Lashkar-e-Taiba terrorists लष्कर-ए-तोयबाचे काही दहशतवादी विमानाने पाकिस्तानमधून बांगलादेशमध्ये पोहोचल्याचा दावा बांगलादेशातील एका पत्रकाराने केला आहे. या दाव्याचा पुरावा म्हणून या पत्रकाराने काही पासपोर्ट्सचे फोटोही शेअर केले आहेत. पत्रकार शाहिदुल हसन खोकन यांनी असा दावा केला आहे की, ३० जानेवारी रोजी पहाटे ४.२० च्या सुमारास कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले बांगलादेश एअरलाईन्सचे ‘BG-342’ हे विमान ढाकाच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विमानात एकूण ११३ प्रवासी होते आणि या विमानातील अनेक व्यक्तींची ओळख लष्कर-ए-तोयबाचे (LeT) सदस्य म्हणून पटली आहे. बांगलादेशी पत्रकाराचा नेमका दावा काय? लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी बांगलादेशात कोणत्या कारणाने दाखल झाले? जाणून घेऊयात…
पत्रकाराचे आरोप काय?
शाहिदुल हसन खोकन यांच्या आरोपानुसार, या विमानातील अनेक व्यक्तींची ओळख लष्कर-ए-तोयबाचे सदस्य म्हणून पटली आहे. त्यांच्या पासपोर्टवरील माहितीतून त्यांचे संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या दाव्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या अपयशावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे दहशतवाद्यांचा प्रवेश देणे हा सरकारचा मोठा हलगर्जीपणा किंवा हेतुपुरस्सर केलेले दुर्लक्ष असल्याचे त्यांचे आरोप आहेत. खोकन यांनी सीमा नियंत्रण आणि प्रवासी तपासणीतील धोकादायक त्रुटींकडेही लक्ष वेधले आहे.
पाकिस्तान बांगलादेशचा वापर करून भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याच्या बातम्यांदरम्यान ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानकडून होणारा कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धाचे पाऊल मानला जाईल, ही भारताची भूमिका स्पष्ट असतानादेखील हालचाली घडत आहेत. बांगलादेश सध्या पाकिस्तानबरोबरच्या त्यांच्या नवीन मैत्रीचा आनंद साजरा करत आहे. अशात भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी बांगलादेशचा वापर होऊ नये, यासाठी त्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे काही तज्ज्ञांचे सांगणे आहे.
‘युरेशिया रिव्ह्यू’च्या अहवालातून इशारा
‘युरेशिया रिव्ह्यू’मधील एका अहवालानुसार, १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराने बळाचा वापर केला होता. मात्र, ते फाळणी आणि बांगलादेशची निर्मिती रोखू शकले नाहीत. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानशी मजबूत धार्मिक नाते टिकवून ठेवण्यासाठी जनसामान्यांचे इस्लामीकरण करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. या अहवालात आणखी एका गोष्टीवर भर देण्यात आला आहे की, बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमुळे कट्टरपंथी इस्लामी गटांना पाय रोवणे सोपे झाले आहे आणि याच कमकुवतपणाचा पाकिस्तानने पूर्ण फायदा घेतला आहे.
“रावळपिंडी (पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय) हिंदूविरोधी भावना भडकवत असून भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी संघटनांची एक युती तयार करत असल्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत भारताने या संभाव्य धोक्यासाठी तयार राहणे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणेदेखील गरजेचे आहे,” असे यात नमूद करण्यात आले आहे.
बांगलादेशचा लष्करी म्हणून वापर झाल्यास काय?
बांगलादेशी साप्ताहिक ‘ब्लिट्झ’मधील एका वृत्तानुसार, आपल्या भूभागाचा वापर लष्करी म्हणून होऊ दिल्यास, बांगलादेश पाकिस्तान आणि भारतामधील दीर्घकालीन संघर्षात ओढला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, “पाकिस्तानच्या ‘डीप स्टेट’साठी दहशतवाद त्यांचे धोरण आहे. जग राजनैतिक समस्यांमध्ये अडकले असताना, आयएसआयने आपला सर्वात घातक डाव पुन्हा सक्रिय केला आहे. तो डाव म्हणजे, भारताविरुद्धचा ‘प्रॉक्सी जिहाद’.”
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्यावेळी, आयएसआय दहशतवाद, घातपात आणि वैचारिक युद्धाची मोहीम राबवत असल्याचे नवीन गुप्तचर माहितीवरून समोर आले आहे. ही मोहीम पश्चिम बंगालपासून बांगलादेशपर्यंत आणि अगदी पाश्चात्य देशांमधील भारतीय दूतावासांपर्यंत पसरलेली आहे, असे ‘युरेशिया रिव्ह्यू’मधील अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांचा उल्लेख करत या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानी आयएसआयला ‘ढाका सेल’च्या थेट मार्गदर्शनाखाली, पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) कथित ‘अडकलेल्या पाकिस्तानी’ नागरिकांना पद्धतशीरपणे भारत-बांगलादेश सीमेवरून भारतीय हद्दीत घुसविले जात आहे.
“या व्यक्तींना घातपाती आणि अस्थिरता निर्माण करणाऱ्या कारवाया करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे समजते. गुप्तचर अहवालांमध्ये त्यांचा उल्लेख ‘मोहाजिर रेजिमेंट’ म्हणून करण्यात आला आहे. या युनिटमध्ये १८ ते ४० वयोगटातील स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. यातील काहींना ‘आयईडी’ बनवण्याचे आणि आत्मघाती हल्ले करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे,” असेही यात नमूद केले आहे. बांगलादेशी पत्रकाराच्या या आरोपांमुळे, पाकिस्तान आता भारतावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा वापर करण्याच्या विचारात असल्याची भीती वर्तवली जात आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत.

