LDL Cholesterol Verve 102 Treatment : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज औषधं घेण्याऐवजी एकदाच उपचार घेतला आणि एलडीएल (LDL) म्हणजेच ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ नियंत्रणात आलं तर? हृदयरोग तज्ज्ञांमध्ये सध्या अशाच एका नव्या प्रायोगिक उपचाराची चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील औषध कंपनी एली लिली (Eli Lili) आणि तिची उपकंपनी व्हर्व्ह थेरप्युटिक्स (Verve Therapeutics) या उपचारावर संशोधन करीत आहेत. सुरुवातीच्या चाचणीत एकदाच दिलेल्या डोसनंतर रुग्णांच्या एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये ६२ टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे आणि हा परिणाम १८ महिन्यांपर्यंत कायम राहिल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.
या उपचारासंबंधित आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तो फक्त कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर यकृतातील PCSK9 नावाच्या जनुकाची क्रियाच कायमची बंद करण्याचं उद्दिष्ट ठेवतो. हे जनुक एलडीएल कोलेस्ट्रॉलच्या नियंत्रणाशी संबंधित आहे. त्यामुळे ते बंद केल्यास एलडीएलची पातळी दीर्घकाळासाठी कमी ठेवता येऊ शकते, अशी या उपचारामागची संकल्पना आहे.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधं घेतोय; पण शरीरात एलडीएल तयार होण्याची प्रक्रियाच कायमची बदलली तर? याच संकल्पनेवर वर्व्ह-१०२ (Verve-102) हा उपचार आधारित आहे. एलडीएलला ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ म्हटलं जातं. कारण, त्याचं प्रमाण वाढलं की, ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचतं आणि प्लाक नावाचे चरबीचे थर तयार होतात. हे थर रक्तवाहिन्या अरुंद करतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
मात्र, वर्व्ह-१०२ हा नेहमीच्या औषधांसारखा उपचार नाही. हा उपचार in vivo gene editing म्हणजेच रुग्णाच्या शरीरातच जनुकांमध्ये बदल करण्याच्या तंत्रावर आधारित आहे. या उपचारात शिरेतून दिलेल्या औषधाद्वारे विशिष्ट जनुकीय सूचना यकृतातील पेशींपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यानंतर या पेशींमध्ये असा कायमस्वरूपी बदल करण्याचा प्रयत्न केला जातो की, एलडीएल तयार होण्याची प्रक्रिया दीर्घकाळासाठी कमी होईल. म्हणजे नेहमीच्या औषधांप्रमाणे काही काळ कोलेस्ट्रॉलची निर्मिती रोखण्याऐवजी, त्यामागची जनुकीय प्रक्रियाच बदलण्याचा हा प्रयत्न आहे.
प्राध्यापक डेव्हिड ई. न्यूबी, ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे ड्यूक ऑफ एडिनबर्ग चेअर ऑफ कार्डिओलॉजी आणि वर्व्ह-१०२ चाचणीचे सहलेखक, यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पारंपरिक उपचारांमध्ये एलडीएल कमी ठेवण्यासाठी रुग्णाला नियमितपणे औषधं घ्यावी लागतात. मात्र, वर्व्ह-१०२ मध्ये यकृतातील पेशींच्या डीएनमध्ये एकदाच लक्ष्यित बदल केला जातो, ज्यामुळे एलडीएल कमी ठेवण्याचा परिणाम दीर्घकाळ टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. या उपचाराचे उद्दिष्ट एकदाच उपचार देऊन, यकृताची PCSK9 तयार करण्याची क्षमता कायमस्वरूपी कमी करणे आहे. त्यामुळे भविष्यात ‘एकदा उपचार आणि कायमचा परिणाम’ देणारा कोलेस्ट्रॉल उपचार विकसित होऊ शकतो, अशी संशोधकांना आशा आहे.
या अभ्यासामुळे आयुष्यभर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी एकदाच जनुकीय उपचार करण्याची संकल्पना समोर ठेवून आता प्रत्यक्षात मानवी चाचणी केली जात आहे. मात्र, असा कायमस्वरूपी जनुकीय बदल करण्यामध्ये धोक्यांपेक्षा फायदे अधिक आहेत, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे सध्या वर्व्ह-१०२ हा काही उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांसाठी भविष्यातील प्रभावी उपचार मानला जात आहे. वर्व्ह-१०२ हा उपचार स्टॅटिन्स, इझेटिमाइब, PCSK9 इनहिबिटर्स किंवा इन्क्लिसिरान यांसारख्या सध्याच्या उपचारांपुढील पर्याय नाही.
PCSK9 वरच लक्ष्य का?
PCSK9 हे रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करणारं एक प्रथिन आहे. संशोधकांच्या मते, काही लोकांमध्ये PCSK9 जनुक नैसर्गिकरीत्या कमी सक्रिय असतं. अशा लोकांमध्ये आयुष्यभर एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी तुलनेनं कमी राहते आणि कोरोनरी हृदयविकाराचा धोका (रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर साचून, त्या अरुंद किंवा ब्लॉक होण्याचा आजार)देखील कमी असतो. त्यामुळे PCSK9 ची क्रिया कमी केल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्याचा सुरक्षित आणि प्रभावी मार्ग मिळू शकतो, असा संकेत संशोधकांना मिळाला.
