Leg Cramps and Blood Sugar : रात्री झोपताना अचानक पायात गोळा येतो, काही वेळ पाय हलवताही येत नाही आणि काही क्षणांसाठी तीव्र वेदना होतात. अनेकदा आपण पाणी कमी प्यायल्यानं, दिवसभर जास्त चालल्यानं किंवा थकवा आल्यानं असं होत असल्याचं गृहीत धरतो. मात्र, असा त्रास वारंवार होत असेल आणि त्यामागचं कारण स्पष्ट नसेल, तर शरीरात सुरू असलेल्या इतर बदलांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. पण, मग स्नायूत अचानक गोळे येण्याचा रक्तशर्करेमधील बदलांशी संबंध असू शकतो का, हा प्रश्न पडतो.

ग्लुकोज शरीराला ऊर्जा देत असल्याने शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रित राहणं स्नायूंच्या सामान्य कामांसाठी महत्त्वाचं असतं. मात्र, पायात किंवा शरीराच्या इतर भागात गोळे येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. शरीरात पाण्याचं किंवा क्षारांचं (Electrolytes) प्रमाण कमी-जास्त होणं, काही औषधांचे अनियमित सेवन, नसांशी संबंधित समस्या किंवा रक्ताभिसरणातील अडचणी यांमुळेही असा त्रास होऊ शकतो.

म्हणूनच वारंवार गोळे येतात म्हणजे रक्तशर्करा वाढली आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. पण, त्यासोबतच सतत तहान लागणं, थकवा जाणवणं किंवा वारंवार लघवी होणं यांसारखी इतर लक्षणंही दिसत असतील, तर रक्तशर्करा तपासून घेणं योग्य ठरू शकतं.

विशेषतः मधुमेह असलेल्या किंवा पुढे मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींमध्ये पायात गोळे येण्याची समस्या वाढू शकते. रक्तशर्करेमध्ये बदल झाला की, शरीरात इतरही बदल होऊ शकतात. त्यामुळे नसांचे कार्य, रक्ताभिसरण, शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण किंवा स्नायूंचे कार्य यांवरही परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे रक्तशर्करा आणि स्नायूंमध्ये येणाऱ्या गोळ्यांचा नेमका काय संबंध आहे, हे तज्ज्ञांकडून समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. रक्तशर्करा वाढली, तर शरीरात कोणते बदल होऊ शकतात आणि हे गोळे वारंवार येत असतील, तर रक्तशर्करेसोबत इतर कोणत्या कारणांचा विचार करायला हवा, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

स्नायूंमध्ये गोळे येण्याचा रक्तशर्करेशी संबंध आहे का?

कनिका मल्होत्रा, कन्सल्टंट डाएटिशियन आणि डायबेटीस एज्युकेटर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “हो, या‌ बाबींचा संबंध असू शकतो; पण अनेकदा ही बाब लक्षात घेतली जात नाही.” रक्तशर्करा अचानक वाढून नंतर कमी होत असेल, तर शरीरातून लघवीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जाऊ शकतं. त्यासोबत सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियमसारखी खनिजंही शरीरातून कमी होतात. स्नायूंना सहजपणे आकुंचन आणि प्रसरण होण्यासाठी या खनिजांची आवश्यकता असते. खनिजांची कमतरता निर्माण झाली, तर स्नायूंच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात. विशेषतः रात्री किंवा व्यायाम केल्यानंतर हा त्रास अधिक जाणवू शकतो.

त्या पुढे सांगतात की, रक्तशर्करेची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहिली, तर स्नायूंना संदेश देणाऱ्या सूक्ष्म नसांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या स्थितीला न्यूरोपॅथी (Neuropathy) म्हणतात. त्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येण्याची शक्यता वाढू शकते आणि त्यामागचं कारण समजणंही काही वेळा कठीण ठरू शकतं. त्यासाठी त्या एक उदाहरण देतात. तंदूरमधील अन्न चांगले होण्यासाठी भट्टीची उष्णता योग्य प्रमाणात राहणं गरजेचं असतं. जर कधी उष्णता जास्त झाली आणि कधी अचानक कमी झाली, तर अन्न शिजण्याची प्रक्रियाही व्यवस्थित होत नाही. शरीरात ग्लुकोजची पातळीही सतत वर-खाली होत राहिली, तर शरीराच्या सामान्य कार्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय आहारात भात किंवा पोळीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जेवणानंतर रक्तशर्करेमध्ये अचानक वाढ आणि त्यानंतर घट होत राहिली, तर या प्रक्रियेत शरीरातील आवश्यक खनिजं हळूहळू कमी होऊ शकतात.

त्यामुळे विशेषतः पोटऱ्या किंवा पायांमध्ये वारंवार गोळे येत असतील, तर त्याकडे केवळ थकवा किंवा शरीरात पाणी कमी झाल्याचं लक्षण म्हणून दुर्लक्ष करू नये. रक्तशर्करेसोबत इतर कारणांचाही विचार करण्याची गरज असू शकते, असं तज्ज्ञ नमूद करतात.

रक्तशर्करेची पातळी अनियंत्रित असलेल्या व्यक्तीच्या पायांत गोळे येण्याचं प्रमाण जास्त असतं का?

कनिका मल्होत्रा यांच्या मते, होय. रक्तशर्करेची पातळी अनियंत्रित असल्यास स्नायूंमध्ये गोळे येण्याचे प्रमाण वाढते; पण त्यासाठी इतर अनेक घटकदेखील कारणीभूत असतात. वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि त्यासोबत सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजंही कमी होऊ शकतात. त्याचबरोबर इन्सुलिन रेसिस्टन्समुळे पेशींच्या पातळीवर मॅग्नेशियम व पोटॅशियम शरीरात शोषलं जाण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

त्यासोबतच रक्तशर्करा दीर्घकाळ जास्त राहिल्यास रक्तवाहिन्यांवरही परिणाम होऊ शकतो. रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे रक्ताभिसरण कमी झालं, तर व्यायाम किंवा हालचाली करताना स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येण्याची शक्यता वाढू शकते. त्यात नसांचं नुकसान झालं असेल, तर समस्या आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत नसांकडून स्नायूंना चुकीचे संकेत पाठवले जातात. परिणामी स्नायू अनैच्छिकपणे आकुंचन पावू शकतात. त्यामुळे विशेषतः रात्री पायांमध्ये अधिक त्रास जाणवू शकतो.

मल्होत्रा सांगतात की, मधुमेह नियंत्रणात ठेवणाऱ्या व्यक्तीच्या रोजच्या आहारात डाळ, भाजी आणि भात यांसारखे पदार्थ असले तरी शरीरातील खनिजांची घट अनेकदा सहज लक्षात येत नाही. कारण- डॉक्टरांनी लिहिलेल्या कागदावर पाहिलं, तर आहार संतुलित वाटतो. मात्र, प्रत्यक्षात शरीरावर एकाच वेळी अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. शरीरातील पाण्याची कमतरता, आवश्यक खनिजांची घट, मज्जातंतूंमधील बदल आणि रक्ताभिसरणातील समस्या या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे स्नायूंमध्ये वारंवार आणि अधिक तीव्र स्वरूपात गोळे येण्याची शक्यता वाढते.