पुरुष आणि महिलांमधील बहुतेक फरक समाजाने तयार केले आहेत. मात्र, लिंगानुसार महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक स्वरूपात, तसेच सामर्थ्यामध्येही अनेक फरक आहेत. अनेक संशोधनांमधून हा निष्कर्ष निघाला आहे की, पुरुषांपेक्षा महिला जास्त काळ जगतात. असे असले तरीही महिलांमध्ये आजारांचे प्रमाण अधिक असते. ‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. याचे कारणही या अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालात नक्की काय? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

सर्व क्षेत्रांत यश मिळविणार्‍या आजच्या महिला घर, नोकरी, संसार या तिन्ही पातळ्यांवरील जबाबदारी पेलतात. मात्र, या सर्वांत महिला स्वतःच्या आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. महिलांना पाठदुखी, नैराश्य व डोकेदुखीचा जास्त त्रास होतो. दुसरीकडे पुरुषांचे आयुष्य कमी असते. कारण- बहुतांश पुरुष रस्ते अपघातांना बळी पडतात. तसेच पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या रोगांचे प्रमाणही जास्त असते आणि अलीकडच्या वर्षांत कोरोना विषाणूदेखील पुरुषांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, असे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. संशोधकांनी जगातल्या सर्व वयोगटांतील व प्रदेशांमधील आजार आणि मृत्यूची २० प्रमुख कारणे आणि महिला व पुरुषांमधील याचा फरक, यावर संशोधन केले आहे.

हेही वाचा : Potency Test for Prajwal Revanna: लैंगिक अत्याचार प्रकरणात का केली जाते पौरुषत्व चाचणी?

“महिला आपल्या आयुष्यातील अनेक वर्षं वाईट आरोग्य स्थितीत घालवतात; ज्याची अनेक स्त्रियांना कल्पनादेखील नसते. तर, पुरुष अशा अनेक आजारांनी ग्रस्त असतात; ज्यामुळे त्यांचा लवकर मृत्यू होतो”, असे अभ्यास लेखकांपैकी एक असलेल्या लुईसा सोरिओ फ्लोर यांनी ‘डीडब्ल्यू’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

महिला आणि पुरुषांमधील आजारांमध्ये फरक का?

बहुतेक लैंगिक फरक पौगंडावस्थेत दिसून येतात. संशोधक त्यांच्या शोधनिबंधात लिहितात की, केवळ जैविक फरकच नाही, तर लिंग निकषांचाही लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. “हे तुम्ही जन्माला आलेल्या जैविक शरीरावरच नाही, तर ज्या वातावरणात तुम्ही राहता त्यावरदेखील अवलंबून असते,” असे सारा हॉक्सने ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. सारा हॉक्स या युनिव्हर्सिटी कॉलेज -लंडन येथे जागतिक सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापक आहेत.

या अभ्यासात आरोग्यविषयक लिंगभेदांसंदर्भात मत मांडण्यात आले आहे. लुईसा सोरिओ फ्लोर सांगतात, “मानसिक विकार असलेल्या महिलांना लगेच मदत मिळते; मात्र पुरुषांच्या बाबतीत तसे घडत नाही. अशा प्रकारे आरोग्य सेवा प्रणालींमध्ये भेदभाव होतो.“ लुईसा सोरिओ फ्लोर अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशनच्या सहायक प्राध्यापकदेखील आहेत.

पुरुषांमध्ये आपल्या मानसिक समस्यांबद्दल फारशी जागरूकता नसते. त्यामुळे त्यांना मदत मिळण्याची शक्यताही कमी असते. कारण- पुरुष हा मानसिकदृष्ट्या कणखर असावा, अशी धारणा आहे. त्यामुळेच पुरुषांमध्ये याविषयीची जागरूकताही फार कमी आहे.

महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष अन् डॉक्टरांकडूनही गांभीर्याचा अभाव

महिलांमध्ये पाठदुखीसारखे ‘मस्क्युकोस्केलेटल’ विकार सामान्य आहेत. हा त्रास हार्मोन्समधील बदल, स्नायूंचे आकुंचन, गर्भधारणा, बाळंतपण व शारीरिक ताण अशा जैविक घटकांमुळे वाढतो. स्त्रियांना या त्रासांसाठी खरे तर मदतीची गरज असते; पण अशा वेळी त्या या त्रासाकडे दुर्लक्ष करून, डॉक्टरांकडे जाणे टाळतात, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. अभ्यासात असेदेखील दिसून आले आहे की, जेव्हा महिलांमध्ये पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात, तेव्हा डॉक्टर्सदेखील अशा समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

महिलांना पाठदुखीचा त्रास का होतो? याच्या पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये पाठदुखीचे प्रमाण जास्त असते; जे चिंताजनक आहे. लेखकांनुसार, घरातील काम करणे, संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळणे अशा गोष्टींमुळे महिला स्वतःची काळजी घेत नाहीत आणि वेळेत त्यासाठी आवश्यक उपायही करीत नाहीत.

प्रदीर्घ काळानंतरही महिलांची अवस्था ‘जैसे थे’

१९९० ते २०२१ पर्यंतच्या डेटाची तुलना केल्यास संशोधकांना असे लक्षात आले की, काळानुसार अनेक बाबतीत बदल झाला आहे; मात्र पुरुष आणि महिलांमधील भेदभाव आजही स्थिर आहे. महिलांमध्ये सामान्यतः आढळणार्‍या पाठदुखी किंवा नैराश्य यांसारख्या समस्या १९९० पासून क्वचितच कमी झाल्या आहेत. “मला वाटते की जागतिक आरोग्य प्रणालींमध्ये महिलांच्या आरोग्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. महिलांचे आरोग्य हे सर्वथा त्यांच्या गर्भाशयावर केंद्रित आहे, असाच समज आहे,” असे हॉक्स म्हणाल्या. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या महिलादेखील स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, हेही तितकेच खरे.

हेही वाचा : AC Blast: कडक उन्हाळ्यात एसीमध्ये स्फोट होण्याची कारणं काय? कोणती खबरदारी घ्यावी?

लिंगनिहाय आरोग्य माहिती गोळा करण्याची गरज

महिला आणि पुरुषांमधील हा भेद कमी करण्याची पहिली पायरी म्हणजे योग्य डेटा गोळा करणे, असे लॅन्सेट संशोधकांनी सांगितले. कारण- लिंग आणि लिंगानुसार वर्गीकरण केलेला आरोग्य डेटा अजूनही सातत्याने गोळा केला जात नाही. सोरिओ फ्लोर म्हणाल्या, “आमचे निकाल अगदी स्पष्ट आहेत. पुरुष आणि महिलांच्या आरोग्याच्या गरजा वेगळ्या आहेत.” सरकार आरोग्यावर अधिक पैसे खर्च करते. विशेषत: अशा परिस्थिती पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रभावित करतात. परंतु, मानसिक आरोग्यासारख्या गोष्टींसाठीचा निधी कमी होत चालला आहे, असेही त्या म्हणाल्या.

या संशोधनातून एक निष्कर्ष असाही निघतो की, समाजातील धारणेमुळे पुरुष आपल्या मानसिक आरोग्याकडे, तर महिला आपल्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात.