गेल्या काही महिन्यात कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळे बिबटे आढळून येण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या काळ्या बिबट्यांची संख्या कोकणात गेल्या काही वर्षात लक्षणीयदृष्ट्या वाढल्याचे दिसून येत आहे. काळे बिबटे कोकणात दिसण्यामागची कारणे कोणती याचा थोडक्यात आढावा.

काळे बिबटे कुठे आढळले?

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात खोडदे देऊळवाडी, खापलेवाडी आणि डिंगणकरवाडी रस्त्यालगत कातळांबा परिसरात काही दिवसांपूर्वी ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. त्यापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील खांबाचा मळा परिसरात काळा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र भागात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये काळा बिबट्या दिसून आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सहा ब्लॅक पँथर असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यांमुळे स्पष्ट झाले आहे. ही संख्या जास्तही असण्याची शक्यता आहे. रत्नागिरीप्रमाणे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ब्लॅक पँथरचे अस्तित्व असल्याचे अधोरेखित झाले आहे.

ब्लॅक पँथर कशामुळे जन्माला येतात?

शरीराचे रंग ठरवणारे मेलानिन प्रथिन वाढल्याने काळे बिबटे जन्माला येतात. मेलानिन या रंगद्रव्याचे प्रमाण वाढल्याने बिबट्यांच्या अंगावरील काळे ठिपके अधिक गडद होतात. त्यामुळे त्यांच्या अंगावरील काळे ठिपके जास्त काळपट दिसतात. अथवा त्यांचे संपूर्ण शरीर काळपट होते. या उलट मेलानिनचे प्रमाण कमी झाल्यास कधीतरी पांढऱ्या बिबट्याही (अल्बिनो) दिसू शकतो. एका मेलॅनिस्टिक रेसेसिव्ह जीनमुळे हे होत असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. यामुळे एखाद्या बिबट मादीला काही पिल्ले सर्वसामान्य रंगाची तर काही पिल्ले मेलॅनिस्टिक अर्थात काळ्या रंगाची होऊ शकतात. जनुकीय बदलामुळे काळे बिबटे जन्माला येत असल्याचे अभ्यासक सांगतात.

कोकणात ते आढळण्याची कारणे कोणती?

काळ्या बिबट्यांचे प्रमाण हे सदाहरित आणि निमसदाहरित वनांत अधिक आढळून येते. दाट झाडीत लपण्यासाठी काळा रंग हा उपयुक्त ठरतो, कोकणातील बहुतांश वने ही सदाहरित वनक्षेत्रात मोडतात. त्यामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात, तसेच कर्नाटकात काळे बिबटे अधिक प्रमाणात आढळून येतात. वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार कोकणात साधारणपणे पंधरा ते वीस काळे बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रमाण अधिकही असण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी काळ्या बिबट्यांचे माहेरघर

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, देवरूख, लांजा, गुहागर, संगमेश्वर, दापोली, खेड या परिसरात काळ्या बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. महाराष्ट्रात विदर्भात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात, पश्चिम महाराष्ट्रात कोयना, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यात काळे बिबटे आढळून आले आहेत. पण रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या बिबट्यांची संख्या लक्षणीय असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.

काळे बिबटे आणखी कुठे आढळतात?

भारतात त्रावणकोर आणि दक्षिण भारतातील जंगलात काळे बिबटे आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त आसाममध्येही काळे बिबटे आढळून आले आहेत. भारताबाहेर नेपाळ, म्यानमार, केनिया, दक्षिण आफ्रिका येथे काळे बिबटे आढळून आले आहेत. तर दक्षिण व मध्य अमेरिकेत काळे जॅग्वार आढळून आले आहेत.

संवर्धन का गरजेचे?

कोकणात काळ्या बिबट्यांचा अधिवास सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अन्नाच्या शोधात हे काळे बिबटे मानव वस्तीतही येऊ लागले आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यजीव असा संघर्ष निर्माण होत आहे. त्यामुळे काळ्या बिबट्यांचा अधिवास सुनिश्चित आणि सुरक्षित करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.

harshad.kashalkar@expressindia.com