मुंबईच्या गोकुळधाम सोसायटीत दयाबेनने काही गडबड केली की जेठालाल ओरडतो, “ए पागल औरत!” आणि आपल्याला हसू फुटतं न फुटतं तोच स्क्रीनमधून खदखदून हसण्याचा आवाज येतो. तिकडे न्यूयॉर्कमध्ये बार्नी स्टिन्सन म्हणतो, “Legen… wait for it… dary!” आणि पुन्हा तेच – विनोद संपायच्या आतच हशा हजर! मुंबईतली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ असो किंवा न्यूयॉर्कमधली ‘How I Met Your Mother’ दोन्हीकडे विनोदाच्या मागे हसण्याचा आवाज तयार असतो. समोरच्याने केलेला विनोद पुरता कळण्याआधीच कोणीतरी आपल्यासाठी हसून मोकळं झालेलं असतं. हे हसणारे लोक कोण? ते कधी हसले? आणि आपणही त्यांच्यासोबत का हसतो?
या प्रश्नांचं उत्तर १९५० मध्ये अमेरिकेत सापडलं. CBS वाहिनीवर काम करणारे ध्वनी अभियंता चार्ली डग्लस यांना स्टुडिओतल्या प्रेक्षकांचं हसणं आवडत नसे. कधी ते नको तिथे हसायचे, तर अनेकदा जिथे खरंच काहीतरी विनोद झाला आहे तिथे हसायचेच नाहीत आणि कधीतरी त्यांचं हसणं थांबायचंच नाही. रेडिओवर कार्यक्रम आधी रेकॉर्ड करून हसू कमी-जास्त करण्याचं तंत्र आधीच वापरलं जात होतं. डग्लस यांनी हेच तंत्र टीव्हीवर आणलं. त्यांनी हसण्याच्या रेकॉर्डिंगचं एक यंत्र बनवलं, ज्याला ‘लाफ बॉक्स’ म्हटलं गेलं. त्याचा पहिला वापर ‘The Hank McCune Show’ मध्ये झाला. त्यामागचं अजून एक कारण म्हणजे त्या काळी टीव्ही हे प्रसार माध्यमांमधलं नवं माध्यम होतं. नाट्यगृहात किंवा चित्रपटगृहात सादरीकरण इतर आजूबाजूच्या माणसांसोबत पाहण्याची सवय होती. मात्र, तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीनंतर नाटक-सिनेमा पाहणं हा ‘पर्सनल स्पेस’चा विषय झाला, त्यामुळे कोणतेही सादरीकरण पाहताना माणसांची ती सोबत भरून काढण्यासाठी लाफ ट्रॅकचं तंत्रज्ञान पुन्हा वापरण्यात आलं.
खोट्या हसण्यावर टीका कशासाठी?
सुरुवातीपासूनच या तंत्रावर टीका झाली. १९५५ मध्ये अभिनेते डेव्हिड निव्हेन यांनी ‘लाफ ट्रॅक’ला जनतेच्या बुद्धिमत्तेचा सर्वांत मोठा अपमान मानला. ‘MASH’चे (Mobile Army Surgical Hospital) सह-निर्माते लॅरी गेलबार्ट यांना मालिका हशाशिवाय हवी होती, कारण खऱ्या कोरियन युद्धात कुणी हसत नव्हतं. मात्र, ‘सीबीएससी’चे अधिकारी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. यातून काहीतरी सुवर्ण मध्य काढायचा म्हणून रुग्णालयातील गंभीर दृश्यांमध्ये हशा वगळण्याची मुभा मिळाली. त्यातल्या एका निर्मात्याने असंही काबूल केलं की, त्याला ‘लाफ ट्रॅक’ आवडत नसला तरी प्रेक्षकांना आजूबाजूला लोक असण्याचा अनुभव हवा असतो, त्यामुळे ‘लाफ ट्रॅक’ ही काळाची गरज ठरली. लॅटिन अमेरिकेतील काही देशांनी यावर वेगळाच उपाय शोधला – ज्या ठराविक क्षणी त्यांना हशा अपेक्षित होत्या, त्या प्रसंगांवर हसण्यासाठी ते माणसं नेमायचे, ज्यांना ‘रेइडोरेस’ (हसणारे) म्हणतात.
हे तंत्र इतकं टिकलं कसं?
