Journalist Amal Khalil Died in Israeli Strike: इस्रायल व लेबनॉन या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरू आहे. लेबनॉनच्या दक्षिणेला इस्रायल आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने बुधवारी (२२ एप्रिल) केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये लेबनॉनमधील वरिष्ठ महिला पत्रकार अमल खलील यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटत आहेत. हल्ला झाल्यानंतर मदतीसाठी सरसावणाऱ्या बचाव पथकावरही इस्रायलने हल्ला केला, असे लेबनॉनने म्हटले आहे. इस्रायल मुद्दाम लेबनॉनच्या पत्रकारांना लक्ष्य करत आहे, असे लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन म्हणाले. तर मदतीसाठी जाणाऱ्या पथकावरही इस्रायल हल्ला करत आहे, असे लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम म्हणाले. हा ‘अॅक्ट ऑफ वॉर’ असून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, इस्रायलने सर्व आरोप फेटाळले. अमल खलील कोण होत्या? संघर्षग्रस्त भागात पत्रकारांवर हल्ला झाल्यास आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
महिला पत्रकार अमल खलील कोण होत्या?
लेबनॉनमधील अल-अखबार या वृत्तपत्रासाठी ४२ वर्षीय अमल खलील ह्या पत्रकारिता करत होत्या. त्यांचा जन्म १९८४ मध्ये दक्षिण लेबनॉनमधील अल-बासीरियाह या शहरात झाला होता. त्यांचे लहानपण लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या ‘सीव्हील वॉर’मध्ये (१९७५ ते १९९०) गेले. अमल यांनी साहित्य क्षेत्राचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर त्यांनी काही चळवळींमध्ये सहभाग नोंदवला. २००६ मध्ये त्यांनी अल-अखबार या वृत्तपत्रात काम करणे सुरू केले. मागील दोन दशकांपासून त्या दक्षिण लेबनॉनमधील समस्या वृत्तपत्रात मांडत होत्या.
अमल खलील यांच्यावर हल्ला कसा झाला?
अमल खलील या फ्रिलॅन्स फोटो पत्रकार झैनाब फराज यांच्यासह बुधवारी (२२ एप्रिल) दक्षिण लेबनॉनमधील अल-तीरी या शहरात गेल्या होत्या. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचे वार्तांकन त्या करत होत्या. झैनाब यांच्याबरोबर दुचाकीवर जात असताना त्यांच्या समोरील वाहनावर इस्रायलचा हवाई हल्ला झाला. त्यानंतर दोघींनीही जवळील एका घरात आश्रय घेतला. इस्रायलच्या हल्ल्यात दोघीही जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ज्या घरात आश्रय घेतला त्या घरावर एअरस्ट्राइक करण्यात आले. त्यामुळे दोघीही गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, लेबनॉनच्या सैनिकांनी झैनाब फराज यांना घरातून बाहेर काढले. अमल यांना वाचवण्यासाठी पुन्हा सैनिक जात असताना त्यांच्यावर इस्रायलच्या सैनिकांनी गोळीबार तसेच ग्रेनेडने हल्ला केला. जवळपास अर्धा तास बचाव पथकाला अमल यांच्या मदतीसाठी जाता आले नाही. अखेर अमल यांचा मृत्यू झाला.
इस्रायलची भूमिका काय?
इस्रायली सैनिकांकडून पत्रकारांना लक्ष्य केले जात नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली. हेजबोल्लाह या दहशतवाद्यांच्या छावणीतून दोन दुचाकी बाहेर पडताना दिसल्या. त्या दुचाकी इस्रायली सैनिकांच्या दिशेने येत होत्या. संभाव्य धोका ओळखून इस्रायली सैनिकांनी गोळीबार केला. त्यातील एका दुचाकीला उडवले. तर ज्या छावणीतून त्या दोन दुचाकी निघाल्या होत्या, तिला एअरस्ट्राइकने उद्ध्वस्त केले, असे इस्रायलने म्हटले आहे. मदतीसाठी जाणाऱ्या लेबनॉनच्या सैनिकांवर गोळीबार केला नसल्याचे इस्रायलने म्हटले. तसेच या प्रकरणी माहिती घेत जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
इस्रायली सैनिकांकडून एकाच वर्षांत ८६ पत्रकारांची हत्या?
