लडाख प्रशासनाने देशातील पहिल्या ‘हाय-अल्टिट्यूड वाइल्डलाइफ सफारी’चा निर्णय घेतला आहे. मात्र, ही केवळ पर्यटनाची नवी संकल्पना नसून, वाढत्या पर्यटनामुळे निर्माण होणारा वन्यजीव आणि पर्यावरणावरील दबाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न म्हणूनही या निर्णयाकडे पाहावे लागेल.

लडाखमध्ये सफारीची गरज का भासली ?

लडाखमधील हिमबिबट्या आणि अन्य वन्यजीवांच्या अधिवासात पर्यटकांची संख्या वाढत आहे. विशेषतः हिमबिबट्याच्या दर्शनासाठी जाणारे पर्यटक अनेकदा अधिक जवळ जाण्याच्या प्रयत्नात वाहनांनी दुर्गम भागात प्रवेश करतात. बेकायदा ‘ऑफ-रोडिंग’मुळे वन्यजीवांना त्रास होण्याबरोबरच नाजूक पर्वतीय परिसंस्थेचेही नुकसान होऊ शकते. याशिवाय हिमबिबट्याचा पर्यटकांवर हल्ला देखील होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांच्या हालचाली नियंत्रित करून त्यांना ठरावीक मार्गांवरून प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या मदतीने वन्यजीव दर्शन घडवणे, हा या सफारीमागील प्रमुख उद्देश आहे. हेमिस राष्ट्रीय उद्यान, चांगथांग कोल्ड डेझर्ट वन्यजीव अभयारण्य आणि काराकोरम वन्यजीव अभयारण्य यांसह नुब्रा, झंस्कार, शाम, कारगिल आणि द्रास परिसरातील महत्त्वाच्या वन्यजीव अधिवासांचा विचार करण्यात आला आहे.

ही सफारी नेमकी कशी असेल?

काझीरंगा किंवा रणथंबोरसारख्या व्याघ्र पर्यटनाच्या धर्तीवर लडाखमध्ये विशेष खुल्या वाहनांचा वापर केला जाणार आहे. ही वाहने प्रशिक्षित स्थानिक चालक आणि मार्गदर्शक चालवतील. कारण हिमालयातील वन्यजीव पर्यटन हे मैदानी जंगलातील सफारीपेक्षा वेगळे आहे. येथे अति उंची, अत्यंत थंड हवामान, खडतर भूप्रदेश आणि वन्यजीवांचा विरळ अधिवास यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे वाहनांची संख्या, मार्ग, पर्यटकांची संख्या आणि वन्यजीवांपासूनचे अंतर याबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरेल. स्थानिक युवकांना पक्षीनिरीक्षण, प्रजाती ओळख आणि मार्गदर्शनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांना वन्यजीवांवर आधारित हस्तकला आणि स्मृतिचिन्हे तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे पर्यटनातून निर्माण होणारा आर्थिक लाभ स्थानिक पातळीवरच राहील.

हिमबिबट्याव्यतिरिक्त लडाखच्या वन्यजीव वैभवाचे वैशिष्ट्य काय आहे?

हिमबिबट्या हा लडाखच्या वन्यजीव पर्यटनाचा प्रमुख आकर्षणबिंदू असला तरी या प्रदेशाचे जैवविविध्य त्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. लडाखमध्ये देशातील अंदाजे ७१८ हिमबिबट्यांपैकी ४७७ हिमबिबट्यांचा अधिवास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय येथे ३८हून अधिक सस्तन प्राणी, सुमारे ३४० पक्षी प्रजाती आणि जवळपास १,८०० वनस्पती प्रजाती आढळतात. त्यामुळे सफारीचा केंद्रबिंदू केवळ ‘हिमबिबट्या दिसतो का?’ हा न राहता संपूर्ण उच्च हिमालयीन जैवविविध्य समजून घेण्याकडे वळणे आवश्यक आहे. उच्च हिमालयीन परिसंस्था अत्यंत नाजूक आहे. मैदानातील जंगलाप्रमाणे येथे झालेली पर्यावरणीय हानी सहज भरून निघत नाही. त्यामुळे पर्यटन वाढवताना ‘किती पर्यटक येतील?’ यापेक्षा ‘परिसंस्था किती पर्यटन सहन करू शकते?’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

मग हा प्रयोग संवर्धनासाठी फायदेशीर ठरेल का?

नियंत्रित पर्यटनामुळे बेकायदा ऑफ-रोडिंग कमी झाले, वाहनांची संख्या आणि मार्ग नियंत्रित झाले आणि वन्यजीवांना होणारा त्रास कमी झाला, तर हा प्रयोग संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, ‘सफारी’च्या नावाखाली पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, वाहनांची वर्दळ वाढली किंवा हिमबिबट्याच्या दर्शनासाठी प्राण्यांचा पाठलाग सुरू झाला, तर मूळ उद्देशालाच धक्का बसू शकतो. लडाख प्रशासनाने ४० गावांमध्ये ३०० विविध रंगांच्या कचरापेट्या बसवण्याबरोबरच प्लास्टिकमुक्त पर्यटनाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सकारात्मक टप्पा आहे. मात्र, कचरापेट्या बसवण्यापेक्षा त्यानंतरचा कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाटीचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. उच्च हिमालयात कचरा व्यवस्थापनाची किंमत आणि अडचण दोन्ही मोठी असल्याने पर्यटनाच्या सुरुवातीपासूनच ‘कचरा निर्माणच होऊ न देणे’ हे धोरण अधिक प्रभावी ठरू शकते.

पर्यटनाला प्राधान्य देऊन संवर्धन दुय्यम ठरले तर काय ?

लडाखचा ‘हाय-अल्टिट्यूड सफारी’ प्रयोग भारतातील वन्यजीव पर्यटनाला नवी दिशा देऊ शकतो. मात्र, त्याचे यश पर्यटन किती वाढले यावर नव्हे, तर पर्यटन वाढूनही निसर्गावरचा दबाव किती कमी ठेवता आला यावर ठरेल. हिमबिबट्या हा लडाखचा ‘घोस्ट ऑफ द माउंटन्स’ असला, तरी त्याच्या अधिवासाचे भविष्य केवळ वनविभागाच्या प्रयत्नांवर अवलंबून राहणार नाही. पर्यटक, स्थानिक समुदाय, मार्गदर्शक आणि प्रशासन या सर्वांची जबाबदारी त्यात समान असेल. लडाखचा हा प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्यात इतर संवेदनशील पर्वतीय प्रदेशांमध्येही ‘नियंत्रित पर्यटन आणि स्थानिक सहभाग’ या मॉडेलचा विचार करता येऊ शकतो. मात्र, पर्यटनाला प्राधान्य देऊन संवर्धन दुय्यम ठरले, तर ‘सफारी’ हीच उच्च हिमालयासाठी नवी समस्या ठरू शकते.

rakhi.chavhan@expressindia.com