ॲमेझॉनमधील स्टिंगलेस म्हणजेच डंख नसलेल्या मधमाश्यांना कायदेशीर अधिकार मिळाले असून अशा प्रकारे अधिकार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कीटक ठरल्या आहेत…
स्टिंगलेस मधमाश्या म्हणजे काय?
नावाप्रमाणेच स्टिंगलेस मधमाश्या हा असा वर्ग आहे ज्यांना एक तर डंख नसतो किंवा असलाच तर तो वेदनादायी नसतो. त्या जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. या मधमाश्यांच्या ५०० ज्ञात प्रजातींपैकी निम्म्या प्रजाती अॅमेझॉनमध्ये राहतात. एकट्या पेरू या देशात १७० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. तज्ज्ञांच्या मते या प्रजाती डायनासोरच्या काळापासून म्हणजेच सुमारे ८० दशलक्ष वर्षांपासून जगभरातील उष्णकटिबंधीय जंगलांचे संरक्षण करत आहेत. अॅमेझॉन जंगलात जवळपास ८० टक्के वनस्पतींचे परागीभवन या मधमाश्यांमुळे होते. यात कोको, कॉफी आणि अॅव्होकॅडोसारख्या पिकांचा समावेश आहे.
या ‘स्टिंगलेस’ मधमाश्यांचे महत्त्व काय?
अशानिंका आदिवासी समुदाय हा तेथील डंखहीन मधमाश्यांकडून मिळणारा मध विविध प्रकारे औषध म्हणून वापरतो. हा मध कोविड उपचारांचा तुटवडा असलेल्या स्थानिक समुदायांमध्ये साथीच्या काळात वापरला जात होता, हे अॅमेझॉन रिसर्च इंटरनॅशनलच्या संस्थापक रासायनिक जीवशास्त्रज्ञ रोझा वास्क्वेझ एस्पिनोझा यांनी पाहिले. या मधाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना त्याच्या रेणूंमध्ये दाहविरोधी, बॅक्टेरियाविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म आढळले. अॅमेझॉनमधील स्थानिकांसह कीटक शोधण्याच्या, त्यांचे संगोपन करण्याच्या आणि मध जमा करण्याच्या पारंपरिक पद्धतींचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या एस्पिनोझा यांनी ‘द स्पिरिट ऑफ द रेनफॉरेस्ट’ हे पुस्तक लिहिले आहे.
मधमाश्यांसमोर आव्हाने कोणती?
जंगलतोड, बेकायदा लाकूडतोड, अचानक लागणारे वणवे अथवा आगीचे प्रकार, खाणकाम, शेती आणि गुरेढोरांचे चरणे याचा धोका ‘जगाचे फुप्फुस’ मानल्या जाणाऱ्या अॅमेझॉनला आहेच. त्यामुळे डंखहीन मधमाश्यांचे अधिवास नाहीसे होत आहेत. वाढत्या तापमानामुळे डंख नसलेल्या मधमाश्यांना मधासाठी स्थलांतर करावे लागत आहे. ‘या मधमाश्यांसाठी जंगलात पूर्वी साधारण अर्धा तास शोध घेणे पुरेसे ठरायचे, आता तासनतास शोधले तरी त्या दिसत नाहीत’ या स्थानिकांचा अनुभव ही धोक्याची घंटा असल्याचे एस्पिनोझा यांचे म्हणणे आहे.
मधमाश्यांसाठी कायदा कसा तयार झाला?
एस्पिनोझा आणि त्यांची अॅमेझॉन रिसर्च इंटरनॅशनल ही संस्था यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. डंखहीन मधमाश्यांबद्दल जागरूकतेच्या अभावामुळे संशोधनासाठी निधी मिळवणे कठीण झाले. म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेरू आणि इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेकडे धाव घेतली. ही संस्था दुर्मीळ/ लुप्तप्राय ठरलेल्या कीटकांची जागतिक यादी करते पण त्यात युरोपीय कीटकांचा भरणा अधिक आहे! डंखहीन मधमाश्यांच्या प्रजातीला अशी अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी मोठे काम करावे लागले. या संशोधनाने डंख नसलेल्या मधमाश्यांना पेरूच्या मूळ मधमाश्या म्हणून मान्यता देणारा कायदा मंजूर करण्यास मदत केली.
मधमाश्यांसाठी कायदा काय आहे?
पेरूच्या सरकारने २०२४ मध्ये डंखहीन मधमाश्यांना कायदेशीर अधिकार देणारा अध्यादेश मंजूर केला. या मधमाश्या ‘पेरू देशात मूळ आढळ असणारे जीव’ म्हणून मान्यता मिळणे हे महत्त्वाचे पाऊल होते, कारण स्थानिक प्रजातींचे संरक्षण पेरू देशात कायद्याने बंधनकारक आहे. त्याचा विस्तार करणारे कायदे पेरूमधील सतीपो आणि नौटा या दोन नगरपालिकांनी डिसेंबरच्या सुरुवातीला अमलात आणताना ‘अॅमेझोनियन स्टिंगलेस बी’ अर्थात डंख नसलेल्या मधमाश्यांच्या कायदेशीर अधिकारांना तपशीलवार, स्पष्ट वैधानिक आधार दिला. त्यामुळे या माश्या कायदेशीर हक्क असलेल्या जगातील पहिल्या कीटक ठरल्या आहेत.
या हक्कांमध्ये ‘अस्तित्व टिकवण्याचा, निरोगी लोकसंख्या राखण्याचा, अधिवास पुनर्संचयित करण्याचा आणि प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा अधिकार’ इत्यादींचा समावेश आहे. अमेरिकेतील पब्लिक रेडिओ एक्स्चेंजच्या ‘लिव्हिंग ऑन अर्थ’ वृत्तांकनानुसार पेरू देशाने केलेली ही घोषणा करण्यात अशानिंका आदिवासी समाजाचा वाटा मोठा होता. या स्थानिक लोकांचे हक्क डंखहीन मधमाश्यांच्या हक्कांशी अतूटपणे जोडलेले आहेत. त्यांच्या आध्यात्मिक श्रद्धाही डंखहीन मधमाश्यांच्या कल्याणाशी गुंतलेल्या आहेत. हा अध्यादेश फक्त दोन नगरपालिकांनी मंजूर केला असला तरी, तो राष्ट्रीय कायदा म्हणून लागू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
अन्य कीटकांनाही हक्क मिळतील?
फुलपाखरे वा अन्य उपयुक्त कीटकांना इजा पोहोचू नये अशा तरतुदी आजही काही देशांत आहेत. पण कायदेशीर हक्क मिळवणाऱ्या डंखहीन मधमाश्यांचे उदाहरण तूर्तास एकमेवाद्वितीय आहे. अर्थात, अन्य कीटकांच्या हक्कांसाठी हे उदाहरण उपयोगी पडू शकेल. dharmesh.shinde@expressindia.com