इस्रायली सैनिकांवर पत्रकारांची हत्या केल्याचा आरोप वारंवार केला जातो. ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट’ (सीपीजे) ने मे २०२३ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात इस्रायली सैनिकांनी मागील २२ वर्षांत २० पत्रकारांची हत्या केली. या हत्यांचा तपास करूनही कोणालाही शिक्षा दिली गेली नाही, असे म्हटले आहे. तर सीपीजेच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये एकूण १२९ पत्रकारांची हत्या झाली. त्यापैकी ८६ पत्रकारांची हत्या इस्रायली सैनिकांनी केली होती, असे म्हटले आहे. इस्रायली सैनिकांनी मागील २२ वर्षांत केलेल्या पत्रकारांच्या हत्यांसाठी कोणालाही शिक्षा झाली नाही. माध्यमांच्या स्वातंत्र्याला इस्रायलने धोका निर्माण केला आहे, असे सीपीजेने अहवालात म्हटले होते.
पत्रकार हे सशस्त्र दलाचा भाग असल्याने त्यांच्यावर हल्ले केले गेले, असे इस्रायली सैनिकांनी म्हटले आहे. सीपीजेच्या अहवालानुसार, अल जझिराचे पत्रकार अनस अल-शरीफ यांना इस्रायलकडून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. १० ऑगस्ट २०२५ रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अनस अल-शरीफ यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला. मागील महिन्यात लेबनॉनचे तीन पत्रकार वार्तांकन करत असताना इस्रायली हल्ल्यात मारले गेले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, इस्रायलकडून पत्रकारांवर केले जात असलेले हल्ले व होणाऱ्या हत्या यांची आम्ही निंदा करतो. इस्रायलने या प्रकारच्या हल्ल्यांना सामान्य स्वरूप दिले आहे. पत्रकारांच्या हत्या करायच्या व नंतर ते पत्रकार सशस्त्र गटांशी संबंधित होते, असा दावा करायचा हे चुकीचे आहे.
आंतरराष्ट्रीय कायदे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत काय सांगतात?
दोन देशांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू असल्यास आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याने पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात काही तरतुदी दिल्या आहेत. जिनिव्हा कन्व्हेन्शननुसार, दोन देशांमध्ये संघर्ष सुरू असताना सामान्य नागरिकांना दिले जाते, तसे संरक्षण पत्रकारांना देण्याचे सांगण्यात आले आहे. पत्रकार जर संघर्षात सामील नसतील तरच त्यांना संरक्षण द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले. पत्रकारांना नुकसान पोहोचवल्यास ते जिनिव्हा कन्व्हेन्शनचे उल्लंघन मानले जाईल.
सामान्य नागरिकांवर संघर्षादरम्यान हल्ला केल्यास तो युद्ध गुन्हा मानला जातो. ह्युमन राइट्स वॉच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकारांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेने खलील यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली. “पत्रकार त्यांचे कर्तव्य बजावत असताना इतर सामान्य नागरिकांना दिले जाते तसे संरक्षण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांना दिले पाहिजे. त्यांच्या हल्ले होता कामा नये. जाणीवपूर्वक सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे हा युद्ध गुन्हा आहे.” संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या ठराव २२२२ नुसार, युद्ध क्षेत्रात पत्रकारांना संरक्षण देणे व त्यांना हिंसेपासून दूर ठेवणे हे संघर्ष सुरू असलेल्या देशांचे कर्तव्य आहे, असे म्हटले आहे.
जागतिक पातळीवरील मानवतावादी संघटना रेड क्रॉसने खलील यांच्यावरील हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पत्रकारांना सुरक्षा पुरवण्याची मागणी तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रेड क्रॉसने केली आहे.
