पर्यावरणावर घातक परिणाम दिसून आल्याने इटलीतून हद्दपार करण्यात आलेली ‘मेटीनी’ प्रकल्पाची यंत्रणा, कोकणात लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहतीत दाखल झाली आहे. यावरून आता पर्यावरणवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशाच्या विकासात उद्योगांचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. पण पर्यावरणाचे संवर्धनाचा मुद्दाही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थोडक्यात आढावा…

घातक इटालियन कंपनी कोकणात?

इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषण प्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात दाखल झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजची उपकंपनी म्हणून ती कार्यान्वित करण्यात आली. यासाठी लागणारी यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स हक्क खरेदी करून ती भारतात आणण्यात आली. ही बाब समोर आल्यानंतर प्रकल्पाविरोधात पर्यावरणवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मिटेनी कंपनीची पार्श्वभूमी काय?

इटलीतील व्हेनेटो प्रांतात ‘मिटेनी’ कंपनी होती ज्यामध्ये पीएफएएस म्हणजेच पेर आणि पॉलीफ्लोरो अल्कलाईल (Per – and Polyfluoroalkyl Substances) या रसायनाचे उत्पादन केले जात होते. विविध औद्योगिक आणि रासायनिक वापरासाठी या घटकाचा वापर केला जात होता. हे रसायन कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे त्याला ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखले जात होते, ज्याचे गंभीर दुष्परिणाम कंपनीतील कामगार आणि विकेंन्झा शहरातील साडेतीन लाख लोकांच्या आरोग्यावर दिसून आले. त्यामुळे ही कंपनी इटली सरकारने बंद केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले.

मानवी शरीरावर कोणते दुष्परिणाम?

पीएफएस हे रसायन कायमचे हवेत आणि मानवी शरीरात टिकून राहते. शरीरातील हार्मोनल समतोल बिघडतो, ज्यामुळे मूत्रपिंड आणि वृषण कर्करोगाचा धोका संभावतो. थायरॉईड, प्रजनन समस्या निर्माण होऊ शकते. यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. इटलीत जेव्हा मिटेनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची रक्त तपासणी केली गेली. तेव्हा कामगारांच्या शरीरात पीएफएसचे प्रमाण अपेक्षित पातळीपेक्षा हजारो पटींनी अधिक आढळून आले. त्यामुळे इटलीतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. यानंतर हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यंत्रणा कोकणात कशी आली?

इटलीतून ही कंपनी बंद झाल्यानंतर भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजने २०१९ मध्ये लिलावाद्वारे ‘मिटेनी’ची संपूर्ण यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. इटलीतील कारखाना सुटा करून सुमारे ३०० हून अधिक कंटेनर्समधून ही यंत्रसामग्री भारतात आणण्यात आली, असा दावा केला जात आहे आणि ते स्पष्टही झाले आहे. आता हीच यंत्रणा कोकणातील रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसीत ‘यलोस्टोन फाईन केमिकल्स’ या नावाने सुरू असलेल्या प्रकल्पात वापरली जात आहे, असा आरोप पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या सुरुवातीपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

उद्योग महत्त्वाचेच पण पर्यावरणाचे काय?

देशाच्या विकासाच्या दृष्टीने उद्योग महत्त्वाचेच आहेत. औद्योगिक विकास झाल्या शिवाय देशाच्या अर्थकारणाला गती मिळणार नाही, लोकांना रोजगार संधी उपलब्ध होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील लोकांचे मुंबई ठाण्याच्या दिशेने होणारे स्थलांतर रोखायचे असेल तर कोकणात मोठे उद्योग येणे अत्यंत आवश्यक आहे. यात शंका नाही. पण कोकण प्रदेश हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. अनेक दुर्मीळ वनस्पती, पशु-पक्षी यांचे कोकणात वास्तव्य आढळते, सदाहरित वनांचा यात प्रामुख्याने समावेश असतो. त्यामुळे कोकणात येणाऱ्या उद्योगांमुळे येथील पर्यावरणावर घातक परिणाम होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेच आहे.

रासायनिक प्रकल्पाबाबत पूर्वानुभव कसा?

अमेरिका आणि युरोपमध्ये पीएफएएससाठी स्वतंत्र व कठोर मर्यादा असताना, भारतात अशा ठोस नियमांचा अभाव आहे. कोकणात रासायनिक उद्योगांबाबत स्थानिकांचा अनुभव फारसा चांगला राहिलेला नाही. त्यामुळे सहाजिकच रासायनिक प्रकल्पांना विरोध करण्याची मानसिकता स्थानिकांमध्ये तयार झाली आहे.

मागणी काय?

रोजगार, गुंतवणूक आणि औद्योगिक विकास महत्त्वाचा असला, तरी तो मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या बदल्यात होऊ शकतो का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प घातक असेल तर तो कोकणातून हद्दपार करण्याची मागणी पर्यावरणवादी संघटनांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला असून अहवाल आल्यावर कंपनीबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. आता राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका या प्रकल्पाबाबत काय असणार याकडे ही आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.