‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (आयसा), ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) व ‘ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन’ (एआयएसएफ) या देशभरातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने शिक्षण क्षेत्रातील व्यापक सुधारणा तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जुलैमध्ये दिल्लीत आंदोलन केले. याचे फलित म्हणजे प्रधान यांचे शिक्षण मंत्रीपद गेले. त्याचबरोबर या आंदोलनाला बळ देणाऱ्या डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांना नवा हुरूप आला.
राजकीय प्रभाव उतरणीला
देशभरात सध्या डाव्या पक्षांची सत्ता असलेले एकही राज्य नाही. डाव्या पक्षांचा विचार करता प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांचा समावेश करावा लागेल. पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ इतक्या प्रदीर्घ काळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वात डाव्या आघाडीचे सरकार होते. पुढे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पंधरा वर्षे तेथे राज्य केले. आता या राज्यात भाजप सत्तेत आहे. तर त्रिपुरात १९९३ ते २०१८ अशी जवळपास अडीच दशके डाव्या आघाडीची राजवट होती. पुढे भाजप सत्तेत आला. आताही राज्यात त्यांचाच प्रभाव आहे. केरळमध्ये अनेक दशकांपासून डावे पक्ष विरोधात काँग्रेस आघाडी अशी आलटून पालटून सत्ता होती. मात्र २०२६मध्ये डाव्या आघाडीची दहा वर्षांची सत्ता काँग्रेसने संपुष्टात आणली. आता देशभरात कोठेच त्यांची सत्ता नाही. हे पाच दशकांनंतर प्रथमच घडले. लोकसभा आणि राज्यसभेत मिळूनही त्यांच्या खासदारांची बेरीज जेमतेम दोन आकड्यांत आहे. यावरून त्यांच्या सध्याच्या राजकीय ताकदीचा अंदाज लावता येईल.
सामाजिक संघर्षात अस्तित्व कायम
राजकीय प्रभाव ओसरत असला तरी सामाजिक चळवळी किंवा संघर्षात डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मागे नाहीत. अनेक ठिकाणी देशभर विविध आंदोलन सुरू असतात. त्यात डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. आताही त्यांच्या विचारांच्या विद्यार्थी संघटना देशभर विविध मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारत आहेत. कामगार चळवळीचा प्रभाव कमी होण्याचा फटका डाव्या विचारांच्या राजकारणाला झाल्याचे मानले जाते. मात्र ही विचारसरणी विविध विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून पुढे नेण्याचे काम या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना करत आहेत. माकपने नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत काही विद्यार्थी नेत्यांना उमेदवारी दिली होता. मात्र स्पर्धात्मक निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा प्रभाव पडला नाही. उच्चशिक्षित युवकांना राजकारणात संधी देण्याचा हा प्रयत्न चांगला होता.
लढ्याला संघटित रुप
माकप तसेच भाकपचे बहुसंख्य नेते विद्यार्थी चळवळीतून आले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हे डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांचे प्रभावक्षेत्र. नेहा बोराचे विद्यार्थी नेतृत्त्व येथूनच पुढे आले. आता निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यातही आंदोलनात या डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचा सक्रिय सहभाग आहे. आकर्षक घोषणा त्याला गाण्यांची साथ, डफ यातून वातावरणात जोश निर्माण करण्याचे काम हे युवक करतात. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या जंतमंतरवरील २३ दिवसांच्या आंदोलनाला एक संघटित रुप देण्यात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांची महत्त्वाची भूमिका बजावली हे नाकारून चालणार नाही. डाव्या पक्षांच्या शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये कृषी कायद्याविरोधातील संघर्षातही आघाडी उघडली होती.
पुढे काय?
विचारसरणी तसेच कार्यकर्ता आधारे (केडरबेस) पक्ष म्हणून देशभरात भाजप, डावे पक्ष तसेच बहुजन समाज पक्ष वाटचाल करत असल्याचे मानले जाते. भाजपची केंद्रात २०१४ पासून सत्ता आहे. विद्यापीठ तसेच विविध वैचारिक व्यासपीठांवरून उजवे विरूद्ध डावे असा संघर्ष अनेक ठिकाणी सुरू आहे. काही विद्यापीठांत तर याचे पर्यवसान हाणामारीपर्यंत गेले. पश्चिम बंगाल काही ठिकाणी असे प्रकार नुकतेच घडले. त्यात विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या उदयानंतर जेन झी हा शब्द परवलीचा झाला. युवा वर्गाची ताकद आपल्या मागे हवी यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. नुकतीच दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची (स्टुडंट कौन्सिल) निवडणूक झाली. यात संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी जोर लावला होता. या निकालानंतर प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता पुढील काळात विद्यार्थी संघटना राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील.
नवी माध्यमे, नवे तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाचा आधार घेत समाजमाध्यमांत वातावरण अनुकूल करण्यासाठी संदेश निर्मिती करणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीची दिशा ठरविण्यात आता समाजमाध्यांची भूमिका निर्णायक राहील असे चित्र आहे. समाजमाध्यमात ज्याचा जास्त आवाज त्याचा संदेश अधिक जणांपर्यंत पोहचणार. त्यासाठी विद्यार्थी संघटनांचे उत्तम संघटन विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे प्रभावी जाळे (नेटवर्क) महत्त्वाचे ठरेल. अशा वेळी राजकारणात आपला विचार पुन्हा समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी विद्यार्थी संघटनांची भूमिका निर्णायक ठरेल. त्याच दृष्टीने डाव्या पक्षांच्या निवडणुकीच्या राजकारणाला बळ देण्यासाठी त्यांच्या विद्यार्थी संघटना किती विद्यार्थ्यांपर्यंत विचार रुजवतात हे पुढील काळात महत्त्वाचे ठरेल.
hrishikesh.deshpande@expressindia.com
