Ancient gold ornaments found in Lakkundi village: गदग जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध लक्कुंडी गावात सापडलेल्या सोन्याच्या प्राचीन दागिन्यांमुळे कर्नाटकसह संपूर्ण देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या दुर्मीळ शोधाकडे पुरातत्त्व तज्ज्ञ, इतिहास अभ्यासक आणि शैक्षणिक वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. प्राथमिक पाहणीनुसार हे दागिने सुमारे ३०० वर्षे जुने असावेत आणि ते विजयनगर साम्राज्याच्या काळातील किंवा त्याच कालखंडाशी समकालीन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा महत्त्वपूर्ण शोध अलीकडेच १० जानेवारी २०२६ रोजी उजेडात आला. लक्कुंडी गावातील रहिवासी असलेल्या रिट्टी कुटुंबीयांना, त्यांच्या नव्या घराचा पाया खोदताना एका लहान तांब्याच्या भांड्यात ठेवलेले सोन्याचे दागिने सापडले. (यात विशेष उल्लेख प्रज्वल बसवराज रिट्टी (Prajwal Ritti) या इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या मुलाचा आहे. त्यानेच घराचा पाया खोदताना पहिल्यांदा ते तांब्याचे भांडे पाहिले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारमैया यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.) सामाजिक जबाबदारी दाखवत रिट्टी कुटुंबीयांनी हे सर्व दागिने तत्काळ जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आणि दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री कार्यालयालाही माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपासणी

हा शोध वैयक्तिक दागिन्यांचा आहे की, ऐतिहासिक ठेवा आहे, तसेच तो शासकीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करावा की नाही, याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने सखोल तपासणीचे आदेश दिले. मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी प्रक्रिया पार पडली. ही तपासणी जिल्हाधिकारी सी. एन. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) तसेच राज्य पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते.

काय तपासण्यात आले?

जिल्हा कोषागारात सुरक्षित ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. प्रत्येक दागिना वेगळा करून त्याची अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात आली. तज्ज्ञांनी दागिन्यांची रचना, वजन, धातूची शुद्धता, निर्मिती तंत्र यांचा सखोल अभ्यास केला. या दागिन्यांवरील सूक्ष्म कारागिरी आणि वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावरून त्या काळातील कारागिरांची उच्च दर्जाची कला आणि तांत्रिक कौशल्ये स्पष्टपणे दिसून येतात. पुढील अभ्यासासाठी आणि देशभरातील विविध राजवटींतील दागिन्यांशी तुलना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व व्हिडिओ चित्रण करण्यात आले.

Lakkundi treasure
Lakkundi treasure

खजिन्याचे स्वरूप आणि वजन

  • वजन: सोन्याच्या दागिन्यांचे वजन ४६६ ते ४७० ग्रॅम दरम्यान आहे. यासोबतच सुमारे ६३० ग्रॅम तांब्याच्या वस्तू आणि काही मौल्यवान खडे (हिरे, पोवळे, नीलम) देखील सापडले आहेत.
  • वस्तूंची संख्या: एकूण २२ सोन्याचे दागिने सापडले आहेत (यात साखळ्या, बांगड्या, अंगठ्या आणि ‘नागा’ नक्षीचा समावेश आहे).

दागिने विजयनगर काळातील असण्याची शक्यता

तपासणीदरम्यान तज्ज्ञांच्या निदर्शनास आले की, हे सोनं आधुनिक व्यापारी सोन्यापेक्षा लक्षणीयरीत्या वेगळं आहे. यामध्ये प्राचीन धातुकलेची वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता आणि पारंपरिक मानके आढळतात. या दागिन्यांमधून त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते. विशेषतः दागिन्यांचा आकार, रचना, कारागिरी आणि त्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर यांना मोठे पुरातत्त्वीय महत्त्व असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे दागिने विजयनगर साम्राज्याच्या काळातील किंवा त्याच्याशी निकट संबंध असलेल्या कालखंडातील असण्याची दाट शक्यता आहे.

अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ऐतिहासिक ठेवा म्हणून घोषित करण्यात येईल

जिल्हाधिकारी सी. एन. श्रीधर यांनी सांगितले की, हे दागिने सुमारे ३०० वर्षे जुने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरातत्त्व तज्ज्ञांनी सुमारे तीन तास सविस्तर तपासणी केली असून, दागिन्यांची शैली आणि कारागिरी विजयनगर काळातील दागिन्यांशी सुसंगत असल्याचे प्राथमिक मत व्यक्त करण्यात आले आहे. त्या काळातील श्रीमंत किंवा प्रभावशाली व्यक्तींनी हे दागिने वापरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. पुरातत्त्व तज्ज्ञांकडून सविस्तर अहवाल सादर केला जाण्याची अपेक्षा आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या दागिन्यांना अधिकृतपणे ऐतिहासिक ठेवा (खजिना) घोषित करण्यात येईल. जर कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने या दागिन्यांवर हक्क सांगितला, तर त्यांना वैध कागदपत्रीय पुरावे सादर करणे बंधनकारक असेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खजिना सापडलेल्या कुटुंबाचा सरकारकडून सन्मान

जिल्हाधिकारी श्रीधर यांनी सांगितले की, हा खजिना सापडल्यानंतर प्रामाणिकपणे प्रशासनाकडे सुपूर्द करणाऱ्या कस्तुरेव्वा रिट्टी कुटुंबाचा सरकारकडून योग्य सन्मान करून त्यांना भरपाईदेखील दिली जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार आणि जिल्ह्याच्या प्रभारी मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार या कुटुंबाला खजिन्याच्या एकूण मूल्याच्या २०% (१/५ हिस्सा) बक्षीस म्हणून देणार आहे, तसेच त्यांचे घर बांधण्यास मदत करणार आहे.

पुढील अभ्यास सुरू

पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला आहे, मात्र निश्चित निष्कर्षासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. दागिन्यांपैकी काही दागिने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्याचबरोबर संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजांचाही अभ्यास केला जाणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या सोन्याच्या दागिन्यांचा अचूक काळ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी निश्चित करण्यात येईल. या शोधामुळे सरकारने आता लक्कुंडीमध्ये कोटे वीरभद्रेश्वर मंदिर परिसरात अधिकृतपणे मोठे उत्खनन सुरू केले आहे.

लक्कुंडी : समृद्ध ऐतिहासिक वसाहत

कर्नाटकातील लक्कुंडी गावात आतापर्यंत १५० हून अधिक शिलालेख, मंदिरे आणि शिल्पे सापडली आहेत. यावरून हे गाव पूर्वी समृद्ध वसाहतीचे केंद्र होते, असे पुरातत्त्वज्ञांचे मत आहे. या नव्या शोधामुळे लक्कुंडीचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही संशोधकांच्या मते, दागिन्यांची रचना पाहता ते इ.स. ११ व्या किंवा १२ व्या शतकातील (९२५ ते १०२५ वर्षे जुने) असण्याची शक्यता आहे. राजघराण्यांतील दागिन्यांवर ठरावीक, वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असते; मात्र येथे सापडलेले दागिने साध्या स्वरूपाचे असून त्यावर कोणतेही राजेशाही चिन्ह आढळत नाही. त्यामुळे हे दागिने सामान्य लोकांचे असावेत, असेही मत इतिहासकार व्यक्त करतात.