लातूरमध्ये वंदे भारत स्लीपरची निर्मिती मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरू शकते. रोजगार, गुंतवणूक, कौशल्यविकास आणि स्थानिक उद्योगांना संधी मिळण्याबरोबरच प्रकल्पाचा व्यापक आर्थिक परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे.
लातूरमध्ये वंदे भारत स्लीपरची निर्मिती मराठवाड्यासाठी महत्त्वाची का?
लातूरमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटची निर्मिती होणे ही केवळ रेल्वे डब्यांची निर्मिती करणारा कारखाना सुरू होण्याची घटना नाही; ती मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी मिळालेली मोठी संधी आहे. मार्च २०२३मधील करारानुसार १२० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट, म्हणजे सुमारे १,९२० डब्यांची निर्मिती अपेक्षित आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ६.५ अब्ज डॉलर असून, ३५ वर्षांची देखभाल जबाबदारीही त्यात समाविष्ट आहे. लातूरची निवड उपलब्ध औद्योगिक जमीन आणि पायाभूत सुविधांमुळे झाल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकल्पाकडे राजकीय भेट म्हणून नव्हे, तर उपलब्ध औद्योगिक क्षमतेचा उपयोग करून घेण्याची संधी म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. मराठवाड्याला दीर्घकाळ भेडसावणाऱ्या गुंतवणूक, रोजगार आणि औद्योगिकीकरणाच्या प्रश्नांना हा प्रकल्प काही प्रमाणात उत्तर देऊ शकतो.
या प्रकल्पामुळे लातूरच्या अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळू शकते?
मोठ्या उत्पादन प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. कारखान्यातील रोजगाराबरोबरच वाहतूक, लॉजिस्टिक्स, देखभाल, सुरक्षा, खानावळ, निवास आणि विविध औद्योगिक सेवांना चालना मिळू शकते. मात्र, या प्रकल्पाची खरी आर्थिक ताकद केवळ कारखान्यातील रोजगारसंख्येत नसून त्याभोवती निर्माण होणाऱ्या औद्योगिक परिसंस्थेत आहे. स्थानिक कंपन्या घटक, सेवा आणि सामग्री पुरवू लागल्या, तर लातूरच्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह वाढेल. त्यामुळे उद्देश केवळ कारखाना चालवणे नसून त्याभोवती पूरक उद्योगांचे जाळे उभे करणे हा असायला हवा.
डबे निर्मितीचा फायदा स्थानिक लघु-मध्यम उद्योगांना कसा होऊ शकतो?
ही या प्रकल्पाच्या यशाची महत्त्वाची कसोटी ठरू शकते. वेल्डिंग, इलेक्ट्रिकल प्रणाली, केबलिंग, ब्रेकिंग, आसने, आतील सजावट, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स आणि देखभाल साहित्य अशा विविध क्षेत्रांत स्थानिक लघु-मध्यम उद्योगांना संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे, तांत्रिक ज्ञान, भांडवल आणि रेल्वेच्या पुरवठा मानकांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. लातूरमध्ये रेल्वे-केंद्रित एमएसएमई क्लस्टर विकसित झाला, तर या प्रकल्पाचा लाभ केवळ लातूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्यात पोहोचू शकतो.
रशियन तंत्रज्ञानामुळे भारताला काय लाभ होऊ शकतो?
भारतीय कंपनी रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) आणि रशियन कंपनी ट्रान्समॅशहोल्डिंग (टीएमएच) यांचा लातूर येथील हा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पात रशियाची ७५ टक्के, तर भारताची २५ टक्के भागीदारी आहे. रशियन तंत्रज्ञान आणि भारतीय मनुष्यबळ यांचा समन्वय हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा पैलू आहे. मात्र, या प्रकल्पाचे खरे यश केवळ परदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात नसून, ते भारतीय उद्योग किती प्रभावीपणे आत्मसात करतात आणि त्याचा पुढे विकास करतात, यात आहे. उच्च वेग, आधुनिक ब्रेकिंग प्रणाली, ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स, सेन्सर-आधारित प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांनी आत्मसात केले, तर देशांतर्गत तंत्रज्ञान क्षमता अधिक बळकट होऊ शकते. तंत्रज्ञानाचे भारतीयीकरण आणि स्थानिक उद्योगांचा वाढता सहभाग हा या प्रकल्पाचा दीर्घकालीन लाभ ठरू शकतो.
प्रकल्पामुळे युवकांसाठी कोणत्या नव्या रोजगार संधी मिळतील?
या प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व केवळ रोजगाराच्या संख्येत नसून रोजगाराच्या गुणवत्तेत आहे. वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन, गुणवत्ता नियंत्रण, मशीन ऑपरेशन, औद्योगिक सुरक्षा आणि देखभाल यांसारख्या क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होईल. रशियातील उत्पादन केंद्रांमध्ये प्रशिक्षण मिळणे ही सकारात्मक बाब आहे. मात्र, त्याचा विस्तार आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांपर्यंत झाला पाहिजे. अप्रेंटिसशिप, उद्योग प्रशिक्षण आणि कौशल्य प्रमाणपत्र यांचे कायमस्वरूपी मॉडेल तयार झाल्यास लातूरच्या युवकांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.
प्रकल्पाचा सामाजिक परिणाम रोजगारापुरताच मर्यादित राहील का?
मोठ्या औद्योगिक प्रकल्पामुळे स्थानिक उत्पन्न वाढू शकते, युवकांचे स्थलांतर कमी होऊ शकते आणि शिक्षण, प्रशिक्षण, निवास, वाहतूक, आरोग्य तसेच सेवा क्षेत्राला चालना मिळू शकते. मात्र, स्थानिक युवक, महिला, विद्यार्थी आणि लघुउद्योजकांना या संधींचा व्यापक लाभ मिळणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा उद्योग शहरात असेल; पण स्थानिक समाज त्याच्या आर्थिक मूल्यसाखळीपासून दूर राहण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘लातूरमध्ये कारखाना’ यापेक्षा या कारखान्यामुळे लातूरच्या सामाजिक, औद्योगिक आणि उद्योजकता क्षेत्रात निर्णायक बदल होणे अपेक्षित आहे आणि हेच अधिक महत्त्वाचे आहे.
प्रकल्पाच्या यशाची खरी कसोटी काय असावी?
पहिला वंदे भारत स्लीपर डबा लातूरमधून या वर्षाअखेर बाहेर पडणे अपेक्षित असले, तरी येथून १६ डब्यांचा संपूर्ण ट्रेनसेट केव्हा बाहेर पडेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पहिला डबा तयार होणे हा निश्चितच अभिमानाचा क्षण असेल; मात्र, तेच या प्रकल्पाच्या यशाचे अंतिम मोजमाप नसावे. किती स्थानिक कंपन्या पुरवठा साखळीत सहभागी होतात, किती युवकांना उच्च कौशल्याचे प्रशिक्षण मिळते, किती अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात आणि किती नवीन एमएसएमई उभे राहतात, यावर या प्रकल्पाचे खरे यश मोजले पाहिजे. लातूरला या प्रकल्पाच्या रूपाने एक ‘अँकर इंडस्ट्री’ मिळाली आहे. आता तिच्याभोवती पूरक उद्योग, कौशल्य प्रशिक्षण संस्था, संशोधन केंद्रे आणि उद्योजकतेचे जाळे उभे करणे ही पुढची जबाबदारी असेल.
rajeshwarthakare@expressindia.com
