कोकण हापूसला २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले. पण, त्यानंतर शिवनेरी हापूस आणि आता वलसाड हापूस नावाने मानांकन मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भविष्यात कर्नाटक हापूस या नावाने मागणी होऊ शकते. या पूर्वी मलावी हापूसला विरोध करून मलावी आंबा, असे नामांतर करायला कोकणवासियांनी भाग पाडले आहे. वलसाड हापूसचा डाव हाणून पाडणे तितके सोपे नाही…
भौगोलिक मानांकन म्हणजे काय?
भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणीच, विशिष्ट भौगोलिक परिसरातच उत्पादित होणारा शेतीमाल किंवा वस्तूला दिले जाणारे एक नाव किंवा चिन्ह होय. हे नाव त्या उत्पादनाची अस्सल ओळख जपते. त्या उत्पादनातील बोगसगिरीला, भेसळीला आळा घालते. त्यामुळे संबंधित उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते. त्या उत्पादनाला देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर असलेला ग्राहक, मागणी टिकून राहते. त्यामुळे संबंधित शेतीमाल उत्पादक शेतकऱ्याला आणि वस्तूच्या उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या विक्रीची आणि चांगली किंमत मिळण्याची सुरक्षितता मिळते. राज्यात कोकण हापूस, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, सांगलीची हळद या शेतीमालासह सोलापूरची चादर आणि कोल्हापुरी चप्पल या उत्पादनांना जागतिक ओळख मिळाली आहे.
भौगोलिक मानांकन का आणि कसे करायचे?
जागतिक व्यापार करारामध्ये १९९५ मध्ये प्रथमच कृषी विषयाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जागतिक बाजार सर्व शेतीमालांसाठी खुला झाला. जागतिक व्यापार कराराअंतर्गत विविध करार करण्यात आले, त्यापैकी बौद्धिक संपत्ती हक्क हा करार महत्त्वाचा आहे. त्यानुसार बौद्धिक संपदा, आराखडा आणि व्यापार चिन्ह नोंदणी करता येते. या करारानुसार भौगोलिक क्षेत्राशी निगडित उत्पादित मालास संरक्षण देण्यासाठी संसदेने ३० डिसेंबर १९९९ रोजी वस्तूचे भौगोलिक चिन्हांकन (नोंदणी आणि संरक्षण) कायदा मंजूर केला. या कायद्याची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २००३ पासून सुरू झाली. बौद्धिक संपदा हक्क कायद्यांतर्गत शेती मालाकरिता भौगोलिक चिन्हांकन (जीआय) करण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जाते. ३४ विभागांत वर्गवारी करून विविध वस्तू, उत्पादनांची नोंदणी करण्यात येते, त्यात यंत्रे, औद्योगीक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, कपडे, सौंदर्य प्रसाधने, सिंचन, ऊर्जा, शेती, फलोत्पादन, कुकुटपालन, डेअरी आदींचा समावेश आहे. शेतीमाल आणि फलोत्पादनाचा समावेश वर्गवारी क्रमांक ३१ मध्ये करण्यात आला आहे.
भौगोलिक मानांकनामुळे फायदा होतो?
जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापारचिन्ह जसे महत्त्वाचे आहे, तसेच भौगोलिक क्षेत्राशी निगडित शेतीमालाची गुणवत्ता, सातत्य व गुणधर्माबाबत भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस विशेष महत्त्व आहे. भारतामध्ये बहुतांश शेतीमाल शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्क उत्पादित केला जात असल्याने शेतीमालाची स्वतःची अशी खास गुणवत्ता आहे. काही शेतीमालांमधील गुणवत्ता वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. त्यामध्ये वर्षानुवर्षे फरक पडलेला नाही. शेतीमालाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनामध्ये विशिष्ट प्रदेशात सातत्य राखलेले आढळून येते. तेच उत्पादन इतर ठिकाणीही तशाच प्रकारच्या हवामानात किंवा जमिनीत घेतले जाते. परंतु, त्या शेतीमालास तशी खास गुणवत्ता येत नाही. कारण गुणवत्ताही त्या – त्या प्रदेशाशी निगडित असते. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी देशात अनेक ठिकाणी होते. पण महाबळेश्वरात उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीसारखी चव, स्वाद अन्य ठिकाणी उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीला नसते. देशात आतापर्यंत अशा प्रकारचे भौगोलिक चिन्हांकन ३२२ हून जास्त शेती व फलोत्पादनांना मिळाले आहे. महाराष्ट्रात ४० हून जास्त उत्पादनास भौगोलिक मानांकन अथवा चिन्हांकन मिळाले आहे.
हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी स्पर्धा का?
हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा विशिष्ट चव, स्वाद, गोडी आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसह प्रामुख्याने युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. पण, याच कोकण हापूसवर आता गुजरातने दावा केला आहे. देशातील आंब्याच्या हंगामात होणाऱ्या एकूण आर्थिक उलाढालीत हापूसचा वाटा मोठा असतो. किंबहुना आंब्याचा हंगाम म्हणजेच हापूसचा हंगाम अशी ओळख निर्माण झाली आहे. अलिकडे केशर आंब्याने बाजारपेठेत चांगले स्थान निर्माण केले आहे. तरीही हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी चढाओढ आहेच. २०१८ मध्ये कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावाने २०२२ मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला. त्यानंतर २०२३ मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्या बाबतची पहिली सुनावणी झाली आहे.
हापूसवर दावा का आणि विरोध का?
राज्यात सुमारे ४.५ लाख हेक्टरवर हापूसची लागवड आहे. त्यापैकी कोकणात १.८० लाख हेक्टरवर आहे. मुंबई, पुणे बाजारात कोकणातून येणाऱ्या एकूण आंब्यात हापूसचा वाटा ९५ टक्के, उर्वरित महाराष्ट्रातून दहा टक्के आणि गुजरातमधून ५० टक्के हापूस आणि ५० टक्के केसरसह अन्य आंबा येतो. देशातून एकूण आंबा निर्यातीत हापूसचा वाटा ५० टक्क्यांहून जास्त आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियासह युरोपात प्रक्रिया, नोंदणी करून निर्यात होणाऱ्या आंब्यांमध्ये हापूसचा वाटा ४० टक्क्यांपर्यंत आहे. तर आखाती देशांत निर्यात होणाऱ्या एकूण आंब्यात हापूसचा वाटा ९० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे एकूण आंब्याच्या हंगामात हापूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे हापूस या नावासह भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे हापूसवर चांगले संशोधन झाले आहे. तिथे दर्जेदार रोपे तयार केली जातात. तिथूनच काही रोपे मलावी येथे गेली होती, त्यापासून तयार झालेल्या आंब्याला मलावी हापूस, असे नाव दिले गेले होते. शिवनेरी, जुन्नरसह राज्यात विविध ठिकाणी. गुजरातमधील वलसाड, नवसारी, कर्नाटकातील कारवार, धारवाड, केरळपर्यंत हापूसच्या रोपांची लागवड झाली आहे. त्यामुळे हापूस उत्पादन वाढले आहे. परिणामी प्रत्येकाने हापूसवर दावा सांगणे सुरू केले आहे. पण, शिवनेरी हापूस, वलसाड हापूस आणि भविष्यात कर्नाटक हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळाले तर कोकण हापूसची मागणी कमी होईल, आर्थिक नुकसान होईल, अशी भीती सतावत असल्यामुळे कोकणातील शेतकरी त्यास कडाडून विरोध करीत आहेत.
dattatray.jadhav@indianexpress.com
