काही दिवसांपूर्वी खारघर येथे नुकतीच एक दुर्मीळ वाघाटी आढळली आहे. खारघर हिल्सजवळ एका वसतिगृहाच्या परिसरात काही विद्यार्थ्यांना ही वाघाटी जखमी अवस्थेत आढळली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग आणि आरएडब्ल्यूडब्ल्यू संस्थेच्या बचावपथकाने वाघाटीला ताब्यात घेतले. या वाघाटीला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.

वाघाटी कोणाला म्हणायचं?

वाघाटी हा बिबट्यासारखा दिसणारा मार्जारकुळातील प्राणी आहे. आकाराने लहान पण रंग व अंगावरील काळ्या ठिपक्यांमुळे ही मांजर हुबेहूब बिबट्यासारखी दिसते. वाघाटीच्या कपाळावर चार उभ्या रेशा असतात आणि मानेखालील बाजू पांढरी असते. तसेच डोळ्याभोवती पांढरी वर्तुळे असतात. या प्राण्याचे वजन सुमारे एक ते दीड किलो असते.

या मांजरीला वाघाटी, वाघुर्टी तसेच बेंगाल कॅट असेदेखील म्हटले जाते. हिचे शास्त्रीय नाव Prionailurus Bengalensis आहे. इंग्रजीत वाघाटीला लेपर्ड कॅट म्हणतात. वाघाटी हा निशाचर प्राणी आहे. ही मांजरे दिवसभर झाडांच्या डोलीत झोपतात आणि रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतात. वाघाटीचा आहारदेखील मांजरीसारखाच आहे. तिचा उदरनिर्वाह उंदीर, घुशी अशा कुरतडणाऱ्या (कृतंक) प्राण्यांच्या शिकारीवर होतो. वाघाटी जरी जंगलात रहात असली तरी तिचा वावर मानवी वस्तीजवळ आढळतो. भारतात वाघाटीच्या १५ प्रजाती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आढळतात. भारतासह आग्नेय अशियातील सर्वंच देशांत वाघाटींचा वावर आढळतो. वाघाटींची संख्या अशियाई देशांमध्ये जरी जास्त असली, तरी आता वाघाटींचे नाव नामशेष होणाऱ्या किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या प्राण्यांच्या यादीत आलं आहे. आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) या संस्थेने त्यांच्या रेड लिस्टमध्ये वाघाटीचा समावेश केला आहे.

वाघाटींची संख्या का कमी होतेय ?

‘प्रायनॅल्युरस बेंगालेंसिस – मेनलॅंड लेपर्ड कॅट’ या नावाने आययुसीएनने एक शोधनिबंध प्रकाशित केला. हा शोधनिबंध घिमिरे यादव, वयात्त जोसेफ पिटरसन, नसरतुल्ला जाहेद आणि मुन्तसिर आकाश यांनी लिहिला आहे. या शोधनिबंधात वाघाटींची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण ‘वाघाटींची अवैध तस्करी व विक्री’ असे सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाघाटींची तस्करी

वाघाटींच्या तस्करीबाबत या संशोधनात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वाघाटींची तस्करी करून विकणं अवैध आहे. तरीदेखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागांवर वाघाटींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात खुलेआम केली जाते. कार्लस्टेटर व मिसर या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, काबूलच्या ‘फर मार्केट’मध्ये वाघाटींच्या त्वचेला भरपूर मागणी आहे. अफगाणिस्तान भागातील नुरीस्तान इलाख्यात वाघाटींच्या शरीरावरील त्वचेचा वापर करून फरच्या वस्तू तयार करण्यात येतात. सध्या जरी ही खरेदी-विक्री कमी प्रमाणात अवैधरित्या सुरू असली, तरी एकेकाळी १९८० च्या दशकात फरच्या व्यापारासाठी हजारो वाघाटींना कोंडून ठेवण्यात यायचे.