या प्रश्नाचं उत्तर मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हाइन यांच्या १९९६ च्या संशोधनात आहे. त्यांनी मॉल, शाळा, कार्यालयं आणि पार्ट्यांमध्ये माणसांचं हसणं निरीक्षणाने अभ्यासलं. त्यांना असं आढळलं :
- माणूस एकटा असताना हसतो, त्यापेक्षा इतरांसोबत असताना सुमारे ३० पट जास्त हसतो.
- त्यांनी नोंदवलेल्या १,२०० हशांपैकी २० टक्क्यांपेक्षा कमी हसणं विनोदानंतर आलं होतं. बाकी हसणं “तुम्हाला भेटून आनंद झाला” किंवा “खरंच” यांसारख्या साध्या प्रतिक्रियांनंतर आलं.
- हसण्याचा आवाज स्वतःच दुसऱ्याला हसवू शकतो, विनोद झालेला नसतानाही. प्रोव्हाइन यांच्या मते आपल्या मेंदूत हसण्याचा आवाज ओळखणारी ‘laugh detector’ सारखी एखादी यंत्रणा असावी.
- ‘लाफ ट्रॅक’मुळे प्रेक्षक जास्त हसतात आणि कार्यक्रम जास्त विनोदी वाटतो, हे सामाजिक शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
आपलं हसणं हे विनोदापेक्षा सोबतीसाठी जास्त असतं. लाफ ट्रॅक आपल्याला ती सोबत देतो.
हशांचा अतिरेक ठरू शकतो कंटाळवाणा
प्रोव्हाइन यांनी १२८ विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड हसण्याचा १८ सेकंदांचा आवाज दहा वेळा ऐकवला. पहिल्या वेळी जवळपास निम्मे विद्यार्थी हसले. दहाव्या वेळी फक्त तिघं. शेवटी सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना तो आवाज त्रासदायक वाटला. आपण स्वतः हसतो ते माणसांसोबत. तोच आवाज यंत्राकडून वारंवार आला की तो आपल्यावर हसल्यासारखा वाटतो.
बदलत्या काळाचा परिणाम
लाफ ट्रॅकचा प्रवास सरळ नव्हता. I Love Lucy ने स्टुडिओतल्या खऱ्या प्रेक्षकांसमोर चित्रीकरणाची ‘मल्टि-कॅमेरा’ पद्धत आणली. पण, व्हिडीओटेपवर एडिटिंग सुरू झाल्यावर हशात खंड पडू लागला आणि ट्रॅक पुन्हा परतला. १९६५ मध्ये Hogan’s Heroesच्या दोन्ही आवृत्त्या तपासल्या गेल्या आणि चाचणीतल्या प्रेक्षकांना हशासोबतची आवृत्ती जास्त आवडली. पुढे The Flintstones सारख्या कार्टूनमध्येही ट्रॅक आला, जिथे हसायला खरा प्रेक्षक नव्हताच.
१९८१ मध्ये The Hitchhiker’s Guide to the Galaxy ने BBC च्या नियमांसाठी लाफ ट्रॅक रेकॉर्ड केला, पण प्रसारणाआधी वगळला. आजच्या अनेक नावाजलेल्या कॉमेडी मालिका लाफ ट्रॅकशिवाय येतात आणि ते जुन्या पद्धतीचं लक्षण मानले जाते.
आपल्याला यांत्रिक हशांवर हसू का येतं?
याचं उत्तर अगदी सोपं आहे – आपण माणूस आहोत. आपल्याला एकट्याने हसणं विचित्र वाटतं किंवा ते वेडेपणाचं लक्षण वाटतं. अनेकदा आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे बघून एकटेच हसत असलो तर आपली आई आपल्याला लगेच बोलते – “अशी काय एकटीच वेड्यासारखी हसते आहेस?.” मात्र, इतरांच्या हसण्याचा आवाज ऐकू आला की आपलं हसू सुटतं, मग ते हसू रेकॉर्डेड असलं तरी! त्यामुळे पुढच्या वेळी सीरियलमधला हशा ऐकून तुम्हाला हसू फुटलं, तर लक्षात ठेवा – तुम्ही सीरियलमध्ये झालेल्या विनोदावर हसलात की पार्श्वभूमीत ऐकू येणाऱ्या हशांच्या आवाजावर हसलात, हे सांगणं खुद्द शास्त्रज्ञांनाही सोपं नाही.
