Late Night Dinner Health Risks : कामाचा ताण, प्रवासातील मोठा वेळ आणि सतत बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे अनेकांना रात्रीचे जेवण उशिरा करावे लागते. दिवसभराच्या व्यस्त दिनचर्येमुळे जेवणाची वेळ पुढे ढकलली जाणे ही आज अनेकांच्या जीवनशैलीतील सामान्य बाब झाली आहे. कधीतरी रात्री उशिरा जेवण झाल्यास त्याचा शरीरावर सहसा फार मोठा परिणाम जाणवत नाही; पण ही सवय रोजची झाल्यास आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर रात्रीचे जेवण नेमके किती वाजता करावे? रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रियेवर काय होतो परिणाम? त्याविषयीचा हा आढावा…

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणाची वेळ शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी संबंधित असते. रात्री उशिरा जेवण केल्यास शरीराची अन्नावर प्रक्रिया करण्याची पद्धत बदलू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी शरीराची चयापचय प्रक्रिया दिवसभराच्या तुलनेत मंदावलेली असते. त्यामुळे उशिरा घेतलेल्या जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. ही सवय सातत्याने कायम राहिल्यास रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रात्री उशिरा जेवून लगेच झोपण्याची सवय असल्यास पचनक्रियेलाही त्रास होऊ शकतो. जेवणानंतर शरीराला अन्न पचवण्यासाठी काही वेळ आवश्यक असतो. मात्र, झोपण्याची वेळ जवळ आल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच व्यक्ती आडवी होते. परिणामी काही लोकांना अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे किंवा अस्वस्थपणा जाणवू शकतो. विशेषतः जड, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ रात्री उशिरा खाल्ल्यास हा त्रास अधिक जाणवण्याची शक्यता असते.

रात्री उशिरा जेवण्याचा रक्तातील साखरेशी काय संबंध?

फरीदाबाद येथील सर्वोदय रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉ. मनोज यादव यांच्या मते, जेवणाची वेळ महत्त्वाची असते. कारण रात्री झोपण्याच्या अगदी जवळ जेवण केल्यास झोपण्यापूर्वी पोटातील अन्न रिकामे होण्यासाठी मिळणारा वेळ कमी होतो. दररोज रात्री उशिरा जेवणे ही सवय विशेषतः व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे सामान्य वाटू शकते. मात्र, जेवणाची वेळ केवळ पचनक्रियेवरच नव्हे, तर शरीरातील इतर प्रक्रियांवरही परिणाम करू शकते. दुसरीकडे- शारदाकेअर-हेल्थसिटी येथील वरिष्ठ सल्लागार डॉ. नीरज कुमार सांगतात की, दिवसाच्या सुरुवातीच्या तासांच्या तुलनेत संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी शरीराची इन्सुलिन ((स्वादुपिंडातून स्रावणारे संप्रेरक) संवेदनशीलता सामान्यतः कमी होत जाते. इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे हार्मोन आहे. शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी झाल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे अधिक कठीण होऊ शकते.

प्रत्येकासाठी रात्रीच्या जेवणाची ठरावीक वेळ आवश्यक नाही

झोपण्याच्या अगदी जवळ भरपूर जेवण केल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढू शकते. ही पद्धत नियमित झाली तर मधुमेह, लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींसाठी ही बाब विशेष चिंतेची ठरू शकते. डॉ. यादव यांच्या मतेही, रात्री उशिरा आणि भरपूर जेवण केल्यानंतर शरीर ग्लुकोजचा वापर तितक्या कार्यक्षमतेने करू शकत नाही. परिणामी रक्तातील साखरेची पातळी अधिक काळ वाढलेली राहण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्येकासाठी रात्रीच्या जेवणाची ठरावीक वेळ आवश्यक नाही. प्रत्येक व्यक्तीने रात्रीच्या जेवणासाठी एक कठोर वेळ निश्चित करून त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जेवणाची वेळ जितकी महत्त्वाची आहे, तितकेच आपण काय खातो आणि किती प्रमाणात खातो, हेही महत्त्वाचे आहे. विशेषतः रात्री उशिरा जेवण करावे लागल्यास अतिप्रमाणात किंवा जड पदार्थ खाणे टाळणे आणि झोपण्यापूर्वी पचनासाठी पुरेसा वेळ देणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रियेवर काय होतो परिणाम?

