Hardeep Singh Nijjar murder Lawrence Bishnoi Goldy Brar : खलिस्तान टायगर फोर्सचा (केटीएफ) प्रमुख हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा काहीही संबंध नसल्याचे कॅनडाने स्पष्ट केले आहे. निज्जरची हत्या जून २०२३ मध्ये कॅनडात झाली होती. त्याच्या हत्येनंतर भारत व कॅनडामधील संबंध बिघडले होते. निज्जरची हत्या झाल्यानंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या दिशेने तपासही सुरू करण्यात आला होता. दरम्यान, निज्जरच्या हत्येत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा हात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या एफबीआयने गोल्डी ब्रारची माहिती देणाऱ्याला ५० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.
हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण काय आहे?
हरदीप सिंग निज्जर हा फुटीरतावादी संघटना खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) चा प्रमुख तसेच कॅनडातील सर्रे येथील गुरू नानक सिख गुरूद्वारा साहिबचा अध्यक्ष होता. १९९७ पासून कॅनडात राहत असल्याने त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते. त्याला दोन मुले आहेत. भारत सरकारच्या माहितीनुसार, निज्जर हा फुटीरतावादी संघटना केटीएफला चालवत होता. ही संघटना २०२३ मध्ये भारतातील यूएपीए कायद्याअंतर्गत दहशतवादी संघटना घोषित करण्यात आली होती.
२०२१ मध्ये जालंधर येथे एका हिंदू साधूवरील हल्ला प्रकरणात तसेच डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात निज्जर ‘वाँटेड’ होता. निज्जरच्या हत्येनंतर सप्टेंबर २०२३ मध्ये जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले. त्याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे ट्रुडो म्हणाले. ट्रुडो यांचे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत भारत सरकारने ते आरोप फेटाळले होते. ट्रुडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारत व कॅनडामधील संबंध कमालीचे बिघडले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना निष्कासित केले. तसेच सर्व द्विपक्षीय चर्चा थांबवल्या. दरम्यान, २०२५ मध्ये दोन्ही देशांनी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत.
कॅनडाने आता काय म्हटले?
भारत सरकारचा निज्जर हत्येत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे कॅनडातील पोलिसांनी बुधवारी (८ जुलै) म्हटले आहे. “या संघटनात्मक गुन्हेगारीचा तपास करताना या प्रकरणात भारत सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हात असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या प्रकरणात भारत सरकार विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत”, असे रॉयल कॅनडियन मौंटेड पोलिसच्या उपायुक्त लिसा मुरलँड कॅनडातील सीबीसी न्यूज या टीव्ही चॅनेलवर म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणाच तपास अजून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉरेन्स बिश्नोई कोण आहे?
लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबमधील एक गँगस्टर असून तो २०१० पासून गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आहे. २०१५ पासून तो अहमदाबादमधील साबरमती सेंट्रल जेलमध्ये आहे. जेलमधूनच तो त्याची गँग चालवतो असे मानले जाते. भारतीय सीमेवर होत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बिश्नोईला अटक केली होती. त्यानंतर त्याला अहमदाबादमध्ये आणण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोईवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि इतर गुन्हे असे २४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येशी संबंधित तसेच सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबाबतही बिश्नोईवर गुन्हे दाखल आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. मुंबईत दाऊद इब्राहीम, छोटा राजन आणि रवी पुजारी यांच्या गँगला पोलिसांनी निष्क्रिय केल्यानंतर बिश्नोई मुंबईतील गुन्हेगारीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यापूर्वी दिले होते.
अमेरिकेने कोणते आरोप केले?
अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस येथील फेडरल न्यायालयाने निज्जरच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई व गोल्डी ब्रार सहभागी असल्याचे म्हटले आहे. जून २०२३ मध्ये निज्जरची हत्या या दोघांच्या आदेशाने करण्यात आली, असे न्यायालयाने म्हटले आहे. फेडरल न्यायालयाच्या माहितीनुसार, निज्जरची हत्या करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती मारेकऱ्यांना बिश्नोईने पुरवली. बिश्नोईने जेलमधूनच मोबाईलच्या माध्यमातून फोटो तसेच निज्जरचे वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती मारेकऱ्यांना दिली. तसेच गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा नॉर्थ अमेरिकेचा प्रमुख असून तो सध्या अमेरिकेत असल्याची शंका आहे.
कॅलिफोर्नियातील जिल्हा न्यायालयाने गोल्डी ब्रार याच्या विरोधात अटक वॉरंट मागील महिन्यात जारी केले आहे. गोल्डी ब्रारवर संघटनात्मक भ्रष्टाचार, खंडणी आणि अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. एफबीआयने देखील गोल्डी ब्रार विरोधात फेडरल वॉरंट जारी केले असून त्याची माहिती देणाऱ्याला ५० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ अंतर्गत हे आरोप ठेवण्यात आले आहेत. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेच्या यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात भारताशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम अमेरिका व युरोपमध्ये चालवली. या ऑपरेशन अंतर्गत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