त्यानंतर औषधांच्या चाचण्यांमधूनही या निष्कर्षाला आधार मिळाला. PCSK9 ला लक्ष्य करणाऱ्या औषधांमुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे. मात्र, सध्याची औषधं PCSK9 ची क्रिया तात्पुरती रोखतात किंवा त्याची निर्मिती कमी करतात. त्यामुळे त्यांचा परिणाम टिकविण्यासाठी उपचार सुरू ठेवावे लागतात. वर्व्ह-१०२ मात्र PCSK9 मध्ये कायमस्वरूपी बदल करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे वारंवार औषधं घेण्याची गरज कमी होऊ शकते.
एका उपचारानंतर एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये सुमारे ६० टक्के घट झाली, तर त्याचा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकच्या धोक्यावर किती परिणाम होऊ शकतो? याचं उत्तर एलडीएल किती कमी होतं, यावर अवलंबून आहे. एलडीएलमध्ये १ mmol/L घट झाली, तर हृदयविकाराचा धोका सुमारे २० ते २२ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ- एखाद्या व्यक्तीचा एलडीएल ४.० mmol/L म्हणजेच सुमारे १५५ mg/dL असेल आणि तो ६० टक्क्यांनी कमी होऊन १.६ mmol/L म्हणजेच सुमारे ६० mg/dL वर आला, तर हृदयविकाराचा धोका जवळपास निम्म्यानं कमी होऊ शकतो.

चाचणीच्या चार आठवड्यांनंतर सर्वाधिक डोस घेतलेल्या गटात हा परिणाम आणखी ठळकपणे दिसून आला. या गटात PCSK9 ची पातळी सुमारे ८८ टक्क्यांनी कमी झाली, तर एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये सुमारे ६२ टक्क्यांची घट झाली. म्हणजेच एलडीएलमध्ये सरासरी सुमारे ७८ mg/dL ची घट नोंदविण्यात आली आहे.
एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, हे आधीच्या अनेक संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. मात्र, वर्व्ह-१०२ मुळे थेट हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक टाळता येतो, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे सध्याचे निष्कर्ष आशादायक असले तरी रुग्णांनी त्याकडे सावधपणे पाहणं गरजेचं आहे. PCSK9 प्रोटीनला रोखणाऱ्या सध्याच्या औषधांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचं याआधी दिसून आलं आहे. त्यामुळे वर्व्ह-१०२ चा परिणामही तसाच असण्याची शक्यता आहे; पण ते अजून सिद्ध झालेलं नाही.
या चाचणीतील काही रुग्णांचा किमान एक वर्ष, तर काहींचा १८ महिन्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला. या काळात PCSK9 आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलमधील घट तुलनेनं स्थिर राहिली. मात्र, १८ महिन्यांचा परिणाम म्हणजे हा बदल अनेक दशकं टिकेल, असं सिद्ध होत नाही. त्यासाठी दीर्घकालीन संशोधन आणि पुढील चाचण्यांची गरज आहे.
एकदाच उपचार घेतला की, वारंवार गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्याची गरज पडणार नाही, ही संकल्पना रुग्णांसाठी नक्कीच आकर्षक आहे. मात्र, या सोईसाठी कायमस्वरूपी जनुकीय बदलाची रिस्क घेणं योग्य ठरेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, नियमित औषधं घेणं, त्यांची पुन्हा प्रिस्क्रिप्शन घेणं आणि डोस लक्षात ठेवणं ही अनेक रुग्णांसाठी अडचणीची बाब असते. त्यामुळे हा उपचार सुरक्षित असल्याचं सिद्ध झाल्यास तो क्रांतिकारी ठरू शकतो. मात्र, यामध्ये कायमस्वरूपी जनुकीय बदल केला जात असल्याने त्याचे दीर्घकालीन परिणाम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. या उपचारामुळे नेमके कोणते परिणाम होतात, हे समजण्यासाठी रुग्णांचं दीर्घकाळ निरीक्षण करावं लागेल. PCSK9 जनुकातील काही नैसर्गिक बदल असलेल्या लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी आणि आयुर्मान अधिक असल्याचं आढळलं आहे. याच निरीक्षणातून वर्व्ह-१०२ उपचाराच्या संशोधनाला आधार मिळाला.
वर्व्ह-१०२ उपचार भविष्यात कोणत्या रुग्णांसाठी वापरला जाऊ शकतो? तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला कौटुंबिक हायपरकोलेस्ट्रोलेमिया किंवा हृदयविकाराचा अतिशय जास्त धोका असलेल्या रुग्णांवर या उपचाराचा विचार केला जाऊ शकतो. कारण- या रुग्णांना अशा उपचाराचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर उपचार करून त्याचे फायदे आणि धोके बारकाईने पाहिल्यानंतरच हा उपचार अधिक व्यापकपणे वापरण्याचा विचार करता येईल, असे संशोधक स्पष्ट करतात.
