– अमर वाणी
आग्नेय युरोपमधील बाल्कन द्वीपकल्पात वसलेला कोसोवो हा जगातील सर्वात तरुण देश. वांशिक संहाराची भळभळती जखम उराशी घेऊन स्वतंत्र अस्तित्वासाठी २००८मध्ये सर्बियापासून तो विभक्त झाला. या देशामध्ये सध्या सामूहिक दफनभूमींचे उत्खननकार्य वेगात सुरू आहे. कोसोवोच्या उत्तर भागातील झुबिन पोटोकजवळील कालुदर गावात सुरू असलेल्या या उत्खननाने १९९८-९९ च्या कोसोवो-सर्बिया युद्धातील भीषण वंशसंहाराचा, वेदनादायी आठवणींचा आगडोंब मृत, बेपत्ता अल्बेनियन नागरिकांच्या कुटुंबीयांमध्ये उफाळून आला आहे.
मोठ्या प्रमाणात उत्खनन कशासाठी?
कोसोवो युद्धातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे सत्य जगासमोर आणण्यासाठी हे उत्खनन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. या उत्खननाच्या माध्यमातून युद्धगुन्ह्यांचे कायदेशीर पुरावे गोळा केले जात आहेत. युद्धामध्ये हजारो लोक मारले गेले, आजही सुमारे १,६०० लोक अधिकृतरीत्या बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना अनेक दशकांपासून आप्तस्वकीयांच्या अंत्यसंस्काराची आणि न्यायाची प्रतीक्षा आहे. न्यायवैद्यक पथकाने कालुदर गावातून २३हून अधिक व्यक्तींचे सांगाडे शोधून काढले आहेत. हे अवशेष एप्रिल १९९९मध्ये मित्रोविका शहरातून अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या अल्बेनियन विचारवंत, डॉक्टर आणि प्राध्यापकांचे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व अवशेषांची अधिकृत ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असून या संदर्भात युद्धगुन्ह्यांचा संशय म्हणून स्थानिक सर्ब वंशाच्या काही व्यक्तींना अलीकडेच अटक करण्यात आली आहे.
सामूहिक दफनभूमींचे उत्खनन केव्हा केले जाते?
जेव्हा एकाच मोठ्या खड्ड्यात किंवा जागेत अनेक मृतदेह (अनेकदा युद्ध किंवा हत्याकांडादरम्यान मारले गेलेले लोक) एकत्र दफन केलेले असतात, तेव्हा त्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी, त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आणि कायदेशीर पुरावे गोळा करण्यासाठी तज्ज्ञांकडून शास्त्रीय पद्धतीने जे खोदकाम केले जाते, त्याला सामूहिक दफनभूमींचे उत्खनन असे म्हटले जाते.
कोसोवो-सर्बिया रक्तरंजीत संघर्षाची पार्श्वभूमी काय?
या उत्खननामागे कोसोवो आणि सर्बिया यांच्यातील जुन्या आणि रक्तरंजित संघर्षाचा इतिहास आहे. कोसोवो हा पूर्वी सर्बिया देशाचा एक प्रांत होता, जिथे अल्बेनियन वंशाच्या लोकांचे वास्तव्य अधिक होते. स्वातंत्र्यासाठी ‘कोसोवो लिबरेशन आर्मी’ने सर्बियन लष्कराविरोधात सशस्त्र बंड पुकारले. प्रत्युत्तरादाखल सर्बियन शासनाने (स्लोबोदान मिलोसेविच यांच्या नेतृत्वाखाली) कठोर लष्करी कारवाई केली. या वंशसंहारामध्ये सुमारे १३ हजार निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, त्यात सर्वाधिक नुकसान अल्बेनियन वंशियांचे झाले.
‘नाटो’ला हस्तक्षेप का करावा लागला?
कोसोवो युद्धाला कलाटणी देण्यामध्ये नाटोचा हस्तक्षेप आणि त्यानंतर युद्धगुन्हेगारांवर चालवले गेलेले आंतरराष्ट्रीय खटले हा जागतिक इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. मानवाधिकारांच्या उल्लंघनावर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ मार्च ते १० जून १९९९ दरम्यान ‘नाटो’ने (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सर्बियावर सलग ७८ दिवस हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन अलाईड फोर्स’ असे नाव दिले गेले. सर्बियन सैन्याकडून कोसोवोमधील अल्बेनियन नागरिकांचे होणारे वांशिक उच्चाटन आणि मानवाधिकारांचे उल्लंघन त्वरित थांबवणे, हा या कारवाईचा मुख्य हेतू होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय नाटोने केलेली ही पहिलीच मोठी लष्करी कारवाई. यानंतर सर्बियन सैन्याला कोसोवोमधून माघार घ्यावी लागली. २००८मध्ये कोसोवोने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. युद्धातील बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मे २०२३मध्ये कोसोवो-सर्बियाने संयुक्त सहकार्य करार केला. असे असले तरी, सर्बिया अद्याप कोसोवोच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्यास राजी नाही. दोन्ही देशांमधील राजकीय तणावाने प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. ही ऐतिहासिक जखम भरून काढण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उत्खनन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय स्थापनेमागील उद्देश काय?
कोसोवोमध्ये शांतता राखण्यासाठी ‘केफोर’ या नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शांतीदलाची स्थापना करण्यात आली, जे आजही तिथे तैनात आहे. कोसोवो आणि इतर बाल्कन युद्धांमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हेग येथे ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय’ स्थापन केले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविच यांच्यावर युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी खटला चालवण्यात आला. पदावर असताना आंतरराष्ट्रीय न्यायालयात युद्धगुन्ह्यांसाठी खटला चालवले गेलेले ते जगातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. मात्र, २००६मध्ये अंतिम निकाल येण्यापूर्वीच त्यांचा तुरुंगात मृत्यू झाला.
कोसोवोच्या नेत्यांवरही खटले का?
कोसोवोमधील निष्पाप नागरिकांची हत्या आणि त्यांच्या सक्तीच्या स्थलांतरासाठी सर्बियाचे अनेक वरिष्ठ लष्करी, राजकीय नेते दोषी आढळले. त्यांना प्रदीर्घ तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या युद्धात केवळ सर्बियन सैन्याकडूनच नाही, तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या ‘कोसोवो लिबरेशन आर्मी’च्या काही गटांकडूनही मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे आरोप झाले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी हेग येथे ‘कोसोवो स्पेशल चेंबर्स’ची स्थापना करण्यात आली. सध्या कोसोवोचे माजी अध्यक्ष हाशिम थाची आणि ‘कोसोवो लिबरेशन आर्मी’च्या काही माजी नेत्यांवर येथे खटले सुरू आहेत. कोसोवोच्या उत्तरेकडील भागात, जिथे बहुसंख्य सर्बियन अल्पसंख्याक राहतात, तिथे तणाव कायम आहे, परंतु युरोपीय संघटनेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी कोसोवोची राजधानी प्रि-स्टिना आणि सर्बियाची राजधानी बेलग्रेड या दोन्ही शहरांना संबंध सुधारण्यास सांगण्यात आले आहे.
amar.wani@expressindia.com
