंत्रणे काटेकोरपणे मजबूत असणे गरजेचे आहे. जेणेकरून कोम्बुचा केवळ “ट्रेंडी” पेय न राहता, स्केलेबल, सुरक्षित आणि डेटा-समर्थित (data-backed) फंक्शनल पेय म्हणून ठामपणे उभा राहील.
चव, कुतूहल आणि विज्ञान
आणि शेवटचा विचार कोम्बुचा हा तुमच्या ‘टी युनिव्हर्स’ मध्ये एक फ्रेश, आधुनिक ट्विस्ट आहे. कटिंग चहा सोडायची गरज नाही, पण कधीतरी या किण्वन केलेल्या चहाला नक्की भेट द्या. योग्य ब्रँड निवडा, योग्य प्रमाण ठेवा, आणि योग्य अपेक्षा ठेवल्या तर हा स्पेशल चहा तुमच्या दिनक्रमात एक नवी चव, नवं कुतूहल आणि थोडंसं विज्ञान घेऊन येईल.

