Tech job cuts आयटीसह अनेक क्षेत्रांतील लहान-मोठ्या कंपन्या शेकडो कर्मचाऱ्यांची कपात करीत असल्याचा बातम्या वारंवार समोर येत आहेत. एआयचा अनेक क्षेत्रांतील नोकरदारांना फटका बसत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अॅमेझॉनने आपल्या तब्बल १४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची बातमी समोर आली होती.
तसेच ही सर्वांत मोठी नोकरकपात मानली जात होती. परंतु, आता याच नोकरकपातीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. नोकऱ्यांच्या कपातीपैकी जवळपास ४० टक्के कपात अभियंता (इंजिनियर्स) पदांवर झाली आहे. परंतु, यामागील कारणे काय? टेक कंपनीमध्ये इंजिनियर्सनाच मोठया संख्येने कामावरून का काढण्यात येतंय? तज्ज्ञ त्याविषयी काय सांगतात? जाणून घेऊयात….
अॅमेझॉनकडून १४ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचे कारण काय?
या नोकरकपातीचे कारण एआय असल्याचे बोलले जात होते. मात्र, अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांनी त्यावर स्पष्टीकरण देत, कंपनीच्या १४,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या निर्णयाचे कारण पैसे किंवा एआय नाही, असे सांगितले. सीईओ अँडी जॅसी यांनी म्हटले, “गेल्या काही वर्षांत अॅमेझॉन वेगाने वाढत असून, कंपनीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, नेतृत्व व नियंत्रणाबाबत व्यवस्थापनाचे अनेक विभाग वाढवण्यात आले असून, ते एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात निर्णय घेण्याची प्रक्रिया मंदावली. तसेच काही टीममधील जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे या नोकरकपातीचा उद्देश अॅमेझॉनला अधिक कार्यक्षम आणि केंद्रित करणे आहे.”
नव्या तपासातून काय समोर आले?
‘सीएनबीसी’ने एका अहवालाचा उल्लेख करीत म्हटले की, सर्वाधिक नोकऱ्या या अभियंत्यांनी गमावल्या. वर्कर अॅडजस्टमेन्ट अँड रिट्रेनिंग नोटिफिकेशन (WARN)ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी व वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ४,७०० हून अधिक नोकऱ्यांच्या कपातीपैकी जवळपास ४० टक्के कपात ही अभियंता पदांबाबत झाली आहे. कंपनीमधून सुमारे १४,००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना ऑक्टोबरमध्ये आखण्यात आली होती, जी ॲमेझॉनच्या ३१ वर्षांच्या इतिहासातील सर्वांत मोठी कपात आहे. ॲमेझॉनने अनेकांना नोकरीवरून काढल्याची बातमी तर धक्कादायक आहेच; मात्र कोणाला कामावरून काढण्यात आले आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे.
टेक कंपन्यांमध्ये अभियंत्यांनाच नोकरीवरून का काढण्यात येत आहे?
ॲमेझॉन एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), क्लाउड व इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. हे विभाग अभियंते सांभाळतात. कंपनीच्या आतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिभेची कमतरता होती म्हणून नव्हे, तर गतीची कमतरता होती म्हणून त्यांना कामावरून काढण्यात आले. सीईओ अँडी जस्सी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ॲमेझॉनला ‘जगातील सर्वांत मोठी स्टार्टअप’ कंपनी म्हणून चालवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी टीम्सना कमी संसाधनांसह अधिक काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांच्या जलद भरतीनंतर निर्णय प्रक्रिया मंदावली असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
कोणत्या पदांना सर्वाधिक फटका?
WARN नोंदी एका विशिष्ट गोष्टीकडे लक्ष वेधतात की, मध्यस्तरीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंते (SDE II) यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत. हे इंटर्न किंवा वरिष्ठ आर्किटेक्ट नाहीत, असे यात नमूद करण्यात आले आहे. त्यात काही कपात धोरणात्मक निर्णय मागे घेतल्यामुळे झाली; कामगिरीमुळे नाही. ‘सीएनबीसी’ने दिलेल्या अंतर्गत मेमोनुसार, सॅन डिएगो व इर्विन येथील गेमिंग स्टुडिओमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात झाली. त्याचे कारण म्हणजे. लॉर्ड ऑफ द रिंग्सशी संबंधित प्रकल्पांसह कंपनी आपल्या मोठ्या बजेटच्या गेम डेव्हलपमेंटपैकी बरेचसे काम थांबवत आहे. पॅलो अल्टोमधील व्हिज्युअल सर्च आणि एआय-शॉपिंग टीम्सना मोठा फटका बसला. या कर्मचाऱ्यांनी काही आठवड्यांपूर्वीच लाँच केलेल्या ॲमेझॉन लेन्ससारख्या उत्पादनांवर काम केले होते.
एआयचा कर्मचाऱ्यांवर परिणाम
अँडी जॅसी यांनी वारंवार सांगितले आहे की, जनरेटिव्ह एआय ॲमेझॉनच्या कार्यप्रणालीत बदल करील आणि नवीन विशिष्ट नोकऱ्या निर्माण करीत असतानाच, कालांतराने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या कमी करील. मानव संसाधन प्रमुख बेथ गॅलेटी यांनीही त्यांच्या मेमोमध्ये असेच काहीसे म्हटले आहे. जर एआय विकास कार्याला खूप गती देत असेल, तर कंपन्यांना तेच काम करण्यासाठी कमी अभियंत्यांची आवश्यकता भासू शकते, असे कंपनीतील प्रमुखांचे सांगणे आहे.
केवळ ॲमेझॉनच नव्हे, तर इतर कंपन्यांमध्येही हेच चित्र
‘सीएनबीसी’नुसार, या वर्षी टेक क्षेत्रामध्ये २३१ कंपन्यांमधील जवळपास १,१३,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे, असे ‘Layoffs.fyi’ने नमूद केले आहे. कंपन्या एकाच वेळी एआय संबंधित भूमिकांसाठी भरती करत आहेत आणि सामान्य अभियंत्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, ही नोकरभरती थांबवणे नसून पदांची पुनर्रचना आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा इशारा
आर्थिक मंदीची चाहूल लागत आहे, अशा इशारा अब्जाधीश जेफ बेझोस यांनी दिला आहे. त्यांनी ग्राहक आणि व्यावसायिकांनी काय करावे, याचे काही सल्ले दिले आहेत. ग्राहक आणि व्यावसायिकांनी मोठ्या खरेदी करण्याचे सध्या टाळावे, असे आवाहन बेझोस यांनी केले आहे. ग्राहकांनी कार, टीव्ही आणि इतर महागडी उपकरणे खरेदी करण्यावर काही काळ नियंत्रण आणावे. हेच पैसे वाचवले, तर आर्थिक परिस्थिती बिघडल्यानंतर कामाला येऊ शकतात. तसेच लहान व्यावसायिकांनी मोठे भांडवली खर्च किंवा अधिग्रहणाची गुंतवणूक टाळावी, असेही ते म्हणाले.
