दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळेची भूमिका काय होती?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांना अमानुषपणे मारहाण करणार्यांमध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटेंसोबत असणारा त्यांचा तिसरा साथीदार म्हणजे कृष्णा आंधळे. तो केज तालुक्यातील मैंदवाडी गावचा रहिवासी. ही हत्या होण्यापूर्वी आरोपी वाल्मीक कराड याने मस्साजोग येथे उभ्या केल्या जाणार्या पवन ऊर्जा निर्मिती करणार्या अवादा कंपनीच्या व्यवस्थापकास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सुनील केदू शिंदे या व्यवस्थापकास विष्णू चाटे यांच्या भ्रमणध्वनीवरून ही धमकी दिल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांमध्ये दिली होती. या खंडणीस विरोध केल्याने संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याचे छायाचित्रण करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये कृष्णा आंधळे साथीदार होता. तेव्हापासून तो फरार आहे.
कृष्णा आंधळे कधीपासून गायब आहे?
फरार आरोपी कृष्णा आंधळे तब्बल १५ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. या कालावधीमध्ये तो तीन वेळा गावी येऊन गेल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. परंतु अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. हा आरोपी पोलिसांना सापडला नाही तर त्याचा लाभ आरोपीच्या वकिलांकडून सुनावणी दरम्यान घेतला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्या शोधासाठी आता एक लाख रुपये बक्षीस ठेवले गेले आहे. पोलीस नोंदीनुसार कृष्णा आंधळे याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, खंडणी आणि खून असे चार गुन्हे आहेत.
आरोपी कृष्णा आंधळे काय काम करायचा ?
कृष्णा आंधळे वाल्मीक कराडसाठी केजमध्ये काम करायचा. खंडणीसाठी आडवे येणार्यांना आडवे करा, या वाल्मीकच्या आदेशाला मानून कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आदींनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात उद्योग जगताला त्रास दिला जात असल्याचे दिसून येताच केंद्रीय पातळीवरून सूत्रे हलली. पुढे वाल्मीक कराड याच्यासह अन्य आरोपींना पकडण्यात आले. यातील कृष्णा आंधळे वगळता अन्य सर्व आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणाचा एकत्रित तपास तत्कालीन उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील विशेष पथकाने केला आहे. मात्र कृष्णा आंधळे गेल्या १५ महिन्यांपासून गुंगारा देत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तो मोबाइल फोन वापरत नसल्याने त्याचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांना वेळ लागत असल्याचे सांगितले जात होते. वाल्मीक कराड हा तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतले मानला जात असे. या हत्येच्या प्रकरणातील निर्दयता पुढे आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
ॲड्. उज्ज्वल निकम यांच्यावर आक्षेप कोणते ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची अलीकडेच राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. त्यावरून आरोपी सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे यांनी ॲड. निकम यांना हटविण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला होता. आरोपींचा हा अर्ज मंगळवारी बीडच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापुढील ७ एप्रिलच्या सुनावणीतही ॲड. निकम हेच बाजू मांडतील हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ‘टुडी’ अशी व्यूहरचना केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. खटल्यास उशीर व्हावा आणि तो रेंगाळत पडावा अशी आरोपीची इच्छा असल्याचा युक्तिवाद या पूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना हटविण्याची विनंती करण्यात आली होती. ती फेटाळण्यात आली आहे. युक्तिवाद कमजोर व्हावा अशी आरोपीची व्यूहरचनाही असल्याचे सांगण्यात येत आहे. खटला सुनावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर एक आरोपी न सापडल्याने पोलिसांच्या तपास क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. या प्रकरणात सर्व डिजिटल पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले असले तरी आरोपी कृष्णा आंधळे याचा जबाब आरोपाची साखळी जोडण्यासाठी आवश्यक असल्याचे मानले जाते. त्यामुळे कृष्णा आंधळे याची माहिती देणार्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