रात्री उशिरा जेवल्यानंतर पोटातील अस्वस्थता किंवा जडपणा फक्त जास्त खाल्ल्यामुळेच येतो असे नाही. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे आणि अॅसिड रिफ्लक्स म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. जेवल्यानंतर आपण आडवे झाल्यास पोटातील अन्न आणि आम्ल पुन्हा अन्ननलिकेकडे जाणे अधिक सोपे होते. त्यामुळे पोटातील आम्ल वर आल्याने छातीत जळजळ किंवा अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. विशेषतः मोठ्या प्रमाणात जेवण करणे तसेच तिखट, तेलकट किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे या समस्यांना आणखी वाढवू शकते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्याच्या वेळेत शरीराला काही काळ मिळणे महत्त्वाचे ठरते. विशेषतः ज्यांना आधीपासून अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होतो, अशा व्यक्तींना जेवण आणि झोप यामध्ये पुरेसे अंतर ठेवल्यास पचनक्रिया अधिक आरामदायी होण्यास मदत होऊ शकते.

उशिरा केलेले जेवण झोपेचीही घडी कशी बिघडवू शकते?

झोपण्याच्या अगदी आधी भरपूर जेवण केल्यास पोट भरल्यासारखे वाटणे, पोट फुगणे किंवा अस्वस्थपणा जाणवू शकतो. त्यामुळे झोप लागण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा रात्रीची झोप वारंवार खंडित होऊ शकते. अॅसिड रिफ्लक्सची समस्या असल्यास झोप आणखी बिघडण्याची शक्यता असते. छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा घशात आम्ल आल्यास रात्री शांत झोप घेणे कठीण होऊ शकते. झोप कमी झाली तर उशिरा जेवण्याची सवय आणखी वाढू शकते. या समस्येचा संबंध केवळ उशिरा जेवण आणि खराब झोप इतकाच नाही. त्याच्या उलटही परिणाम होऊ शकतो. डॉ. नीरज कुमार यांच्या मते, पुरेशी झोप न मिळाल्यास भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. झोपेची कमतरता झाल्यास कॅलरीचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांची इच्छा वाढू शकते. त्यामुळे व्यक्ती जास्त कॅलरी असलेले, गोड किंवा चरबीयुक्त पदार्थ खाण्याकडे आकर्षित होऊ शकते. यातून एक प्रकारचे दुष्टचक्र तयार होण्याची शक्यता असते. कमी झोपेमुळे चुकीच्या खाण्याच्या सवयी निर्माण होतात आणि या चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे पुन्हा झोप आणि शरीराच्या चयापचयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री उशिरा आणि जड जेवण करणे, त्यानंतर लगेच झोपणे आणि अपुरी झोप घेणे या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित ठरू शकतात.

रात्रीचे जेवण नेमके किती वाजता करावे? तज्ज्ञ काय सांगतात?

रात्रीचे जेवण करण्यासाठी घड्याळातील एखादी ठरावीक वेळ पाळण्यापेक्षा झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवण पूर्ण करणे अधिक योग्य ठरू शकते, असे दोन्ही तज्ज्ञांनी सुचवले आहे. त्यांच्या मते, रात्रीच्या जेवणात भाज्या, प्रथिने, संपूर्ण धान्ये आणि आरोग्यदायी चरबी यांचा समावेश असलेला संतुलित आणि माफक आहार घेणे अधिक चांगले. रात्री खूप जड किंवा मोठ्या प्रमाणात जेवण करण्याऐवजी योग्य प्रमाणात आहार घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. यादरम्यान कामाचे वेळापत्रक किंवा अन्य कारणांमुळे काही जणांना रात्री उशिरा जेवावे लागते. अशा परिस्थितीत जेवणाचे प्रमाण कमी ठेवणे आणि अॅसिडिटी किंवा पोटात अस्वस्थपणा निर्माण करणारे पदार्थ टाळणे उपयुक्त ठरू शकते. विशेषतः उशिरा जेवण करताना अतितेलकट, तिखट किंवा जड पदार्थांऐवजी हलका आणि संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

‘परफेक्ट’ वेळेपेक्षा जेवणाची नियमितता किती महत्त्वाची?

जेवण आणि झोपेच्या वेळेत नियमितता राखणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. डॉ. मनोज यादव यांच्या मते, दररोज अगदी ‘परफेक्ट’ वेळेत जेवण करणे हा उद्देश नसावा. त्याऐवजी आपल्या एकूण आरोग्याला पूरक ठरेल अशी नियमित आहार आणि झोपेची दिनचर्या तयार करणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजेच, एखाद्या दिवशी जेवण थोडे उशिरा झाले म्हणून चिंता करण्याची गरज नाही; पण शक्य तितक्या प्रमाणात झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवण पूर्ण करणे, आहाराचे प्रमाण संतुलित ठेवणे आणि नियमित दिनचर्या पाळणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.