भारतीय जनता पार्टीला देशामध्ये आणि राजकारणामध्ये सर्वोच्च स्थानी नेण्यात त्यांचे संस्थापक सदस्य आणि राम मंदिर आंदोलनातील अग्रणी लालकृष्ण आडवाणी यांचा मोलाचा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लालकृष्णजी आडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे… आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राज्यकर्त्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे,” असे पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ वर नमूद केले आहे.

९६ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांनी १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय राजकारणामध्ये शक्तिशाली करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९९० साली रामजन्मभूमी चळवळीसाठी स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी रथयात्रा काढली होती. भाजपाच्या उदयात ही रथयात्रा महत्त्वाची ठरली.

गांधीवादी समाजवादापासून हिंदुत्वाकडे

जनता पक्षाच्या विघटनानंतर १९८० मध्ये भाजपाचा उदय झाला. त्या वर्षी मुंबईत झालेल्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत पक्षाचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणात भाजपा हा श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भारतीय जनसंघाचा नवा अवतार नसल्याचे अधोरेखित केले. वाजपेयींनी जयप्रकाश नारायण यांचा वारसा आणि गांधीवादी समाजवाद ही पक्षाची मूलभूत विचारधारा असल्याचे जाहीर केले.

“भाजपामध्ये सामील झालेल्या पूर्वीच्या जनता पक्षाच्या समर्थकांना टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने मध्यममार्ग काढण्याचा वाजपेयींचा निर्णय बहुधा धोरणात्मक गणनेवर आधारित होता, परंतु, १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत याचा फायदा झाला नाही. कारण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने तब्बल ४०० हून अधिक जागा जिंकल्या. भाजपाला केवळ दोनच जागांवर विजय मिळवता आला.” असे निरिक्षण राजकीय विश्लेषक ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट यांनी नोंदविले आहे. (‘रिफायनिंग द मॉडरेशन थीसिस’, २०१३). मात्र, हे अपयश भाजपाच्या उदयासाठी महत्त्वाचे ठरले. कारण त्यानंतर आडवाणी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि पक्षाला नवीन दिशा दिली.

रामजन्मभूमी आंदोलनाचा रोख

१९८० च्या दशकात विश्व हिंदू परिषदसारख्या हिंदू राष्ट्रवादी संघटनांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर जोर धरला. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा सर्वात जुना प्रस्ताव १९ व्या शतकात समोर आलेला असताना, १९८० च्या दशकात आंदोलनाने वेग घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा या प्रकरणात उघडपणे वावरण्याबद्दल काहीसा साशंक होता.

मात्र, लालकृष्ण आडवाणींना जाणवले की, राम मंदिराच्या वाढत्या आंदोलनामुळे हिंदू मतांचे एकत्रिकरण करण्याची एक अनोखी संधी आहे. आडवाणींनी राजीव गांधी यांच्यावर श्रीलंका आणि काश्मीर, तसेच बोफोर्स घोटाळ्याबाबत दबाव वाढवल्यामुळे भाजपा एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आला.

१९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ८५ जागा जिंकल्या होत्या, पण आडवाणींना वाटले की, याहूनही मोठे पाऊल पुढे टाकता येऊ शकते आणि ते करणे आवश्यक आहे. १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपाची हिंदुत्वाची भूमिका कमी पडू शकते, असे आडवाणींना वाटत होते. त्यामुळे बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी अखिल हिंदूंचा दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने ते रस्त्यावर उतरले.

रथयात्रा

लालकृष्ण आडवाणी बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी अखिल हिंदूंचा दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरले. (छायाचित्र-इंडियन)

२५ सप्टेंबर १९९० रोजी लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात केली. रथावर (रथासारखे दिसण्यासाठी बदललेली टोयोटा) रामजन्मभूमी आंदोलनाला गती देण्यासाठी आणि शेवटी बाबरी मशिदीवर दावा करण्यासाठी अयोध्येला पोहोचण्याची योजना त्यांनी आखली.

यात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आडवाणींची मिरवणूक, गाणी आणि घोषणांनी चिन्हांकित केली गेली होती. या सर्वांचा उद्देश मंदिरासाठी अखिल हिंदूंचा पाठिंबा वाढवण्याचा होता. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी नमूद केल्याप्रमाणे, “यात्रेची प्रतिमा धार्मिक, मोहक, लढाऊ आणि मुस्लिमविरोधी होती.” (इंडिया आफ्टर गांधी, २००७).

आडवाणींची यात्रा ज्या मार्गावरून पुढे गेली, तिथे हिंसाचार झाल्याच्या नोंदी सापडतात. मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या आदेशानुसार बिहारमध्ये आडवाणींच्या अटकेनंतर जातीय हिंसाचार तीव्र झाला. गुहा यांनी लिहिले आहे की, “हिंदू जमावाने मुस्लीम वस्त्यांवर हल्ला केला. हे एक प्रकारे फाळणीच्या भयंकर हत्याकांडांची आठवण करून देणारे होते. मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी आणि मारण्यासाठी रेल्वेगाड्या थांबवण्या आल्या,” असे गुहा यांनी लिहिले.

इतिहासकार के. एन. पणिक्कर यांनी लिहिले आहे की, १ सप्टेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान यात्रा झाली, तेव्हा एकूण १६६ जातीय दंगली झाल्या त्यात ५६४ जण मारले गेले. त्यातील २२४ जण उत्तर प्रदेशातील होते. उत्तर प्रदेशातील हिंसाचार सर्वाधिक वाईट होता. (‘रिलीजियस सिम्बॉल अँड पॉलिटिकल मोबलायझेशन: द अॅगीटेशन फॉर अ मंदिर अॅट अयोध्या’, १९९३).

या घटना घडूनही आडवाणी आणि भाजपासाठी ही रथयात्रा प्रचंड यशस्वी ठरली, कारण १९९१ च्या निवडणुकीत भाजपा काँग्रेस (२४४ जागा) नंतर संसदेतील दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यांनी १२० जागांवर विजय मिळवला. उत्तर प्रदेशातही त्यांनी सरकार स्थापन केले. “राम मोहीम राजकीय लाभ देत होती, हे नक्की. दंगलींचे मतांमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसत होते,” असे गुहा यांनी लिहिले आहे.

बाबरी विध्वंसानंतर…

६ डिसेंबर १९९२ रोजी सुमारे एक लाख कारसेवकांनी बाबरी मशिदीवर चढून ती जमीनदोस्त केली. आडवाणीही त्या दिवशी अयोध्येत होते, पण जे घडले त्यासाठी ते तयार नव्हते. या घटनेचा उल्लेख करत ते नंतर म्हणाले की, ६ डिसेंबरच्या घटनेने त्यांना त्रास झाला.

जातीय हिंसाचाराची लाट पुन्हा एकदा देशभर पसरली. आडवाणींनी मशिदीचा विध्वंस स्वीकारलेला नसले तरी त्याचा राजकीय फायदा त्यांच्या पक्षाला झाला. १९९० च्या दशकात अटलबिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याने, रामजन्मभूमी मंदिराच्या संदर्भातील भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपले राष्ट्रीय अस्तित्व मजबूत केले.

हेही वाचा : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत? 

बाबरी विध्वंसानंतर पंतप्रधानपदासाठी आडवणींच्या नावाची चर्चा असताना त्यांनी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली. ते त्यांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाहीत, हे माहीत असतानाही भाजपाला केंद्रस्थानी पोहोचविण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalkrushna advani important role to rise bjp rac
First published on: 04-02-2024 at 12:10 IST