२१व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात, वाघाटींचा व्यापार अतिशय सहज पार पडत होता. म्यानमार, चीन, थायलॅंड व अगदी जपानमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाघाटींचा व्यापार चालत होता. म्यानमारच्या ताचिलीकमध्ये वाघाटींच्या त्वचेसह शरीराच्या विविध भागांचीदेखील विक्री केली जात असे. ताचिलीक आणि मॉन्ग ला या म्यानमार-थायलॅंडच्या सीमेवर सापडलेली वाघाटींची संख्या एकूण ४५८ इतकी होती. अजूनही अशाप्रकारच्या वाघाटींची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असण्याची शक्यताही या शोधनिबंधात वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील वाघाटींची परिस्थिती

वाघाटींचे संवर्धन व्हावे व त्यांची संख्या वाढावी म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वाघाटी प्रजनन प्रकल्प’ सुरू करण्यात आला. हा प्रकल्प २०१३ साली सुरू झाला. राज्यभरात कुठेही वाघाटी आढळल्यास त्याला या अधिवासात आणून सोडण्यात येते. या प्रकल्पात वाघाटीच्या पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्या निवासासाठी विशिष्ट प्रकारचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.

पनवेलप्रमाणे वाघाटींसंबंधी इतरही अनेक ठिकाणच्या घटना समोर आल्या. २०२५ मधील या तीन घटना वाघाटींसंबंधातली ताजीच उदाहरणं आहेत. वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीत गावातील ऊस-तोडणी करणाऱ्या काही कामगारांना शेतात वाघाटीची तीन पिल्ले आढळली होती. प्रथमदर्शनी ती मांजरीची पिल्ले वाटल्यामुळे कामगारांनी त्या पिल्लांना घरी नेले. ही गोष्ट वनविभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच वनविभागाने वाघाटीची पिल्ले ताब्यात घेऊन ती जिथे सापडली होती तिथे ठेवण्यात आली. पिल्लांच्या आईची व पिल्लांची भेट व्हावी म्हणून हा प्रयत्न करण्यात आला, पण तसे काहीच झाले नाही. अखेरीस ही पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे देखरेखीसाठी सुपूर्द करण्यात आली.

बरोबर दोन महिन्यांनी राष्ट्रीय उद्यानातून सात वाघाटींच्या मृत्यूची बातमी समोर आली. यात सहा पिल्लांचा मृत्यू हा संसर्गजन्य आजारामुळे झाला. या पिल्लांमध्ये कोल्हापूरवरून आणलेल्या सहा पिल्लांचादेखील समावेश होता. आईशी ताटातूट झाल्यानंतर ती जास्तकाळ तग धरू शकली नाही. उद्यानातील सहा वाघाटींपैकी एका वाघाटीचा मृत्यू हा उंचीवरून खाली पडल्यामुळे झाला, त्यावेळी राष्ट्रीय उद्यानातील वाघाटींची संख्या ११ झाली आहे.

२०२५ च्या शेवटी नोव्हेंबरमध्ये वाघाटींसंबंधीची ही तिसरी घटना समोर आली. सांगलीतील एका शेतकऱ्याला ऊसतोड सुरू असताना वाघाटीची चार पिल्ले आढळली. सुरुवातीस ही पिल्ले बिबट्याची असावी असे वाटले होते. त्या ठिकाणी वनविभागाने तातडीने धाव घेतली व ही पिल्ले वाघाटीची असल्याचे स्पष्ट झाले. वनाधिकाऱ्यांनी या पिलांना हात न लावता फडातील ऊस तसाच ठेवण्यास सांगितले. मादी वाघाटी रात्री आली व तिने पिलांना सुरक्षित स्थळी हलवले. ही वाघाटीची पिल्ले लेपर्ड कॅटची नव्हती, ही पिल्ले रस्टी-स्पॉटेड कॅटची होती. रस्टी-स्पॉटेड कॅट ही लेपर्ड कॅटपेक्षा आकाराने व वजनाने लहान असतात. रस्टी-स्पॉटेड कॅट हा वाघाटींचाच एक प्रकार आहे.

मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड हेदेखील वाघाटींच्या संख्येत घट होण्यामागील दुसरे एक महत्त्वाचे कारण आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाघाटींचा अधिवास जवळपास संपुष्टात येण्यामागे हेच कारण आहे. तसे वाघाटी हे मानवी वस्तीच्या जवळच राहतात, पण ते माणसांमध्ये रहात नाहीत. परंतु, जंगल नष्ट होत असल्यामुळे वाघाटी आता थेट शहराकडे वळू लागले आहेत. वाघाटींची संख्या जर वाढवायची असेल तर जंगलतोड कमी व्हायला हवी, असेही मत या संशोधनात व्यक्त झाले आहे.